मि.एशिया बॉडी बिल्डींग स्पर्धेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी पटकावले गोल्ड मेडल 

नवी मुंबई : मालदीव येथे सुरु असलेल्या 54 व्या मि.एशिया बॉडी बिल्डींग स्पर्धेमध्ये पनवेल पळस्पे येथील महामार्ग पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यानी 80 किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळविले आहे. त्यामुळे सुभाष पुजारी यांच्यावर सर्वच थरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडीबिल्डिंग फेडरेशन यांच्यावतीने (पोवंटा साहिब) हिमाचल प्रदेश या ठिकाणी गत मे महिन्यामध्ये भारतीय बॉडीबिल्डिंग संघ निवड चाचणी घेण्यात आली होती. यात मि.अशिया 2022 या स्पर्धेसाठी भारतीय संघाकडुन 80 किलो वजनी गटामध्ये महामार्ग पोलिस विभागातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांची निवड करण्यात आली. मि.अशिया 2022 हि स्पर्धा 15 ते 21 जुलै दरम्यान मालदीव येथे सुरु असून या स्पर्धेत भारतीय संघाकडुन सहभागी झालेले सुभाष पुजारी यांनी 80 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावले आहे.  

यापूर्वी सुभाष पुजारी यांनी शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये ताश्कंद उझबेकिस्तान या ठिकाणी झालेल्या मिस्टर वर्ल्ड बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ब्राँझपदक मिळविले आहे. तसेच सलग दोनवेळा मास्टर भारतश्री व मास्टर महाराष्ट्र श्री हा किताब मिळवून पोलीस खात्याची शान वाढविली आहे. त्यानंतर त्यांनी मालदीव येथील मि.एशिया बॉडी बिल्डींग स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळविल्याने त्यांच्यावर पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी, अंमलदार व मित्रपरिवार, नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुभाष पुजारी हे पोलीस खात्यातील त्यांचे दैनदिन कर्तव्य सांभाळुन आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पट्टूंच्या मार्गदर्शनाखाली रोज 5 तास सराव करत होते.  

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिकेतील ११९ अधिकाऱ्यांना पदोन्नती