मुशाफिरी : स्नेह आणि संमेलन

स्नेह आणि संमेलन

   मोबाईल नावाच्या जादुई यंत्राने आयुष्यात खोलवर प्रवेश केल्याने मित्र, शेजारी, शिक्षक, नातेवाईक, सहकारी अशा साऱ्यांशी वागण्याच्या भूमिका तेच यंत्र निभावते.  हा मोबाईल शोधला जाण्याच्या तीस-पस्तीस वर्षे आधीचे आयुष्य आठवा; म्हणजे त्या जगण्यातील नैसर्गिक, स्वाभाविक, अकृत्रिम, लोभसवाणे स्वरुप ध्यानात येईल. सध्याचे दिवस विविध शैक्षणिक संस्थांमधून क्रीडा महोत्सव, स्पर्धा, रंगारंग सादरीकरणे, गॅदरिंग अर्थात वार्षिक स्नेह संमेलनांचे आहेत. हे दिवस कुणालाही त्यांच्या शाळकरी-महाविद्यालयीन  जीवनात नेतात.

     खेड्यापाड्यात शहरी मॅनर्स, एटिकेट्‌स, प्रोटोकॉल, सभाशास्त्र, नागरी रीतभात, बोलायची पध्दत, सौजन्य वगैरेंचा फारसा गवगवा नसतो. या बांधावरुन त्या बांधावर खणखणीत आवाजात ऐकु जाईल अशी हाक सहज मारली जाते. कुणाचेही दार वेळी-अवेळी ठोकले तर दार उघडणाऱ्याच्या कपाळाला आठ्या पडल्याच पाहिजेत अशातला भाग नसतो. घरी न कळवता जेवायच्या वेळी कुणाला सोबत आणले तर घरधनीणीने डोळे वटारायची गरज नसते. दहा-बारा टक्के मार्क्स इकडेतिकडे झाले तर ‘खानदानकी इज्जत मिट्टीमे मिला दी' छापाचे चेहरे करीत आई-बाप पोरांशी अबोला धरीत नाहीत. गावात शेजारी-पाजारी लग्न असले तर तुमच्या अंगणात पंधरावीस लोक झोपायला पाठवण्यासाठी कुणाच्या मिनतवाऱ्या करायची गरज नसते. उलट त्यांची अधिक सोय कशी करता येईल यासाठी आजूबाजूचे लोकच धडपडताना दिसतील. प्रेम, स्नेह, लोभ, शेजारधर्म वगैरे जडजड शहरी धुवट शब्द ज्यांना नीट उच्चारता किंवा बिनचुकपणे लिहीताही येणार नाहीत असे खेडवळ लोक या शब्दांतून व्यवत होणाऱ्या भावनांना जागत त्यानुसार वागतात.

     याचा अर्थ मात्र असा नव्हे की शहरी सिव्हिक सेन्सवाली माणसे कसलीच माणुसकी, दुनियादारी, शेजारधर्म वगैरे दाखवीत नाहीत. त्यांच्यावर भौगोलिकता, जागाटंचाई आदिंमुळे अनेक बंधने पडतात. मात्र काही शहरी लोक मानसिक मोकळेपणातही टंचाई, कंजुशी, कद्रुपणा, खवडेपणा, खत्रुड वृत्ती  दाखवतात आणि बोलताना मात्र स्नेह, प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा याच्या पोकळ गोष्टी करतात तेंव्हा मात्र वैषम्य वाटल्यावाचून राहवत नाही. अलिकडे शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागात मोबाईल नावाच्या जादुई यंत्राने आयुष्यात खोलवर प्रवेश केल्याने मित्र, शेजारी, शिक्षक, नातेवाईक अशा साऱ्यांशी वागण्याच्या भूमिका तेच यंत्र निभावते.  हा मोबाईल शोधला जाण्याच्या तीस-पस्तीस वर्षे आधीचे आयुष्य आठवा; म्हणजे त्या जगण्यातील नैसर्गिक, स्वाभाविक, अकृत्रिम, लोभसवाणे स्वरुप ध्यानात येईल. तर ते असो. सध्याचे दिवस विविध शैक्षणिक संस्थांमधून क्रीडा महोत्सव, स्पर्धा, रंगारंग सादरीकरणे, विविध स्वरुपाची पारितोषिक वितरण ज्यात होते त्या गॅदरिंग अर्थात वार्षिक स्नेह संमेलनांचे आहेत. हे दिवस मला पार पन्नास वर्षांपूर्वीच्या शाळकरी जीवनात घेऊन जातात. पुस्तकी शिक्षणासोबतच सायकल, पोहायला शिकणे,  विविध अभ्यासेतर स्पर्धांमध्ये भाग घेणे, मॉनिटरगिरी, अवांतर वाचन हे सगळे आपल्या मनावर कोरले जाण्याचा, त्यात रमण्याचा तो सारा काळ. तुम्ही कितीही उच्च शिक्षण घ्या, प्रकांड पंडित बना. पण तुमचे शालेय शिक्षण, शाळा, शाळकरी सोबती तुम्ही कधीही विसरु शकत नाही. त्यातही दहावीची बॅच म्हणजे तर मर्मबंधातली ठेवच जणू ! १९७२ साली छत्रपती शिक्षण मंडळाच्या ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण येथून  इयत्ता पाचवी (१९७२)  ते १९७८ साली एस एस सी असे शिक्षण घेतलेल्या आम्ही काही निवडक मित्रमैत्रीणींनी आमची ती बालपणीची मैत्री अबाधित ठेवली, त्या मैत्रीच्या पन्नाशीचा अर्थात गो़डन ज्युबिली ऑफ फ्रेण्डशिप हा स्नेहमयी सोहळा आम्ही नुकताच डिसेंबर २०२२ मध्ये  कल्याणच्या रामबाग येथे साजरा केला.

   त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलावले कुणाला? तर आमचे भावजीवन ज्यांनी समृध्द केले, आम्हाला चित्रकला शिकवली, छान छान गोष्टी सांगितल्या, आमच्या सहली काढल्या, आमच्या मनावर संस्कारांचे योग्य असे रोपण केले, कल्याणमधील विविध गणेशोत्सवातील नयनरम्य देखावे दर्शवणारी सुंदर चित्रे रेखाटली, गेल्या सुमारे अठ्ठेचाळीस वर्षात साडेपाचशेहुन अधिक ठिकाणी जात कथाकथनाचे कार्यक्रम कोणतेही मानधन किंवा प्रवासखर्च न घेता ज्यांनी केले त्या आमच्या तत्कालिन शिक्षक श्री. श्रीधर गोविंद केळकर यांना. नवी मुंबई महानगरपालिकेच्या सचिव सौ चित्रा बाविस्कर यांच्या हस्ते आम्ही आमच्या ‘मैत्रीच्या पन्नाशी'चा योग साधून आमच्या सरांचा मानपत्र देऊन सत्कार केला व गुरुपूजनाची संधी घेतली. याहीवेळी आम्ही त्यांना कथाच सांगण्याचा प्रेमळ आग्रह धरला व तो त्यांनी वयाच्या ८२ व्या वर्षातही आमच्या विनंतीला मान देत लगेच पुराही केला हे विशेष! या प्रसंगाची प्रेमळ आठवण म्हणून आम्ही सौ बाविस्कर यांनाही त्यांचे उच्च शिक्षण तसेच शासकीय काम सांभाळून विविध छंद, साहित्यिक रचनांबाबतचे पुरस्कार मिळवत असल्याबद्दल सन्मानपत्र श्री केळकर सरांच्या हस्ते देऊन गौरवले. ..आणि आम्ही सारे तत्कालिन विद्यार्थी मैत्रीच्या पन्नाशी निमित्त सन्मानपत्र व संस्मरणचिन्ह सरांच्या हस्तेच समारंभपूर्वक स्विकारताना पुन्हा लहान झालो. त्याही कार्यक्रमात श्री. केळकर सर म्हणाले की, ‘मी मोबाईल वापरत नाही व याही वयात चाळीस, पन्नास वर्षांपूर्वीचे माझे तत्कालिन विद्यार्थी असलेले अनेकजण अजूनही थेट भेटायला येतात, वाढदिवसाला अभिष्टचिंतन करायला येतात, तेंव्हा मनापासून आनंद होतो.'  

दहावीची बॅच व तेंव्हाचे मित्रमैत्रीणीच आयुष्यात कुठेही गेलो तरी व्यवस्थित लक्षात राहतात, हे मी नव्हे..अनेकांनी वेळोवेळी लिहुन ठेवलं आहे. दहावी नंतर मी अकरावी वेगळ्या कॉलेजात, बारावी ते सेकंड ईयर वेगळ्या कॉलेजात, बी. ए अंतिम वर्ष वेगळ्या कॉलेजात, एम. ए. ची दोन वर्षे पुन्हा आधीच्या कॉलेजात आणि पत्रकारिता अभ्यासक्रम तर आणखीच वेगळ्या कॉलेजातून पूर्ण केला. त्यामुळे माझा मित्रपरिवार खूपच रुंदावला, विस्तारत राहिला. याही विविध कॉलेजांमधील अनेक मित्रमैत्रीणी आजही संपर्कात आहेत. दहावीच्या बॅच चे पहिले पुनर्भेट संमेलन आमच्या त्याच ज्ञानमंदिर हायस्कूलमध्ये १८ जून २०१७ रोजी म्हणजे साडेपाच वर्षापूर्वी आयोजित केले व यंदा ‘मैत्रीची पन्नाशी' साजरीही केली. हे सारे माझ्या बी. ए. व एम. ए. च्या मित्रमैत्रीणींना सांगून झाले, आपणही असे पुनर्भेट स्नेह संमेलन आयोजित करु या म्हणून सुचवून झाल्यालाही मोठा काळ लोटला..पण चर्चेच्या टप्प्यापलिकडे काही बोलणी पुढे सरकलीच नाहीत. दहावीच्या वेळची ती निरागसता, साधेपणा, कट्टी-बट्टीतील समर्पित भावना, मोकळेढाकळेपणा पुढे लोप पावतो व त्याची जागा अलगद नाव, प्रतिष्ठा, स्टेटस, उच्च शिक्षणामुळे आपोआप काहींमध्ये येणारी इतरांप्रतिची तुच्छतेची भावना, स्व-कमाईमुळे येणारा अहंकार वगैरे बाबी घेतात की काय..किंवा ‘भेटतोय ना आपण व्हाट्‌सअप, फेसबुकवर..मग बास झाले'..अशा भावनेतून ते येतं का हे मला माहित नाही. पण दहावीच्या पुढच्यांचे असे पुनर्भेट संमेलन शक्यतो होत नसावे असेच एकूण समाजमाध्यमांवर, प्रसिध्दीमाध्यमांतून येणाऱ्या वृत्तांतावर नजर टाकल्यास ध्यानात येते.

   आता आमच्या दहावीच्या, बी. ए.च्या एम.ए. च्या सोबत्यांपैकी बव्हंशी मंडळी विहित शासकीय वयोमानानुसार सेवानिवृत्त झाली आहेत. पत्रकारांची लेखणी व हिंडणेफिरणे थांबत नाही तोवर तो सेवानिवृत्त होत नसतो, उलट वयोमानानुसार त्याचा गोतावळा व प्रभावक्षेत्र विस्तारत गेल्यामुळे तो अधिकाधिक व्यस्त होत जातो. कधी जमिनीवर, कधी धुळीत, कधी चटईवर, कधी बाकावर, कधी खुर्चीत बसून अनेकांना ऐकले, कार्यक्रम पाहिले, पारितोषिके-सन्मानपत्रे-स्मृतिचिन्हे स्वीकारली..आता त्यात बढती मिळून अनेक कार्यक्रमांत प्रमुख पाहुणा, अध्यक्ष, परिक्षक, प्रमुख वक्ता म्हणून विचारमंचावर स्थानापन्न होण्याचा मला योग येतो. विजेत्यांना पारितोषिके देण्याची संधी लाभते. स्नेह संमेलनांतून विचार मांडण्यासाठी निमंत्रित केले जाते. तेंव्हा मी परत भूतकाळात जातो, लहान होतो. स्नेह व संमेलन या दोन्ही बाबींचा पुरेपुर आनंद घेतल्याच्या चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या स्मृति जाग्या होतात. कारण स्टेजवर पारितोषिक घेतल्याचा फोटो काढणे व लगेच तो सोशल मिडियावर टाकत बाकीच्यांना टॅग करणे एवढ्यापुरतेच ते सारे नव्हते. स्नेहाचा स्निग्ध गोडवा व सम्मिलित होण्याचा निर्व्याज, निरपेक्ष आनंद रसरसून घेतलेली ती पिढी होती. ‘आमच्या वेळी, तुमच्या वेळी..आमच्या वेळचे विद्यार्थी व आताची पोरंटोरं' असं कुणी कुणाला उगाच हिणवण्याची काही आवश्यकता नाही. पिढी दरपिढीगणिक याची संकल्पना कदाचित कालानुरुप वेगवेगळी असेलही..पण स्नेहाची व सम्मिलित होण्याची भावना आणि ओढ मात्र कायम टिकुन राहो हीच सदिच्छा.

(मुशाफिरी २३ डिसेंबर, २२) राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : थर्टी फर्स्ट, लुई ब्रेल आणि..तुम्ही आम्ही