मुशाफिरी: शिकण्याचं वय

शिकण्याचं वय

    आईच्या उदरातून आपण काही शिकून येत नाही. दाई, आई, वडील, भाऊ-बहीणी, शिक्षक, गुरु, सहकारी, परिस्थिती, वातावरण आपल्याला एकेक (करून) गोष्ट शिकवत जाते. विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण-नोकऱ्या, अभ्यासक्रम, कलांसाठीची वयोमर्यादा सोडल्यास शिकण्याला वय नसतं. अनेकजण अनेक कलांमध्ये लहानपणीच पारंगत झाले; तर अनेकजण सेवानिवृत्तीनंतर पार उतारवयातही नवनवीन गोष्टी शिकण्यात आनंद मानू लागले. हे शिकणं कधीच थांबत नसतं हेच अंतिम सत्य आहे.  

    वाशीमधील ‘मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळा'च्या व्ही आय पी रुम मध्ये काही कलावंतांची व्हिडिओ मुलाखत घेण्यासाठी मी वेळेआधी पोहचलो होतो. यंदाच्या जुलै महिन्यातील भयंकर पावसाचा ताडताड आवाज बंद दरवाज्यातूनही आतमध्ये येत होता. रेकर्डिंग सुरु असताना हा असा आवाज येत राहिला तर त्यावर मात कशी करायची या विवंचनेत असताना स्टेजवरुन आतल्या दरवाज्याने एक सुपरिचित डॉक्टर त्या व्ही आय पी रुममध्ये पोहचले आणि मला बघून सुखावले. ‘अरेव्वा..मस्तच! सर, दहा मिनिटांनी तुम्ही माझ्याबरोबर स्टेजवर चला. तुमच्या हस्ते काही डॉक्टरांचा सन्मान करत त्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्रांचे वितरण करायचे आहे,' अशी प्रेमळ सूचना त्यांनी केली. मी म्हटले..‘अहो, मी मुळातच इथे वेगळ्या कामासाठी आलो आहे. ते होईपर्यंतचा ताण माझ्यावर आहे. स्टेजवर कोणता कार्यक्रम होतोय त्याची मला सुतराम कल्पना नाही. सभागृहात कोण आलंय, कोण बसलेत ते मला माहित नाही..की त्यांना मी माहित नाही, मला आयोजकांचे निमंत्रणही नाही. असा अचानक मी कसा पाहुणा म्हणून स्टेजवर येऊ?' त्यावर ते म्हणाले..‘त्याची काळजी नको. मी आयोजकांना सहकार्य केलेले आहे. ते तुम्हाला ओळखतात. चटकन ट्रॉफी द्या, दोन शब्द मनोगत व्यक्त करा आणि मग तुम्ही तुमच्या मुलाखतीच्या कामासाठी परत या,' असे सांगून डॉक्टर पुन्हा त्या आतल्या दरवाज्याने अंतर्धान पावले. तोवर ज्यांची मुलाखत घ्यायचीय ते एकेक करुन आले. मग त्यांच्यातील एकाला मी माझ्यासोबत स्टेजवर चलायची सूचना केली, आणि ‘लवकर मोकळे कराल या बोलीवर येतो' म्हणून डॉक्टरांना निरोप दिला. त्यांनी ते ऐकले आणि मग पंधरा वीस मिनिटे आम्ही पारितोषिक, प्रमाणपत्र वितरण केले, आमच्या सत्कारार्थ हार तुरे स्विकारले आणि एकदाचे हुश्श्य करुन पुन्हा व्ही आय पी रुम मध्ये परतलो. कोणत्या वेळी, कोणत्या वयात, कोणता प्रसंग आपल्याला काय शिकवून जाईल याचा नेम नाही.

   कोणत्याही पूर्वसूचनेविना सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्यापैकी अनेकांना अशा स्वरुपाच्या प्रसंगांना अचानक सामोरे जावे लागत असते. समोरच्याला ‘नाही' म्हणता येत नाही; प्रेमाचा-अगत्याचा-मायेचा-स्नेहाचा अप्रत्यक्ष दबाव घेऊन वावरावे लागत असल्याने नकार देणे अवघड असते. पण असे प्रसंग तुम्हा आम्हाला धीट बनवून जातात, आणखी समृध्दच करतात. आयुष्यात प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला आलीच पाहिजे असा काही नियम नाही आणि ते शक्यपण नाही. आशा भोसले यांना क्रिकेट खेळता येत नाही आणि हार्दिक पंड्याला गाता येत नाही. पण आमचे सुनिल गावस्कर क्रिकेट खेळायचे, सावली प्रेमाची या चित्रपटात त्यांनी भूमिका केली आणि गायलेतसुध्दा; तर १९८३ च्या प्रुडेन्शियल विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील दणकेबाज खेळाडू संदीप पाटील हे चित्रपटात अभिनयही करायचे. आपल्याला अनेक गोष्टी येत असतील तर त्यातले काही कधीच वाया जात नाही हेही खरेच! आणि शिकण्याला वय, जात, प्रांत, पक्ष, देश, लिंग अशा कोणत्याच जुल्मी मर्यादा नसतात.

    आपण कधी ना कधी आयुष्यात पहिल्यांदाच काही तरी करत असतो, शिकत असतोच. मला आठवते..१९८६ च्या सुमारास मी पहिल्यांदा ईन्फिल्ड ही मोटारसायकल हातात घेतली. त्या आधी कधीकाळी पाच-दहा मिनिटे आतेभावाची दुसऱ्या मेकची मोटारसायकल हाती धरली असेल एवढेच! कोणतीही प्रॅक्टिस, लायसन्स नसताना मी ती एन्फिल्ड काही वेळ चालवली आणि शिळफाटा येथे ती गाडी रेतीवरुन घसरत गेल्याने अपघातग्रस्तही झालो होतो. त्यानंतर थोडा आत्मविश्वास ढळला होता. १९८७ च्या सुमारास बोरघाटात काही वेळ हिरो होंडा मोटारसायकल चालवली. १९९० च्या सुमारास बदलापूर धरण परिसरात मोकळ्या रस्त्यावर आतेभावाला मागे घेऊन हिरो होंडा मोटारसायकल चालवत असताना ॲवसीलरेटर, ब्रेक, गियर यांची नीट माहिती नसताना गाडी वेगात दामटली. मागे बसलेला भाऊ मागच्या मागे पडला. गाडी मागच्या चाकावर उभी राहिली आणि पुढचे चाक नव्वद अंशात व हँण्डल माझ्या हातात व रस्त्यात पडलेला भाऊ तेथूनच ओरडत होता...‘गाडी हातातून सोडून दे, तू बाजूला हो.' तसे करताना ती मोटारसायकल व मी दोघेही वेगवेगळ्या पध्दतीने धराशायी झालो. नशिब..मागून एखादा ट्रक, जीप अथवा मोठे वाहन वेगात येत नव्हते. आतेभावाच्या त्या मोटारसायकलच्या टाकीला पोचे आले. गियर बॉवस बिघडले. माझे नि आतेभावाचे कंबरडे सडकून निघाले. घरी ही गोष्ट कळताच माझ्या आईने मला शपथ घातली की ‘पुन्हा कधीही मोटारसायकल चालवायची नाही' म्हणून! त्या गोष्टीला आता तेहतीस वर्षे होऊन गेली. आता आईही या जगात राहिली नाही; पण मी तिचा शब्द मोडला नाही.

   कल्याणला ज्ञानमंदिर हायस्कूलमध्ये शिकत असताना येण्याजाण्याच्या वाटेवर मोठी विहिर होती. तिथे वर्गाचे तास बुडवून वर्गातली, शाळेतली मुले भरपूर वेळ पोहताना दिसत. मला तिथे नेहमी डोकवावेसे वाटे. पोहणाऱ्या त्या मुलांचा मला हेवा वाटे. ते विहीरीच्या काठावर उभे राहुन पाण्यात उलटसुलट उड्या मारीत. काठावर एखादं शामळू पोरगं ते पाहात असेल तर त्यालाही उचलून पाण्यात फेकत असत. मला कधी असे पोहता येईल, मी कधी पोहायला शिकेन, माझे आईवडील त्यासाठी परवानगी देतील का असे प्रश्न मला पडत. पुढे कॉलेजला गेल्यावर मी वडिलांकडे हट्ट धरुन उल्हासनगरच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी पैसे आणि परवानगी मिळवली. ‘सोबत एखादा मित्र असेल तरच जायचे' या बोलीवर मला तिथे पोहायला जायला मिळे. तिथे आठवडाभरातच मी पोहायला शिकलो. त्यानंतर मग नदी, ओढे, तलाव अशा विविध ठिकाणी मला पोहायला मिळाले. तसे मी १९८०-८१ सालीच इंग्रजी टायपिंगची ४० शब्द प्रति मिनिट साठीची सरकारी परिक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्याचा मला कंपनीत काम करताना फायदाच झाला. पुढे कधी काळी मी स्वतःच्या मालकीचे वर्तमानपत्र काढून संपादक म्हणून ते १४ वर्षे चालवीन असे कधी वाटले नव्हते. अन्य वर्तमानपत्रांसाठी १९९५ सालापासून लिखाण करताना मी हस्ताक्षरात लेखन पाठवीत असे. माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट होऊन कॉम्प्युटर युग अवतरले. डीटीपी तंत्र आले. मराठी टायपिंग शिकलो नसल्याने मला काही येत नसे. त्यामुळे मी हस्ताक्षरातच लिहीणे सुरु ठेवले. स्वमालकीचे वर्तमानपत्र चालवताना दोन दोन कॉम्प्युटर असतानाही मराठी टायपिंग शिकलो नाही. कारण? आळस. ..आणि डीटीपी करुन पेपरची पाने लावून देणारी व्यक्ती सोबत आहे तर मी मालक-संपादक असताना कशाला मराठी टायपिंग शिकू, अशी मिजासही असावी. नंतर ‘नवे शहर' मध्ये दाखल झाल्यावर लक्षात आले की येथे बाकीचे सारे पटापट संगणकावर टाईप करताहेत आणि मी मात्र हाताने लिहुन देतोय व नाहक दुसऱ्याला ते पुन्हा टाईप करुन मग पेपरमध्ये घ्यावे लागतेय. ‘नवे शहर'मधील सहकाऱ्यांनी (सारेजण माझ्यापेक्षा वयाने कमी! पण त्यांनी माझी) हिंमत वाढवली. कॉम्प्युटरवरील वेगवगळ्या बटनांचा परिचय दिला आणि मी वयाच्या छपन्नाव्या वर्षी मराठी टायपिंग शिकलो.

   १९९६ पासून विविध नामांकित दैनिकांसाठी मी घेतलेल्या मुलाखतींची संख्या हजार-बाराशेच्या वर सहज भरेल. पण त्या साऱ्या प्रिंट मिडियासाठी होत्या. २०२०-२१ सालापासून ‘नवे शहर'साठी मी व्हिडिओ मुलाखती घ्यायला सुरुवात केली. त्याआधी मी शेकडो कार्यक्रमांतून कधी पाहुणा, अध्यक्ष, वक्ता, विजेता म्हणून भाषणे केली असली तरी कुणाची मुलाखत घेण्यासाठी माईक हातात घेऊन कॅमेऱ्यासमोर कधीही बसलो नव्हतो. अठ्ठावन्नाव्या वर्षी मी सुरु केलेल्या या मुलाखतींनी आता दोनशे पंधराचा टप्पा ओलांडला आहे. पूर्वी कुणाचा मोठ्या प्रमाणावरील 

रक्तस्त्राव पाहिला तर मला गरगरायला होत असे. पण पत्रकारितेत आल्यावर इतकं हळवं राहुन जमत नाही हे परिस्थितीने मला शिकवले. ट्रक-बस खाली चिरडलेले, ट्रेनखाली तुकडे झालेले, इमारत कोसळून चेंदामेंदा झालेले, हल्ल्यामध्ये भोसकलेले मानवी देह पाहुन नजर सरावली. काही वर्षांपूर्वी एका डॅाक्टरसोबत उभे राहुन तो एका रुग्णाच्या चिरल्या गेलेल्या कपाळावर टाके घालत असलेला प्रसंग पाहिला. तीन वर्षांपूर्वी माझे हायड्रोसिलचे ऑपरेशन केले जात असताना मला अंशतः भूलीचे इंजेक्शन दिल्याने माझ्या शरीरावर कशा सुऱ्या, कैच्या  चालवल्या जाताहेत, कसे टाके घातले जात आहेत हेही त्या ऑपरेशन थिएटरमध्ये बाजूला असलेल्या आरश्यात मी पाहावे अशी सूचना डॉक्टरांनी केल्यामुळे तेही पाहुन घ्यायला शिकलो. आता साठाव्या वर्षी शरद ननावरे हा माझा शाळकरी मित्र मला कराओके वर कसे गायचे, ते मला शिकवतोय!

   विमानातून पॅराशूट बांधून खाली उडी घेतल्यावर पॅराशूट उघडल्यानंतर कसे वाटते व ते न उघडल्यास कसे वाटते ते सांगणाऱ्याकडून ऐकायला शिकायचे आहे. यातला न उघडणारा पॅराशूटवाला आपल्याला भेटणे मुश्किल आहे. पॅराशूट उघडल्यावर कसे वाटते ते सांगणाऱ्याला ऐकायला मी या वयात उत्सुक आहे.

 - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मंत्रालयातून : लाल किल्ल्यावरची दर्पोक्ती !