मुशाफिरी

‘अमुक लाखात एवढे गुंठे, तमुक लाखात तयार घर' अशा आकर्षक जाहिराती देऊन गिऱ्हाईके गटवणारे वाढताहेत. फसवणुक करताना रोख, चेकने रकमा घेणारे व फसवणुकीचे प्रकार लक्षात आल्यावर लोकांनी पैसे परत मागितले..तर त्यांना बाऊन्स होणारे चेक देऊन शेंड्या लावणारेही आहेत. अनेक चांगले, प्रामाणिक, विधायक, सचोटीचे काम करणारे बिल्डर्स, ठेकेदार, कंत्राटदार, प्रकल्प मालकही असतात. अशा घटना वाढल्या की सगळ्यांकडेच संशयाच्या नजरेने बघितले जाते. संभाव्य फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर कोणत्याही प्रकारच्या आक्रमक मार्केटिंग, लुभावणाऱ्या जाहिराती, नाते-मैत्री यांच्याआडून स्वतःच्या व्यवसायवृध्दीसाठी कुणाचेही गळे कापण्याची तयारी असलेल्यांपासून सावधान राहायला आपणच शिकले पाहिजे.

   अलिकडेच ओळख झालेली एका नव्या मित्राची बहीण असेच रस्त्याने चालताना अचानक समोर आली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. ‘करोना नंतर मार्केट कसं डाऊन झालंय, ते पूर्वपदावर यायला कसा वेळ लागेल, इकॉनॉमीने कसा मार खाल्लाय, रशिया-यु्‌क्रेन युध्दाने जगात महागाई वाढवून ठेवलीय, तशात आता इस्त्रायल वर हमासवाल्यांचा हल्ला..म्हणजे आणखी एक धर्मयुध्द पेटणार आणि सारीच अर्थव्यवस्था कोलमडणार, इंधन, प्रवास, दळणवळण, सारे महागणार' वगैरे वगैरे ती बोलत राहिली..आणि अचानक एका गाफील क्षणी तिने पटकन मला प्रश्न केला, ‘सर तुमचं वय काय?'  आधीची तिची बडबड आणि हा प्रश्न याचा अर्थाअर्थी काहीच संबंध नव्हता. पण प्रश्न तर आला आहे मग मी उत्तर देणं भाग होतं.

   मलाही तिची गंमत करावीशी वाटली. मी म्हटलं, ‘तुला काय वाटतं..माझं वय किती असेल? तिने विचारात पडल्यासारखा चेहरा केला आणि म्हणाली..‘चव्वेचाळीस..पंचेचाळीस असेल!' मी म्हटलं...‘मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता! पोरी, मी साठ वर्षांचा आहे.' तिने आश्चर्य व्यक्त करण्यासाठी तोंडाचा जबडा वासला. ‘सर, अजिबात तसं वाटत नाही. बाय द वे..सर तुमची विमा पॉलिसी आहे का?' असा तिचा पुढचा प्रश्न होता. मग माझ्या लक्षात आलं की हा सारा संभाषण वाढवण्यासाठीचा खटाटोप कशासाठी चालला होता ते! आणि माझे वय तिला का कमी वाटत होते ते! मग पटकन ती म्हणाली..‘असू दे! साठीपुढच्या लोकांसाठीही आमच्याकडे अनेक प्लॅन्स आहेत. एवढे लाख भरा..तुम्हाला तेवढे लाख मिळतील. दर महिन्याला हवे तर तसेही पेन्शनसारखे मिळतील. नॉमिनी करता येईल. एकगठ्ठा मोठी रवकम एवढ्या वर्षांनंतर काढता येईल,माझ्याकडे चार्ट तयार आहे. तुम्ही चेक, आधार कार्ड, पॅनकार्ड तयार ठेवा. मी तुमच्याकडे कधी येऊ ते सांगा. सारे समजावून सांगते.' वगैरे वगैरे ती बोलत राहिली..जे ऐकण्यात मला अजिबात स्वारस्य नव्हतं. मुळात मला पैशांची गुंतवणूक, झटपट श्रीमंत होणं, कमी मेहनतीत अधिक पैसा मिळवणं, जमिन, प्लॉट, फार्म हाऊस, बंगला, सेकंड होम वगैरेंसाठी खटपटी अशा मामल्यांत काडीचाही रस नाही. माझ्या वडिलांनाही नव्हता आणि माझ्या मुलालाही नाही. कष्ट करा, विहित काम विहित वेळेत पूर्ण करा, प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा मोबदला मिळवा, गरजा मर्यादित ठेवा, शरीर तंदुरुस्त ठेवा, व्यसनांपासून शंभर हात दूर राहा, इतरांनाही व्यसनमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा अशी आमची साधी टॅगलाईन आहे.

   माझं असं निरीक्षण आहे की सर्वसाधारणपणे जमिनींबाबत, प्लॉट्‌सबाबत जाहिराती देऊन घरोघरी जाऊन, ओळखीपाळखीचा गैरफायदा घेत जे लोकांना पैसा गुंतवायला सांगतात, त्यातील जवळपास ऐंशी टक्के लोक हे बोगस असतात. ते तुमची (शक्यतो) फसवणुकच करीत असतात. शेरेगर मंडळींच्या योजना  किंवा नुकताच उरण परिसरात झालेले असेच दामदुप्पट पैसा मिळवुन देण्याचे कांड किंवा पैशांचा पाऊस पाडण्याच्या बाता वगैरे गोष्टी मी हे जे काही सांगतोय त्याची पुष्टीच करतात. असा अचानक, गडबडी-खटपटी-लटपटी करुन आलेला पैसा टिकत नाही. शहापूर, मुरबाड, कर्जत, कसारा येथे स्वस्तात प्लॉट घ्या, तयार घरे घ्या, सेकंड होम बनवा, ते भाड्यानेही आम्हीच देऊन तुमच्या मासिक उत्पन्नाची व्यवस्था करुन देतो वगैरे टाईपच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून आणि समाजमाध्यमांतून लोकांवर आदळत असतात. त्यातील काही प्रकल्प खरोखरच उभे राहात असतील, काहींना खरोखरच त्यातून घरे मिळतही असतील. पण यात फसवणुक झाल्याचे सांगणारेही बरेच जण असतात.

   काही वर्षांपूर्वी ‘तुम्हाला अमुक तमुक बक्षीस लागलंय. शहरात फलाण्या ढिकाण्या  हॉलमध्ये तुम्ही तुमच्या पत्नीसह या आणि आम्ही देत आहोत ते बक्षीस स्विकारा, त्यासाठी तुमचा फक्त एक तास या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी आम्ही घेणार आहोत..' अशा प्रकारचे फोन मोबाईलवर केले जात. माझा एक मित्र अशाच एका फोनला भुलला आणि तिथे सपत्निक पोहचला. तिथे त्याच्यासारखी अनेक ‘गाफील' जोडपी आधीच येऊन बसली होती. हॉल खूप मोठा होता. विशिष्ट अंतरावर गोलाकार टेबल मांडण्यात आले होते. तिथे सुहास्यवदना, सुबक, गौरकांती रिसेप्शनिस्ट मुली शवय तेवढे मोहकपणे हसून उपस्थितांचे स्वागत करीत होत्या. चालू काळाची गाणी मोठ्या आवाजात लावली होती, जेणेकरुन एका टेबलावर काय चर्चा होतेय ते दुसऱ्या टेबलावरच्या जोडप्याला कळूच नये. अधूनमधून काचेच्या ग्लासातून थम्स अप, लिम्का, स्प्राईट, सेव्हन अप किंवा तत्सम शीतपेय या जोडप्यांसाठी मौजूद केले जात होते. टापटीप कपडे घालून टायने गळा अलगद आवळलेले ( आणि काही वेळातच या जमलेल्यांचे आर्थिक गळे आवळायला घेणारे!) तेथील वरिष्ठ अधिकारी एकेक जोडप्याला मग आपल्या पोतडीतून एकेक प्रकल्प समजावून सांगत होते. यात शेती, फार्म हाऊस, बांबूचे बन, आंब्याच्या बागा, कंपनीच्या मालकीची रिसॉर्टस, तारांकित हॉटेले आदि मालमत्तांचा समावेश होता. ‘तुम्ही इतके हजार किंवा इतके लाख इथे गुंतवा, तुम्हाला चार दिवस तीन रात्रींचा तिथला स्टे फुकट आणि तुम्हाला आमच्या प्रकल्पात भागीदारी, त्याचा ठराविक काळाने डिव्हीडंड दिला जाईल' वगैरे वगैरे पुड्या ते सोडत होते. जोडप्याने येताना तुमच्या बँकेचे चेकबुक आणायला सांगायचे ते लोक विसरत नसल्याने हे जोडपेही तयारीनेच गेलेले असते. वीस-पंचवीस जोडप्यांतील दहा-बारा जोडपी तरी गळाला लागतातच. पाच-सहा लाखाचे चेक आयोजक कंपनीला मिळतात, याच्या बदल्यात ‘तुम्हाला बक्षीस लागलंय' या वचनाला जागून दीडशे रुपयांचे चपाती गरम ठेवण्याचे ‘हॉट पॉट' दिले जाते.  त्यानंतर अनेकांच्या बाबतीत असे घडले आहे की पुढे काहीही होत नाही. फोन केल्यास कंपनी सांगते की ‘प्रकल्प उभारणी सुरु आहे. तुम्हाला चार दिवस तीन रात्री विनामूल्य स्टे ची भेट दिली आहे, तिचा लाभ घ्यावा.' आता हे हॉटेल असते तामिळनाडू, बंगलोर किंवा मध्य प्रदेशात! आणि तिथले राहणेच केवळ फ्री! बाकी प्रवास, जेवण, स्थलदर्शन ज्याने त्याने आपल्या खर्चाने करायचे आहे. हे कळल्यावर विविध जोडपी तोंडात मारुन घेतल्यासारखी गप्प बसतात!

   हे मी आधीच ऐकून असल्याने सावध होतो. मला असे अनेक कॉल्स येत. पण मी जाणे टाळत असे. एकदा वाशीच्या सत्रा प्लाझा येथील हॉलमध्ये असा कार्यक्रम होणार असून मला बक्षीस लागलंय, घेण्यासाठी सपत्निक या असा फोन दोन चार वेळा आला. फोन करणाऱ्या मुलीला मी सांगितले की ‘जर मला बक्षीस लागले आहे व ते मला तुम्ही देऊ मागताय तर मी येतो..मला बक्षीस द्या आणि लगेच मोकळे करा. मी तुमचे कोणतेही लेक्चर  ऐकायला येणार नाही, मी पत्रकार असल्याने तुमच्या या साऱ्या गतिविधींची मला कल्पना आहे, तिथे काय होते त्यावर मी अधिक वेळ थांबलो किंवा लगेच निघालो तरी लिखाण करुन लोकांना सावध करीनच! बोला आता...आलो तर चालेल?'  फोन करणारी पोरगी गळपटली. तिने कुठल्यातरी वरिष्ठाशी चटकन बोलून घेत ‘सर तुम्ही या, तुम्हाला लगेच बक्षीस दिले जाईल' असे मला सांगितले. मी तेथे गेल्यावर नाव सांगताच जणू माझी वाटच पाहात असल्यासारखे तेथील अधिकारी, कर्मचारी वागले. शीतपेय दिले..काही वेळातच चपाती गरम ठेवणाऱ्या हॉट पॉटचा बॉक्स माझ्या हाती सोपवला आणि मला निरोप दिला. निघता निघता मी हॉलभर नजर फिरवली. किमान सत्तावीस जोडपी तिथे बसली होती.

   नवी मुंबईत आता लोकनेते ‘दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' होऊ घातले आहे. तो सारा परिसर प्रचंड वेगाने प्रगतीच्या पथावर आहे. उरण आणि पनवेल या दोन्ही तालुक्यांच्या सीमावर्ती भागात  तसेच नवी मुंबईतूनही निकटच्या अंतरावर असलेल्या त्या भागात विविध महाप्रकल्प आकार घेत आहेत. रस्ता, रेल्वे, हवाई आणि जल अशा चारही मार्गांनी तेथे पोहचणे शक्य होईल असे ते सारे परिक्षेत्र आहे. मग लोकांना फसवणारेही तिथे घुसले नसते तरच नवल!  विविध वर्तमानपत्रांत, समाजमाध्यमांत जाहिराती देऊन तेथे ‘अमुक लाखात एवढे गुंठे, तमुक लाखात तयार घर' अशा आकर्षक जाहिराती देऊन गिऱ्हाईके गटवणारेही वाढले. अनेकांची घोर फसवणुक झाली. रोख, चेक ने रकमा घेतल्या गेल्या. फसवणुकीचे प्रकार लक्षात आल्यावर लोकांनी पैसे परत मागितले..तर त्यांना बाऊन्स होणारे चेक देऊन तेथेही शेंड्या लावण्यात आल्या. हे साऱ्या राज्यभर, देशभर घडत आहे. गुंतवणूकदार एकसंघ नसतात. ते असंघटित असतात...आणि फसवणारे सुसंघटित, सुसज्ज! यात अनेक चांगले, प्रामाणिक, विधायक, सचोटीचे काम करणारे बिल्डर्स, ठेकेदार, कंत्राटदार, प्रकल्प मालकही असतात. अशा घटना वाढल्या की सगळ्यांकडेच मग संशयाच्या नजरेने बघितले जाते. आपल्याला संभाव्य फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर कोणत्याही प्रकारच्या आक्रमक मार्केटिंग, आकर्षक लुभावणाऱ्या जाहिराती किंवा नाते-मैत्री यांच्या आडून स्वतःच्या व्यवसायवृध्दीसाठी कुणाचेही गळे कापण्याची तयारी असलेल्यांपासून सावधान राहायला आपणच शिकले पाहिजे. कारण..नजर हटी..दुर्घटना घटी!

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी