आत्महत्या ही सुटका नव्हे !

आत्महत्या ही सुटका नव्हे !
       सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी गळफास घ्ोऊन आत्महत्या केली. चित्रपटातील भव्य दिव्य सेट म्हणजे नितीन देसाई असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून ठरलेले होते. अनेक हिट चित्रपटांचे आणि मालिकांचे त्यांनी कला दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्धीच्या आणि यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अवलिया व्यक्तीने जीवनातून अचानकपणे घ्ोतलेली एक्झिट चटका लावणारी आहे.
देसाई यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण पुढे आले नसले, तरी त्यांच्यावर सुमारे अडीचशे कोटींचे कर्ज असल्याचे बोलले जाते. चित्रपट  क्षेत्रातील या आत्महत्या प्रकरणामुळे मागील काही वर्षांत याच क्षेत्रांत झालेल्या आत्महत्यांना उजाळा मिळाला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने केलेल्या आत्महत्येमुळे सारे बॉलिवूडविश्व हादरले होते. त्यानंतर आणि त्याआधीही चित्रपट क्षेत्रातील अनेक निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते आणि अभिनेत्रींनीं  वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. आजमितीला असे एकही क्षेत्र नाही जिथे आत्महत्या होत नाहीत. अध्यात्मशास्त्रानुसार ८४ लक्ष योनींचा फेरा पूर्ण झाल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो. असा अनमोल जन्म सहजपणे संपवणे योग्य आहे का ?
एका सर्वेक्षणानुसार देशातील १३ टक्के तरुण कोणत्या ना कोणत्या तणावामुळे ग्रस्त असतात. जगभरातील तरुणांच्या आत्महत्यांपैकी १० टक्के आत्महत्या केवळ भारतात होतात. नॅशनल क्राईम ब्युरोच्या आकडेवारीनुसार गेल्या काही वर्षांत आत्महत्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने विद्यार्थ्यांची आत्महत्या, प्रेमात अपयश आल्याने तरुणांची आत्महत्या, दुर्धर आजाराने ग्रस्त झाल्याने रुग्णाची आत्महत्या, नोकरीत अपमानास्पद वागणूक मिळाल्याने नोकरदारांची आत्महत्या, व्यवसायात कर्जबाजारी झाल्यामुळे व्यावसायिकाची आत्महत्या, कामाचा ताण सहन न झाल्याने कर्मचाऱ्यांची आत्महत्या यांसारख्या घटनांचे सध्या पीक आले आहे. डोक्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्याची उमेदच संपून गेल्यामुळे मनुष्य आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. ऐन उमेदीच्या काळात आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घ्ोण्यामागे अनेक भौतिक आणि मानसिक करणे असू शकतात. मात्र आज हा टोकाचा निर्णय घ्ोण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यामागे कुठेतरी आपणच कारणीभूत आहोत याचाही विचार आत्महत्या करणाऱ्याने करायला नको का ?
परीक्षेत अपेक्षित यश  मिळाले नाही किंवा परीक्षेत कॉपी करताना पकडले यांसारख्या क्षुल्लक कारणांमुळे विद्यार्थी आत्महत्या करतात. पालकांच्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो नाही, आपल्यामुळे आपल्या पालकांना खाली मान घालावी लागेल या विचाराने विद्यार्थी आपली जीवनयात्रा संपवतात; मात्र आपल्या अशा जाण्याने पालकांना आयुष्यभराचे दुःख आपण देऊन जात आहोत याचा विचार हे विद्यार्थी केव्हा करणार ? मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी सुंदर सुंदर स्वप्न पाहिलेली असतात, क्षणात या साऱ्या स्वप्नांचा चुराडा होतो. प्रेमात अपयश आल्याने ऐन तारुण्यात तरुण तरुणी आत्महत्येचा निर्णय घ्ोतात; मात्र हे करताना त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी आजतागायत किती काय केले आहे याचा विचार ते केव्हा करणार. अपेक्षित जोडीदार मिळणे हेच जीवनाचे ध्येय असते का? आपल्याला लहानाचे मोठे करण्यात आपल्या पालकांनी घ्ोतलेले परिश्रम, त्यांनी आपल्याला लावलेली निरपेक्ष माया अशी क्षणात संपून टाकायची असते का? नोकरीत अपमानास्पद वागणूक मिळते, इतरांची प्रगती होते मात्र आपल्याला डावलले जाते, वरिष्ठ अधिकारी आपल्याला घालून पाडून बोलतात, आपल्यावर कामाचा ताण टाकतात. ही कारणे जीवनयात्रा संपवण्यासाठी कारणीभूत कशी काय असू शकतात. प्रयत्न केल्यावर, इतरांची मदत घ्ोतल्यावर या सर्वांवर उपाय खरंच सापडणार नाहीत का? व्यवसायात कर्जबाजारी झाल्याने काही जण टोकाचा निर्णय घ्ोतात; मात्र आपल्या आत्महत्या करण्यामुळे कर्जाची परतफेड होणार आहे का? आत्महत्या केल्याने तुमची मुक्तता होईल; मात्र तुमच्या घरच्यांनी काय अपराध केला आहे ? काहीजण याही पुढे जाऊन आपल्या मागे घरच्यांना त्रास नको म्हणून मुलाबाळांना संपवून स्वतः आत्महत्या करतात. ज्या निष्पाप जीवांचे या सुंदर दुनियेत नुकतेच आगमन झाले आहे,  त्यांना संपवण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? त्यांना मारताना आपल्या काळजाला भेगा कशा पडत नाहीत ? आपल्या कृत्यात त्या निष्पापांचा अपराध तो काय? दुर्धर आजाराने कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांनी हे भोग आपल्याच पदरी का पडले आहेत, आपली कर्मे या सर्वाला कारणीभूत आहेत का? दुर्धर आजाराने ग्रस्त सर्वच जण आत्महत्या करतात का,  हा विचार कधी केला आहे का ? कोणत्याही संकटावर आत्महत्या हा उपाय असूच शकत नाही. घरातील एकाच्या आत्महत्येमुळे सारे कुटुंब विस्कळीत होते. आत्महत्या तेच करतात ज्यांच्याकडे मनोबलाचा अभाव असतो.
आत्महत्या करणाऱ्यांच्याप्रति समाज सहानुभूती दाखवत असला तरी भारतीय संविधानानुसार तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.  आत्महत्या केली म्हणजे सुटका होईल या विचाराने आत्महत्या करणारा  हे धाडस करतो.  खरा मात्र ही खऱ्या अर्थाने सुटका नसतेच, असे अध्यात्म सांगते. अध्यात्मानुसार मानवासह प्रत्येक प्राणीमात्राच्या जन्म हा प्रारब्धभोग भोगून संपवण्यासाठी झालेला असतो. त्यामुळे जन्म आणि मृत्यू हे विधिलिखित असते. त्यामध्ये ढवळाढवळ करून स्वतःहून मृत्यू ओढवून घ्ोतल्यास पृथ्वी लोकातील समस्यांपासून सुटका मिळेल, मात्र विधात्याच्या नियोजनात हस्तक्षेप केल्यामुळे आत्महत्या करणाऱ्याचा आत्मा पुढील अनेक वर्षे भुवलोकात हालअपेष्टा सहन करत तडफडत असतो. त्या सहन करून संपवल्याशिवाय त्याला पुढच्या योनीमध्ये जन्म मिळत नाही. ८४ लक्ष योनीचा फेरा पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या मनुष्य जन्माचे सार्थक करणे विधात्याला अपेक्षित असते; मात्र स्वतःच्या कर्मदरिद्रीपणाने आत्महत्येसारखी पळवाट स्वीकारणाऱ्याची मृत्यूनंतरही सुटका नसते. त्यामुळे आत्महत्या करून सूटका होते हा केवळ गैरसमज आहे.
- जगन घाणेकर, घाटकोपर. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : शराब करी खराब