ऐरोली ते काटई नाका रस्त्यासाठी एमएमआरडीएच्या वरिष्ठ पातळीवर विशेष बैठक

नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास महामंडळ (MMRDA) यांच्यामार्फत ऐरोली ते काटई नाका या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून त्या मार्गावर असलेल्या पुलाचा वापर नवी मुंबईकर नागरिकांना ठाणे बेलापूर रोडवरून कल्याण - डोंबिवलीकडे जाण्यासाठी व कल्याण डोंबिवलीकडून ठाणे बेलापूर रोडवरून नवी मुंबईत उतरण्यासाठी एमएमआरडीएच्या नियोजनात मार्गिका उपलब्ध आहेत.

      त्यासोबतच ठाणे बेलापूर रोडवरून मुलुंडमार्गे मुंबईत जाण्यासाठी व मुलुंडकडून ठाणे बेलापूर रोडवर नवी मुंबईत येण्यासाठी आवश्यक असलेली मार्गिका एमएमआरडीएमार्फत नवीन नियोजनात प्रस्तावित करण्यात आलेली आहे. याविषयी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दोन्ही प्राधिकरणांच्या संबंधित अधिका-यांसोबत घेतलेल्या बैठकीतील सूचनेप्रमाणे प्रकल्प सल्लागार यांच्यामार्फत या मार्गिकेची तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून या मार्गिकेबाबत 3 पर्याय सूचित करण्यात आले होते. या 3 पर्यायांपैकी उपयोगिता आणि उभारणीतील अडचणी याबाबतच्या सर्व शक्यतांचा सविस्तर विचार करून यामधील एक पर्याय योग्य असल्याचे अनुमान निश्चित करण्यात आले होते व याबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकारी स्तरावर विशेष बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

      या अनुषंगाने एमएमआरडीए यांच्या वांद्रे मुंबई येथे असलेल्या कार्यालयात एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त डॉ. के.एच. गोविंद राज व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची चर्चात्मक बैठक पार पडली. याप्रसंगी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता प्रकाश भांगरे, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय देसाई व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

      या बैठकीमध्ये ठाणे बेलापूर रोडवरून मुलुंडमार्गे मुंबईत जाण्यासाठी व मुलुंडकडून ठाणे बेलापूर रोडवर नवी मुंबईत येण्यासाठी आवश्यक असलेली मार्गिका तयार करणेबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे भारत बिजली जंक्शनजवळील प्रस्तावित उड्डाणपुल बांधणे तसेच काटई मार्ग यांचे एकत्रित डिझाईन बनविण्याचे निश्चित करण्यात आले. याविषयीचा तांत्रिक अहवाल 7 दिवसात सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी व प्रकल्प सल्लागार यांना देण्यात आल्या.

      नवी मुंबईतील घणसोली, रबाळे, ऐऱोली, दिघा परिसरातील वाहन चालकांना कल्याण - डोंबिवलीला जायचे असेल तर शिळफाटा - महापे मार्गाने वळण घेऊन प्रवास करावा लागतो. हा मोठा वळसा टाळण्यासाठी ऐरोली - काटई नाका अशा उन्नत आणि भूमिगत मार्गाची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे. या मार्गाचा उपयोग ठाणे बेलापूर रोडवरून मुंबईकडे व कल्याण - डोंबिवलीकडे येण्या-जाण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांना पूर्ण क्षमतेने व्हावा याकरिता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्यामार्फत दोन्ही प्राधिकरणांच्या अधिका-यांशी सातत्याने बैठका आयोजित केल्या जात असून एमएमआरडीए प्राधिकरणाच्या वरिष्ठ पातळीवरही पाठपुरावा करून या कामाला गती दिली जात आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कराच्या नोटीसांची होळी करणा-या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल