जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
मुशाफिरी
पाहता पाहता
दिवाळी जवळपास संपली आहे. लवकरच ‘तुलसी विवाह' पार पडतील आणि मग आपल्याकडील ‘विवाह मुहुर्तां'ना सुरुवात होईल. विवाहांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व होते..आजही आहे. जीवनाचा जोडीदार निवडणे, आई-वडील-नात्यातील ज्येष्ठांनी निवडून दिलेल्या जोडीदाराबरोबर गोड मानून आयुष्यभर संसार करणे, माहेर-सासर अशा दोन्ही परिवारांमध्ये दृढ संबंधांचा पूल बांधणे, वंश संवर्धन, नव्या पिढीवर सुसंस्कार करुन जीवनाच्या विद्यापीठात त्यांना सक्षम करणे एक ना अनेक गोष्टी या विवाहामुळे सहजशक्य होत जातात.
या विवाहांच्या जबाबदारीच्या कटकटीत अडकायला नको म्हणून ‘लिव्ह इन रिलेशनशिप'ची पळवाट काहींनी शोधली, पण तिची ‘वहिवाट' झालेली दिसत नाही हे आपल्या भारतीय संस्कारांचे सुयश! मातापित्यांनी निवडून दिलेल्या जोडीदाराशी विवाह आणि प्रेमविवाह अशा दोन्ही बाबी आपल्याकडे गेली अनेक वर्षे चांगल्याच रुळल्या आहेत. यातील पहिली बाब समाजमान्य आहे. कारण कोणतेही पालक ‘आपल्या मुला-मुलींचे अहित कशाला बघतील? ते त्यांच्या भल्याचेच पाहणार' हा पक्का समज याच्या मुळाशी रुजलेला आहे. पण प्रत्येक वेळी तसे होतेच असेही नाही. काही वेळा आई-वडील-आजी-काका-मामा-आजोबा ही मंडळी त्यांची स्वप्ने, त्यांच्या इच्छा, त्यांच्या अपुऱ्या राहिलेल्या मनिषा पुढील पिढीच्या माध्यमातून पूर्ण करायला बघतात आणि मग कधीकधी विवाहेच्छुंवर सक्ती, बळजबरी, जबरदस्ती, इमोशनल ब्लॅकमेलिंगचे प्रकार केले जाण्याचीही उदाहरणे घडली आहेत. ‘सूनमुख बघायची आईची इच्छा', ‘आजारी आजी-आजोबांच्या हयातीत त्यांना नातसून घरात आणायची आहे' अशा गोंडस नावाखाली विवाहेच्छुंवर दबाव टाकून त्यांची मानसिकता लक्षात न घेता कसेबसे विवाह उरकून टाकले जातात. या साऱ्यात ‘मुलगी पाहायला जाणे' हा प्रकार कॉमन असतो. या प्रकारावर पु. ल. देशपांडे यांनी फार छान, मिश्किल वर्णन केले आहे. त्यांच्या ‘नारायण' या कथेत लग्न जुळवणाऱ्या मध्यस्थ प्रकाराचे आजपासून पंचवीस वर्षे आधीच्या काळात काय महत्व होते ते पुलंच्या खुसखुशीत शैलीत वाचायला मिळते. मुलीने आतल्या खोलीत किंवा शेजाऱ्यांच्या खोलीत जाऊन तयार होणे, तो चहा, ते कांदेपोहे, तो आतला पडदा हलणे, ते त्या मुलीघरच्या कुठल्या तरी वात्रट काटर्याचे तिथले मोकळेढाकळे वावरणे, मुलाचा ‘जवळचा' मित्र, मुलाकडच्यांनी मुलीला विचारलेले असंबध्द प्रश्न वगैरे वगैरे आपल्याकडील आज साठीच्या आसपास असणाऱ्या पिढीतील अनेकांनी अनुभवले असेलच.
वधू-वर सूचक मंडळे व्यावसायिक तत्वावर कामे करु लागली, समाजमाध्यमे ताकदवर बनली, लोकांची आर्थिक स्थिती सुधारली, अनेक घरांमधून मुलीही कमावत्या झाल्या तशी काळानेही कूस पालटली. याच काळात एकत्र कुटुंबे विभागण्याचे प्रमाण वाढले. खेड्याकडील गावंढळ आजी-आजोबा अनेक तरुण-तरूणींना शहरातील घरातही सोबत राहण्यासाठी नकोसे वाटू लागले. मग लग्नासाठी त्यांची इच्छा लक्षात घेणे किंवा त्यांच्या इच्छेच्या जोडीदाराशी लग्न करणे ही बाब तर फारच दूर राहिली! प्रवासाची साधने वाढली, दळणवळण, माहिती-जनसंपर्काची साधने वाढली, ‘करलो दुनिया मुठ्ठीमे' वाला मोबाईल आल्याने सारे जगच एक ‘ग्लोबल खेडे' बनले. या क्षणाला तिकडे इंग्लंड अमेरिकेत काय चालले आहे ते त्याचवेळी इकडेही कळू लागले. पण आपल्या गावाकडच्या नातेवाईकांचे काय चालले आहे, दोन तालुके ओलांडून राहणाऱ्या आप्तेष्टांची काय हालहवाल आहे हे जाणून घेण्यात अनेक महाभागांना रस वाटेनासा झाला. ...आणि यामुळे विवाहासाठी गेल्या अनेक पिढ्या कार्यरत असणारा मध्यस्थ हा प्रकार जणू मोडीत निघाला. आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरराष्ट्रीय विवाह प्रचंड प्रमाणावर वाढले, तिथे मग नात्यातीलच असणाऱ्या किंवा ओळखीच्या आणि जातीमधलीच स्थळे दाखवणाऱ्या बिचाऱ्या मध्यस्थाला विचारतो कोण, अशी स्थिती ओढवली.
लग्नाळू मुलगी, मुलगा ‘पाहायला' त्यांच्या घरी जाण्याचा प्रकार रोडावत चालला. कारण ? प्रभावी बनत गेलेली समाजमाध्यमे! हल्ली अनेक लग्नाळू मुले-मुलींकडे शेकडो विवाहेच्छुंच्या प्रोफाईल असतात. ‘शादी डॉट कॉम व तत्सम संस्थां'नी हा लग्नासाठी उमेदवार शोधण्याचा मामला एकदम सुलभ, सुगम नि सोप्पा करुन ठेवला. व्हाट्स अपवर पालक लोक एकमेकांच्या मुला-मुलींचे फोटो, पत्रिका, कुंडली, व्यक्तीगत तपशील पाठवू लागले. त्यामुळे पहिल्याच टप्प्यात तिच्या घरी जाऊन मुलगी पाहणे या प्रकाराचे महत्व एकदम कमी झाले. बाकी सारे जुळले, पसंत पडले मगच मुलीच्या घराची पायरी चढण्याचा प्रकार असा क्रम रुढ झाला. त्यामुळे चहा, कांदेपोहे, शिरा, सुका मेवा, ढोकळा यांचा आस्वाद घेऊन ‘मग कळवतो' सांगत नकारघंटा वाजवणारे वराकडचे लोक मोडीत निघाले. आता तर मुलग्यांपेक्षा कमावत्या मुलींच्या अटी-शर्तींपुढे झुकण्याची वेळ मुलांच्या घरच्यांवर आल्याचे वातावरण आहे. विवाहपूर्व चॅटिंग करुन मग तिच्याशीच लग्न करत आयुष्यभर तिचेच चॅट ऐकावे लागणारे अनेक तरुण अवतीभवती सहज पाहायला मिळतात. एक जमाना होता..जिथे मुलींना ‘पाहण्याच्या' प्रसंगात फारसे बोलण्याची प्राज्ञा नसे. सारे काही वडीलधारी मंडळीच ठरवीत असत. माझ्या नात्यातील एका मुलीने मात्र यावर मात करीत धिटाई दाखवली. हा प्रसंग आजपासून चौतीस वर्षांपूर्वीचा आहे. तिला पाहायला वराकडचे लोक आले. कांदे-पोहे, चहा देऊन झाला. पुरुष मंडळी एका बाजूला बसली. महिलावर्गात ती मुलगी बसली होती. ‘आमच्याकडे काय, तुमच्याकडे काय' अशा पध्दतीची चर्चा सुरु झाली. मध्येच त्या मुलीने खड्या आवाजात आपल्या बाबांना हाक मारुन लक्ष वेधले आणि म्हणाली..‘ते सारे ठीक आहे हो..पण मला सांगा..त्यांच्या घरात टॉयलेट आहे ना? मी घराबाहेरच्या कॉमन टॉयलेटमध्ये जाणार नाही.' तिच्या या बाणेदार प्रश्नाने काही काळ घरात शांतता पसरली. मग मुलाचे वडील म्हणाले, ‘होय बाळ...आमच्या घरात टॉयलेट आहे. तुला त्यासाठी कॉमन टॉयलेटकडे जाण्याची वेळ येणार नाही.' त्यानंतर तिचे लग्न त्याच जोडीदारासोबत झाले आणि पुढे संसार सुखाचा झाला.
हा पाहायला जाण्याचा एक वेगळा प्रसंग माझ्याही बाबतीत घडला. त्याची मजेशीर आठवण सांगितल्यावाचून राहवत नाही. ही घटना १९९० च्या सुमाराची असेल. ‘मुलगी अन्यत्र पाहुया, तिच्या घरी नको..कारण या पाहण्याच्या प्रकारावर शेजारपाजारचे लोक उगाचच नजर ठेवून असतात आणि मुलीला नकार मिळाला तर दबक्या आवाजात चर्चा होत राहते आणि मुलीचे मनोधैर्य त्यामुळे खचते' अशी माझी भूमिका होती. त्यामुळे मुलगी तिच्या घरी जाऊन पाहण्या ऐवजी इतरत्र ‘येता-जाता पाहिली असे करुया' असे मी मुलगी सुचवणाऱ्याला सांगितले व ठाण्याला एका हॉटेलात ‘सहज आल्यासारखे' दाखवीत भेटायची योजना आखली. माझ्यासोबत माझी धाकटी बहीण, मेहुणे आणि पाच-सहा वर्षांचा भाचा अशी निवडक मंडळी वराकडील पक्ष म्हणून प्रतिनिधित्व करत होती. ठरल्याप्रमाणे ठाण्याच्या तलावपाळीजवळील हॉटेलात संबंधित व्यक्ती आणि ती मुलगी आली आणि ‘सहज आल्यासारखे' दर्शवत आमच्या शेजारच्या टेबलावर बसली. इकडच्या तिकडच्या चर्चेतून माझ्याबद्दल आणि मुलीबद्दलची माहिती बाहेर येईल असे चर्चेचे स्वरुप होते..आणि शेजारच्याच टेबलवर ती मुलगी बसल्याने आम्ही एकमेकांना पाहुही शकत होतो. पण एकूण तेथील चर्चेतून मिळत गेलेली तिची माहिती, तिचा तेथील वावर आणि बोलण्यातून ती मुलगी माझ्या पसंतीला उतरली नाही. मग ‘सहज आलो तसे सहज निघालो' करत संबंधित व्यक्ती आणि ती मुलगी तेथील चहापान, खाद्यवस्तूंचा आस्वाद घेतल्यावर निघून गेले. माझ्या बहिणीने आणि मेव्हण्यांनी माझ्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला तसे मी मानेनेच नकार असल्याचे दर्शवले. संबंधित व्यक्तीला रात्री तसे कळवण्याचे ठरले. हे सारे बराच वेळ मुकाटपणे पाहात असलेला माझा भाचा त्याच्या बालसुलभ निरागसपणे त्याच्या आईला-म्हणजे माझ्या बहिणीला विचारता झाला...‘आई, आता ती मुलगी आली होती, तिला काय म्हणायचं आपण?' माझी हजरजबाबी बहीण लगेच म्हणाली..‘तुझ्या मामाला ती आवडली असती ना तर तिला मामी म्हणायला हरकत नव्हती..पण आता तुझा मामा नाही म्हणतोय.. तर काहीच म्हणायचं नाही आणि आपण येथून निघायचं!'
तर असे हे पाहणे, पसंत करणे किंवा कुणाला त्रास होणार नाही अशा पध्दतीने नकार कळवणे आणि पुढे जाणे आता चॅटिंग आणि समाजमाध्यमांमुळे कितपत उरलेय याचा ज्याने त्याने आढावा घ्यावा. या घटनेनंतर एकतीस वर्षांनी माझ्या एकुलत्या एका मुलाचे लग्न ठरवण्याची वेळ आली तेंव्हा मुलीच्या पित्याने आम्हाला सरळ सांगितले की आम्ही तुमच्या मुलाची माहिती घेत आहोत, तुम्ही आमच्याकडील माहिती घ्या आणि सरळ घरी मुलगी बघायलाच या. आम्ही तसे केले आणि लग्न जमले व ऐन करोना काळात शासन निर्बंधांना अनुसरुन मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पारही पडले.
दिवाळी पश्चात विवाह मुहुर्त सुरु होत असण्याच्या या काळात बोहल्यावर चढू इच्छीणाऱ्या तमाम लग्नाळू मुला-मुलींना शुभ विवाहासाठी हार्दीक शुभेच्छा! - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर.