शाळेतील शब्द

मुलांना शब्दांचे अर्थ समजायला हवेत आणि नाहीच समजले तर समजावून सांगायला हवेत. एक शिक्षिका सांगतात त्याप्रमाणे ”मी माझ्या सहावी सातवीच्या मुलांना सांगते, तुम्ही रोज तुमच्या आईच्या डोळ्यात बघून ‘आय लव्ह यू' म्हणा आणि आईच्या डोळ्यात काय दिसते ते पहा.” शब्दांची शक्ती आणि वाक्यांची महती आणि पवित्र्य अशा पद्धतीने मुलांना शिकवता येतं, तेही चिरकाल टिकण्यासाठी हे मी बाईंशी बोलताना शिकलो. त्याच क्षणाला मला कळालं की अशा बाई सर्वच विद्यार्थ्यांच्या नशिबी येत नसल्यामुळे स्वच्छतागृहाच्या भिंतीवर आपल्याला ‘आय लव्ह यू', हे पवित्र वाक्य वाचायला लागते. कारण ते लिहिणाऱ्याला त्याचा अर्थ आणि पावित्र्य कधी कळलेलेच नसतं.

आठ नोव्हेंबर, दिवाळीची  सुट्टी लागण्यापूर्वीचा शाळेतील शेवटचा दिवस. मुलांच्या परीक्षा संपल्या होत्या. उत्सवापूर्वीच्या उत्साहाच्या प्रकाशाने शाळा उजळून निघाली होती. मुलांच्या चेहऱ्यावर आणि वर्तनात फक्त आणि फक्त आनंद दिसत होता. बुधवार असल्यामुळे मुले रंगीबेरंगी पोषाखात आली होती. त्यामुळे प्रकाशाबरोबरच रंगांची वेगळीच उधळण शाळेत झालेली जाणवत होती. मुलांचा जगावेगळा   उत्साहाचा प्रकाश आणि त्यांच्या आनंदाचे विविध रंग यांचे अलौकिक अस्तित्व शाळेतल्या वातावरणातील कणाकणात जाणवत होते. ‘जीवन सुंदर आहे', याची प्रचिती तेथे क्षणाक्षणाला येत होती.

त्या दिवशी शाळेत आकाश कंदील तयार करणे आणि उटणं तयार करणे या दोन उपक्रमांचे नियोजन केले होते. अशा मंगलमय वातावरणात परिपाठ झाला. प्रार्थनेचे पवित्र स्वर वातावरणात वेगळीच चेतना निर्माण करून गेले. उड्या मारत मुलं जागेवर बसली आणि एखाद्या जादूगाराने त्याच्या पिशवीतून वेगवेगळ्या वस्तू काढाव्यात तसे काही क्षणातच मुलांनी त्यांच्या पिशव्यातून वेगवेगळे साहित्य बाहेर काढले. कोणत्याही सूचना न देता हे सगळं अगदी नैसर्गिकपणे घडत होतं. म्हणजे मुलं आता कोणत्याही सूचना ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यातली काही धीट मुलं बाईंच्या जवळ आली आणि म्हणाली, बाई आकाश कंदील कधी करायचा? कागद आणलेत ना तुम्ही? त्यांची समजूत काढेपर्यंत दुसरी दोन-चार मुलं यायची आणि विचारायची, ”बाई, उटणं कधी तयार करायचं? साहित्य आणलयं ना तुम्ही?” काही जागेवर बसूनच बाईंना विचारायची, ”बाई, कागद केवढा कापायचा?” अशी अखंड शब्दनाद करणारी शाळा त्या क्षणाला, मुलांना चैतन्याचा खळखळाट का म्हणतात हे मला सांगत होती. या जिवंत चैतन्याचा काही अंश आपल्यामध्ये यावा ही प्रार्थना मनोमन केली आणि मुलांचे आवाज कानात साठवत, त्यांच्या चेहऱ्यावरील अद्‌भुत आनंद नजरेत साठवत समोर असलेल्या फळ्याकडे पाहिले.
फळ्यावर सुंदर अक्षरात तारीख लिहिली होती ८/११/२०२३. तारखेच्या वरती सुविचार लिहिला होता. ‘चिकाटी हे जीवनातील यशाचे साधन होय', आणि खाली मोठ्या अक्षरात ‘इयत्ता पहिली' असे लिहिले होते. त्याखाली संपूर्ण फळाभरून ‘ऐकारांत' शब्द लिहिले होते. शब्दांची रांगोळीच घातली होती असं म्हणू या. याचा अर्थ पहिलीचा अभ्यासक्रम ऐकारांत शब्दांपर्यंत पूर्ण झाला होता. फळ्यावर एकूण पस्तीस शब्द उभ्या पाच रांगांमध्ये लिहिले होते. प्रत्येक रांगेत सात शब्द होते. शिक्षकाचे अक्षर कसे असावे याचा तो फळा बोलके उदाहरण होता. फळ्यावरील शब्दांवरून नजर हटत नव्हती. बाईंनी फळ्यावरसुद्धा दुरेघी मध्ये लेखन केले होते. ते पाहून सुंदर हस्ताक्षराला दागिना का म्हणतात ते समजले. मुलांची तयारी कितपत आहे हे पाहण्यासाठी एक दोन मुलांना मी फळ्यावरील लिहिलेले शब्द वाचायला सांगितले. मुलांनी लगेच हातात पट्टी घ्ोऊन वाचायला सुरुवात केली, ‘मैना, दैना, शैला, वैभव, बैल, दैवत, मैदान, वैशाख' वाचनाची तयारी चांगली झाली होती, हे स्पष्ट दिसत होते. पण मी संपूर्ण वाचन घ्ोतलेच नाही. कारण मुलांच्या मनात आकाश कंदील करण्याची कृती मगापासून फेर धरत होती. त्यामुळे मुलांना मी थांबवलं. ‘वाचायचं थांबवा' असं म्हटल्याबरोबर मुलं पुन्हा एकदा उटणं आणि आकाश कंदील याची चर्चा करू लागली. तेवढ्यात माझं लक्ष त्या फळ्यावरील दोन शब्दांकडे गेलं. ते शब्द होते ‘हैवान आणि थैमान' मी अत्यंत शांतपणे पुन्हा एकदा हैवान आणि थैमान हे शब्द मनातल्या मनात वाचले.आता  मला मुलांचा आवाज ऐकायला येईनासा झाला. एकदा मी मुलांकडे पाहिले, ती उटण्याच्या सुगंधात दंग होती. पुन्हा फळ्याकडे पाहिले आणि माझ्या डोळ्यापुढे हैवान आणि थैमान या प्रतिकृती उभ्या राहिल्या. हे शब्द वाचताना मुलांच्या मनात कोणत्या भावना निर्माण झाल्या असतील असे मी मनातल्या मनात पुटपुटलो. डोकं सुन्न झालं. बाईंनी पहिलीच्या वर्गाला वाचनाच्या सरावासाठी हे दोन शब्द का दिले असतील? हे शब्द वाचताना मुलांनी बाईंना काही प्रश्न विचारले असतील का? हैवान आणि थैमान हे दोन शब्द लिहिले नसते तर चालले नसते का? अशा प्रश्नांची गर्दी माझ्या मनात उभी राहिली आणि मी मटकन  खाली बसलो. मुलं बाईंना विचारतच होती, ”आकाश कंदील कधी करायचा?”  
मी शांत होतो. माझ्या मनातला आकाश कंदील त्या क्षणाला तरी विजला  होता. त्याच्या जागी हैवानाने थैमान घातले होते. बाई माझ्याकडे पाहत होत्या. मी कधी फळ्याकडे, कधी मुलांकडे, कधी शून्यात पाहत होतो. इकडे मुलांची बाईंकडे घाई सुरूच  होती, ”बाई उटणं तयार करूया”. बाई शांत होत्या. त्या फक्त मुलांच्या डोळ्यात बघत होत्या. बाई काहीच का बोलत नाहीत हे मुलांना कळत नव्हते. एवढ्यात बाईंना मी म्हटलं, ”चौथीच्या वर्गातील एखाद्या हुशार विद्यार्थ्याला इकडे बोलवा”. बाईंनी लगेच, ”अनन्या, इकडे ये” अशी आज्ञा केली. काही क्षणातच अनन्या माझ्याजवळ आली. मी अनन्याला सांगितलं, ”बाळा, शांतपणे फळ्यावर लिहिलेले हे सर्व शब्द मनातल्या मनात वाच आणि त्यातले तुला न आवडणारे कोणते शब्द आहेत ते मला सांग”. अनन्या शांतपणे फळ्याकडे चालत गेली. आता सगळ्या मुलांच्या नजरा अनन्याकडे स्थिरावल्या होत्या. ती सर्वांना पाठमोरी दिसत होती. प्रत्येक ओळीतील शब्द अनन्या शांतपणे वाचत होती. पहिलीची मुलं मात्र त्यांच्या कागदाच्या कृती करण्यात व्यस्त होती. दोन मिनिटांनी अनन्या माझ्या जवळ आली. शांतपणे उभी राहिली. तेवढ्याच शांतपणे मी तिला पुन्हा विचारलं, ”अनन्या सर्व शब्द वाचलेस?”  तिने मानेनेच होकार दिला. मी म्हटलं, ”मग सांग तुला यातले कोणते शब्द आवडले नाहीत.” अनन्याने स्पष्ट आवाजात सांगितले, हैवान आणि थैमान हे शब्द मला आवडले नाहीत.” अनन्याने दिलेल्या उत्तराचा वेगळाच प्रतिध्वनी माझ्या मनावर उमटला. चौथीच्या मुलीला हे कसं सुचलं असेल याचा विचार मी करू लागलो. मनाची अस्थिरता अजून वाढली. मुलांचा आवाजदेखील वाढला, ”बाई, आकाश कंदील कधी करायचे?”  बाई शांत होत्या. मी अनन्याला अजून एक प्रश्न विचारला, ”फळ्यावर लिहिलेल्या या पस्तीस  शब्दांपैकी असा एखादा शब्द आहे का की जो तुमच्या बाईंशी संबंधित आहे, असे तुला वाटते?” अनन्या पुन्हा शब्द वाचू लागली. अगदी आत्मविश्वासाने दोन मिनिटानंतर तिने पुन्हा मान हलवली. मी तिला म्हटलं, ”तुमच्या बाईंशी संबंधित शब्द सापडला का तुला?”  लगेच अनन्या म्हणाली, हो, सापडला ‘बैठक'.” अनन्याच्या तोंडातून ‘बैठक', हा उच्चार होताच बाईंची मान वर झाली. त्यांच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर सार्थकतेचे भाव सहज दिसू लागले. बाईंनी काहीही न बोलताच अनन्याबद्दलचा अभिमान नकळतपणे व्यक्त केला.

अनन्याचे उत्तर हेच बाईंच्या आजपर्यंतच्या कामाचे संचित होते. कारण बाई नियमितपणे बैठकीला जातात हे अनन्याने केलेले निरीक्षण होते. बाईंच्या संस्कारांचा तो अविष्कार होता. बाई हसल्या. खरंतर परीक्षा अनन्याची होती पण खऱ्या अर्थाने बाई पास झाल्या. असे ते क्षण होते. बाई हसल्यामुळे वर्गात पुन्हा वेगळे चेतन्य निर्माण झाले. बाई पुन्हा मुलांशी बोलू लागल्या. थोड्यावेळापूर्वी असलेली बाईंच्या मनातली आणि चेहऱ्यावरील शांतता अचानक अंतर्धान पावली. आणि तीच वेळ साधून मी बाईंना विचारलं, ”पहिलीच्या मुलांना वाचन सरावासाठी हैवान आणि थैमान हे शब्द देणे आवश्यक आहे का?”  बाई अत्यंत नम्रपणे म्हणाल्या, ”मी हे शब्द पहिलीच्या मुलांना वाचनासाठी द्यायला नको होते..पण त्यावेळी मला ते जाणवलं नाही.”

जर अनन्याने तिला न आवडणारे शब्द सांगितले नसते तर कदाचित मुलांच्या मनातील अंतरंगाच्या छटा मला कधी कळाल्याच नसत्या. इकडे मुलांचा जप सुरूच होता, ”बाई, आकाश कंदील कधी?” माझ्या मनात नुकत्याच पहिलीत आलेल्या मुलांना वाचन सरावासाठी नेमके कोणते शब्द द्यावेत या विचारांनी ‘थैमान' घातले होते. एक वेगळच ‘हैवान', माझी मानसिकता अस्वस्थ करत होता. मुलांना उटण्याच्या सुगंधी वातावरणातच दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि शाळेतून बाहेर पडलो. मनात एकच विचार होता, कोणत्याही  परिस्थितीत मनात निर्माण झालेला शब्दरुपी हैवान लवकरात लवकर मनातून बाहेर जायला हवा.

मग सुरू झाला माझा प्रवास. प्रवास पहिलीच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांबरोबरच्या संवादाचा. अनेक शिक्षकांना मी विचारलं, ”पहिलीच्या मुलांना ऐकारांत शब्दांचा वाचन सराव देत असताना, ‘हैवान आणि थैमान' हे शब्द वाचनासाठी देणे योग्य आहे का?” या संदर्भात शिक्षकांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारे वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्या सर्व योग्यच होत्या. कारण तो त्यांचा एवढ्या प्रदीर्घ वर्षाचा अनुभव होता. काहींच्या मते, वाचन हे अर्थपूर्ण व्हायला हवे. तरच ते चिरकाल टिकते. त्यासाठी पहिलीतल्या मुलांना सुद्धा शब्द वाचताना वाचलेल्या शब्दाचा अर्थ त्यांना कळायला हवा, त्यासाठी तो शब्द त्यांच्या भाव विश्वातला असायला हवा. काहींच्या मते, पहिलीच्या वयोगटाचा विचार करता नेहमी ‘सकारात्मक विचार आणि भावना', विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवी. तर काहींच्या मते वाचनाचा सराव महत्त्वाचा आहे, शब्द महत्त्वाचा नाही, शब्दाचा अर्थ आणि महत्त्व मुले त्यांच्या अनुभवाच्या पातळीवर शोधतील. तर काही शिक्षकांच्या मते ‘चांगले आणि वाईट', या संकल्पना याच वयोगटात स्पष्ट होण्यासाठी त्यांना ‘हैवान आणि थैमान', यासारखे शब्द समजले पाहिजेत, नाही समजले तर शिक्षकांनी समजावले पाहिजेत. कारण व्यवहारी जगात भविष्यात त्यांना हैवान आणि थैमान भेटण्याची शक्यता आहे, तेव्हा भविष्यातील या प्रसंगाला भिडण्याची क्षमता पहिलीच्या वर्गातच का निर्माण व्हायला नको?”

माझी द्विधावस्था संपत नव्हती. आता खऱ्या अर्थाने हैवान माझ्या डोक्यात थैमान घालत होता आणि मग मी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एका माझ्या ओळखीच्या शिक्षिकेला फोन केला आणि माझी समस्या त्यांच्यासमोर मांडली. त्या त्यांचे  अनुभव छानपैकी सांगत होत्या  आणि सांगता सांगता मला म्हणाल्या, ”मी माझ्या सहावी सातवीच्या मुलांना सांगते, तुम्ही रोज तुमच्या आईच्या डोळ्यात बघून ‘आय लव्ह यू'म्हणा आणि आईच्या डोळ्यात काय दिसते ते पहा. शब्दांची शक्ती आणि वाक्यांची महती आणि पवित्र्य अशा पद्धतीने मुलांना शिकवता येतं, तेही चिरकाल टिकण्यासाठी हे मी बाईंशी बोलताना शिकलो. त्याच क्षणाला मला कळालं की अशा बाई सर्वच विद्यार्थ्यांच्या नशिबी येत नसल्यामुळे स्वच्छतागृहाच्या भिंतीवर आपल्याला ‘आय लव्ह यू', हे पवित्र वाक्य वाचायला लागते. कारण ते लिहिणाऱ्याला त्याचा अर्थ आणि पावित्र्य कधी कळलेलेच नसतं.”

माझा प्रवास थांबला. हळूहळू हैवानाने घातलेलं थैमान शांत होऊ लागलं. मी या निष्कर्षप्रत आलो की मुलांना शब्दांचे अर्थ समजायला हवेत आणि नाहीच समजले तर समजावून सांगायला हवेत. लगेच अनन्याच्या बाईंना फोन केला आणि बाईंना विचारलं, बाई, तुमच्या अनन्याने तिला न आवडलेले शब्द  हैवान आणि थैमान हे  का सांगितले असतील?  बाई अत्यंत शांतपणे बोलल्या, काही दिवसांपूर्वी तिसरी चौथीच्या मुलींना मी ‘गुड टच बॅड टच' ही संकल्पना समजावून सांगताना अनेक वाईट मानवी वृत्तीची उदाहरणे दिली होती. बाई जास्त काही बोलल्या  नाहीत. बाईंच्या विचारांची बैठक मला कळून चुकली. पण त्याच क्षणाला मला समजलं ते म्हणजे, अनन्याच्या बाई सर्व मुलांना भेटल्या तर आपल्या समाजात हैवान नावाची वृत्ती आढळणार नाही आणि अपप्रवृत्तीचे हैवान कोणाच्याच मनात थैमान घालणार नाहीत.

अनन्याच्या बाईंचे आणि माझे फोनवरचे बोलणे संपले. मी फोन ठेवला. काही वेळाने व्हाट्‌सअपवर अनन्याच्या बाईंनी बुधवारी आठ तारखेला त्यांच्या मुलांनी केलेले आकाश कंदील आणि उटणं यांचे फोटो पाठवले होते. फोटोतील त्या उटण्याचा सुगंध आणि आकाश कंदीलाचा उजेड खऱ्या अर्थाने माझ्या मनात पडला आणि मला मुलांचे वाक्य आठवले, बाई, आकाश कंदील कधी करायचे माझ्या मनातील विचारांचे थैमान शांत झाले. -अमर घाटगे, केंद्र प्रमुख, रत्नागिरी. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गुजरातला मुजरा आणि महाराष्ट्राला धतुरा...!