मुशाफिरी : थर्टी फर्स्ट, लुई ब्रेल आणि..तुम्ही आम्ही

हा लेख वाचला जात असण्याच्या काळात जगभर नववर्षाच्या स्वागतासाठी ऊत आलेला असेल. ज्यांच्या आयुष्यात ३१ डिसेंबर काय आणि १ जानेवारी काय..त्यात कसलाही गुणात्मक फरक नसतो, त्यातलेही काही ‘थर्टीफर्स्ट च्या नावाने फसफसलेले असल्याचे पहायला मिळेल. शुभेच्छा, संकल्प, उद्दीष्टे, ध्येय यांबाबतीत बोलले, ऐकले जाईल. ...आणि अनेकांच्या बाबतीत जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसातच सारा गाळ खाली बसलेला असेल. या साऱ्या खेळात  मला ४ जानेवारी १८०९ रोजी जन्मलेल्या व ६ जानेवारी १८५२ या दिवशी या जगाचा निरोप घेतलेल्या फ्रेंच संशोधक व अंध लोकांसाठी लिपी शोधण्याऱ्या लुई ब्रेल या महान व्यक्तीमत्वाची आठवण व्याकुळ करते.

सौंदर्य, कुरुपता, ज्ञान, अडाणीपणा, गुणवत्ता, गुंडगिरी, नैपुण्य, निलाजरेपणा-आळशीपणा आदि बाबींना वय, वजन, उंची, राज्य, देश, धर्म,  लिंग यांच्या सीमा नसतात...आणि परक्या देशातील संशोधकाच्या आठवणीचे म्हणाल तर परक्या देशाने शोधलेले मोबाईल, रेडिओ, वीज, टेलिव्हिजन, मोटारगाडी, लिपट, विमान, फोन, फॅक्स, इंजेवशन, औषधे या गोष्टी चालतात..किंवा त्याशिवाय तुमचे पानही हलू शकत नाही अशी स्थिती असते तिथे त्या गोष्टी शोधणाऱ्या व्यवितमत्वांच्या प्रति विनम्र नसणे हा तर कृतघ्नपणाच म्हटला पाहिजे. फ्रान्स देशातील पॅरीसपासून अठ्ठावीस मैल अंतरावरील कुपव्रे गावात चामड्याचा लघुद्योग चालवणाऱ्या सायमन व मोनिक या जोडप्याच्या घरात लुई याचा जन्म झाला.  वयाच्या तिसऱ्या वर्षी चामड्याला  छिद्र पाडण्याची आरी डोळ्याला लागून लुई जखमी झाला. तत्कालिन उपचार पध्दती फारशी प्रगत नसल्याने त्या जखमेचा संसर्गामुळे आधी एक व नंतर दुसरा असे दोन्ही डोळे वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत निकामी झाले व लुई दोन्ही डोळ्यांनी ठार आंधळा झाला. मात्र तो हार मानणारा नव्हता व त्याचे आईवडिलही हिकमती होते. त्यांनी त्याही परिस्थितीत त्याला शाळेत पाठवले. कागदावर एम्बॉस केलेली लॅटिन अक्षरे वाचत लुई शिकला व त्याच शाळेत गणित व इतिहासाचा शिक्षक म्हणून १८३३ पासून कामही करु लागला. पण कागदावरची ही लिपी काहीशी समजायला अवघड असल्याचे त्याने हेरले होते.लुईने फ्रेंच सैनिकाशी बातचीत करुन अंधारात सैनिकांना आलेले संदेश केवळ स्पर्शाने कसे वाचले जातात त्या टिंबांच्या भाषेबद्दल माहिती करुन घेतली व त्यात सुधारणा करीत सहा टिंबांची लिपी विकसित करुन त्यावरील एक पुस्तक प्रकाशित केले. ही लिपी पुढे ‘ब्रेल लिपी' या नावाने जगभर मान्यता पावली. पण त्याआधी लुईला मरावे लागले. होय! चांगल्या रस्त्याला गतिरोधक व चांगल्या व्यक्तीला विरोधक असतात हे केवळ आपल्याकडेच होत नाही; तर जगभर हीच रुढी दिसते. लुई ब्रेल आपल्याला भारी पडू शकतो म्हणून तो ज्या शाळेत शिकवत होता तेथील मुख्याध्यापकाने त्याला कामावरुन दूर केले. ३६ व्या वर्षी लुईला टी.बी.च्या रोगाने गाठले.  तो चौदा वर्षे टीबीशी झगडला. त्या काळी तितकीशी प्रभावशाली औषधे नसल्याने ६ जानेवारी १८५२ या दिवशी त्याने हे जग सोडले. फ्रान्स सरकारने त्याच्या मृत्युनंतर दोन वर्षांनी लुईने विकसित केलेल्या ब्रेल लिपीला मान्यता दिली. १९१३ साली  ही लिपी अन्य युरोपीय भाषांत वापरावी असा ठराव ‘युरोपीय शिक्षक परिषदेत' मंजूर झाला. १९१६ नंतर जगभर तिचा वापर सुरु झाला.

ज्या लुई ब्रेलला त्याच्या हयातीत अनुल्लेखाने मारले गेले, त्याची उपेक्षा करण्यात आली, त्याला त्याच्या पात्रतेनुसार देण्यात येणाऱ्या मानसन्मानापासून वंचित ठेवण्यात आले, त्याच लुई ब्रेलची शवपेटी (ज्यात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला होता) त्याच्या शंभराव्या स्मृतिदिनी बाहेर काढून फ्रान्स सरकारने त्याचा मृतदेह राष्ट्रध्वजात गुंडाळला व शासकीय इतमामात त्याचा पुन्हा अंत्यविधी करण्यात आला.  ‘एनसायवलोपे़डिया  ब्रिटानिका'ने जगभरातल्या पहिल्या शंभर प्रभावशाली संशोधकांच्या यादीत लुईला वरची जागा दिली. लुईच्या जन्मगावी त्याच्या नावे ऐतिहासिक संग्रहालय उभारण्यात आले. २००९ साली भारत सरकारनेही लुईच्या नावे टपाल तिकीट बनवले. त्याच्या प्रेरणादायी आयुष्यावर चित्रपट बनवण्यात आला.

   हे लक्षात घेतल्यावर माझी आई जो संवाद ऐकवी त्याची आठवण झाली..‘जिवंतपणी नाही दिली रोटी आणि मेल्यावर खजूर वाटी.' आपल्याकडे एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले बोलले जाते ते (शक्यतो) केवळ स्मशानात केल्या जाणाऱ्या भाषणातच! एरवी गुणवान व्यक्तीची टिंगलटवाळी, अवहेलना, मानहानी, भेदभाव, पक्षपात करण्यातच अनेकांना विकृत समाधान लाभत असते हे जिकडेतिकडे पहायला मिळत असल्याचे तुम्ही अनुभवत असालच. लुई आपल्या देशाचा नव्हता, आपल्या जातीचा नव्हता, आपल्या धर्माचा नव्हता तरीही त्याने जगभरातील अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश देईल अशी लिपी शोधली व त्यांचे जीवन उजळले. केवळ त्यांचेच जीवन नव्हे;  तर अंध व्यक्तींच्या कुटुंबियांचेही! याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. कारण मी पाहिले आहे की ज्या घरात अंध मूल जन्माला येते तेथे बऱ्याचदा ‘नसती ब्याद आली' अशा नजरेने पहात त्याला अपमानित केले जाते. अनेक गरीब कुटुंबांतून अशी अंध मुले एसटी स्टॅण्ड, रेल्वे स्थानक, गर्दीची जागा येथे सोडून देण्यात येतात. अंधत्व, अंधांचे पालकत्व, त्यांच्यावरील उपचार, संगोपन, देखभाल, शिक्षण याबाबत असायला हवी तेवढी जनजागृती अद्याप झालेली नसल्याने असे कदाचित होत असावे. गरीबी, बेरोजगारी, अज्ञान हीही कारणे यामागे असू शकतील. २००८ साली पहिल्यांदा  माझा संबंध रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुवयात असणाऱ्या यश स्नेहा ट्रस्ट संचालित स्नेह ज्योती अंध निवासी विद्यालयाशी आला. अंध मुले शिकतात, वाचतात, गातात, नाचतात, अभिनय करतात, पारितोषिके पटकावतात, भारतरत्न सचिन तेंडुलकर त्या शाळेत जातो, त्याच्यावर निघालेल्या सिनेमात त्या शाळेतील मुलीला अभिनय करायची संधी मिळते हे सगळे मी त्या शाळेत जाऊन पाहिले. दोन महिन्यांपूर्वी देवाज्ञा झालेले उरणचे ज्येष्ठ लेखक गजानन मोरेश्वर दर्णे यांच्यामुळे माझे लेखन स्नेह ज्योती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रतिभा प्रणव सेनगुप्ता यांच्यापर्यंत पोहचले. त्यांना ते आवडल्याने त्यांनी त्यातील विविध लेख ब्रेल लिपीत रुपांतरीत करायला सुरुवात केली. अशी आजवर माझी वीस पुस्तके  आधीच ब्रेल लिपीत आली व एकवीस, बावीसावे पुस्तक बनवून तयार आहे. तेवीस, चोवीस व पंचविसाव्या पुस्तकाचे काम सुरु आहे. यातील ‘अनमोल जीवन' या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथील कमला मेहता दादर अंधशाळा येथे साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक श्री. ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते करण्यात आले होते.

   माझे मित्र साहित्यिक श्री. एकनाथ आव्हाड यांच्यामुळे मग ‘ब्रेल लिपीतील पुस्तकांचा लेखक' म्हणून मुंबई आकाशवाणीवरही माझी दोन वेळा मुलाखत घेण्यात आली होती. ज्या मुलांच्या आयुष्यात दृष्टीहीनतेमुळे अंधार पसरलेला असतो, त्यांना आवाहन होईल अशा लेखांची पुस्तके बनवल्यामुळे माझ्यावर मात्र प्रसिध्दी, मानसन्मान, पारितोषिके यांचा प्रकाशझोत पडला. एवढे करुन मला ब्रेल लिपीतले काय कळते? तर एक अक्षरही नाही. मी मराठीत लिहिलेले व त्या अंध मुलामुलींशी हितगुज साधणारे, त्यांना आवडेल, रुचेल, पचेल असे लिखाण सेनगुप्ता बाईंमुळे ब्रेलमध्ये रुपांतरीत झाले. त्यांच्या शाळेतील ब्रेलर मशिन..ज्यावर टाईप करुन ही ब्रेल लिपीतील पुस्तकाची पाने बनवली जातात..ते आता खराब झाले आहे. ते त्या शाळेला नवीन कसे घेऊन देता येईल यासाठी माझी खटपट सुरु आहे व त्यासाठी सामाजिक भान असलेले दानशूर दातेही लाभत आहेत. चांगल्या कामात गतिरोधक, विरोधक कसे आडवे येतात याचाही अनुभव मी या साऱ्या कालखंडात व्यवस्थित घेतला. अशाच ब्रेल लिपीतील एका पुस्तक प्रकाशनाची बातमी एका आघाडीच्या वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने माझ्याकडून घेतली व ती लावताना खत्रुड वरिष्ठांचा कसा त्रास झाला तेही सांगितले. खत्रुड वरिष्ठ म्हणे की ‘हा कार्यक्रम दूर तिकडे रत्नागिरी जिल्ह्यात झाला..याची बातमी मुंबई-नवी मुंबईच्या वर्तमानपत्रात घेता येणार नाही.' मात्र त्या प्रतिनिधीने आणखी दुसऱ्या वरिष्ठांकडे जात ती बातमी प्रसिध्द केलीच. मी म्हटले की मुंबईच्या रोहित शर्माने तिकडे ऑस्ट्रेलियात जाऊन शतक झळकवले तर मुंबईच्या वर्तमानपत्रांनी ती बातमी न छापता ऑस्ट्रेलियन पेपरवाल्यांवरच सोडून द्यायची की काय?

   असो. आजवर मराठीतील आघाडीच्या साऱ्याच वर्तमानपत्रांतून नाव, फोटोसह गेल्या पंचवीस वर्षांहुन अधिक काळ प्रसिध्दी मिळत गेल्याने मला माझ्या बातमी आल्याचे ‘कवतिक' आता काही राहिलेले नाही. मात्र त्या किंवा अशा संस्थांचे कार्य, तेथील वातावरण, तेथील वर्तणूक यांना प्रसिध्दी मिळावी, ते कार्य जनमानसापर्यंत पोहचावे, त्यानुसार सकारात्मक वागण्याची प्रेरणा, सामाजिक बांधीलकी, सामीलकीची भावना इतरांमध्ये जागी व्हावी यासाठी प्रसारमाध्यमांनी भूमिका बजवावी एवढीच अपेक्षा. व्याकुळ वाचकहो, ..लुई ब्रेल या असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तीमत्वाबद्दल, अंध शाळांबद्दल वाचून तुमच्या मनात त्यांच्याबद्दलची थोडी जरी संवेदनशीलता जागवली गेली तर हे लिखाण सार्थकी लागल्यासारखे वाटेल. बाकी..नेहमीप्रमाणे सर्वांना नव वर्षांच्या शुभेच्छा आहेतच म्हणा!

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

थेट मंत्रालयातुन