मुशाफिरी : शेवट कसा हवा आहे?

शेवट कसा हवा आहे?

   जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगातून जायचे आहे हे नक्की, पण ते कधी व कोणत्या अवस्थेत ? यात विविधता असते. कुणालाही विचारले की, ‘तुला कसा मृत्यु हवा आहे?' तर तो/ती हेच सांगील की, ‘वेदनारहित, दुःखमुक्त, चटकन आलेला, अंथरुणात लोळागोळा होण्याची-गलितगात्र अवस्थेत जाण्याची वेळ न आणणारा, आपल्या मुलाबाळांना आपले फार काही करायला न लागणारा, घरच्या घरी, झोपेत असा मृत्यु हवा आहे म्हणून !'

     हा लेख लिहायला घेताना माझ्यासमोर काही ताज्या घटनांच्या बातम्या आहेत. त्यातील एक म्हणजे या ऑक्टोबर महिन्याच्या ऐन नवरात्रीत एक तारखेलाच नवी मुंबईतल्या बोनकोडे गावात साईप्रसाद नावाची चार मजली धोकादायक इमारत पडली व त्यात मनोज सर्वेश्वर धल नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. आदल्याच दिवशी ती इमारत कलल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील काही कुटुंबांनी आपला मुवकाम अन्यत्र हलवला होता. काही जण तेथून निघण्याच्या बेतात होते. जोरदार पावसात ती इमारत आणखीच जर्जर बनली. तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मनोजला अन्य लोक हातवारे करुन बाहेर येण्यासाठी खुणावत, ओरडत होते. पण त्याने कानाला हेडफोन लावल्याने त्याला ते नीट समजले नाही. आणि जणू या हेडफोनने मनोजला या जगातून ओढून नेले.

    याच नवरात्रौत्सवाच्या काळात गरबा नाचताना  हृदयविकाराचा झटका आल्याने काही लोकांचा भर मैदानात मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्याचे वृत्त आहे. २०१७ साली याच दिवसांत एलफिन्स्टन रोड रेल्वे स्थानकात एकाच वेळी दोन गाड्या आल्याने पुलावर गर्दी वाढली व त्यावेळी झालेल्या अभूतपूर्व चेंगराचेंगरीत २३ जण नाहक जीवाला मुकले होते हे सगळ्यांच्या स्मरणात असेलच. उत्तराखंड राज्यात यंदा दसऱ्याच्या दिवशीच विविध अपघातांत साठहुन अधिक नागरिकांना देवाघरचे बोलावणे आले.

     वरवर पाहिले तर यात मुत्युमुखी पडणाऱ्यांची काही चूक वाटत नाही. त्यांची वेळ खराब होती व ते मरणाच्या दारात गेले. बाकीचे अन्यत्र सुरक्षित होते म्हणून वाचले. ..आणि मग असे का झाले, हे टाळता येण्यासारखे नव्हते का, यावरील चर्चा सुरु राहिल्या. जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगातून जायचे आहे हे नवकी; पण ते कधी व कोणत्या अवस्थेत ? यावर विविधता असते. कुणालाही विचारले की, ‘तुला कसा मृत्यु हवा आहे?' तर तो/ती हेच सांगील की, ‘वेदनारहित, दुःखमुक्त, चटकन आलेला, अंथरुणात लोळागोळा होण्याची-गलितगात्र अवस्थेत जाण्याची वेळ न आणणारा, आपल्या मुलाबाळांना आपले फार काही करायला न लागणारा, घरच्या घरी, झोपेत असा मृत्यु हवा आहे म्हणून !'  पण जसे कुणाच्या घरात, कोणत्या देशात, कोणत्या धर्मात, कोणत्या जातीत जन्म घेणे हे आपल्या हातात नसते तसेच तुम्ही कितीही कॅलरी कॉन्शस रहा, कितीही हसतमुख रहा, कितीही तणावमुक्त रहा, कितीही व्यायाम करा, घातक व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवा..पण मृत्यु तुम्हाला कसा व कधी गाठेल याचा कोणताही अंदाज कधीही बांधता येत नाही. हातीपायी धडधाकटांचे ठीक आहे हो! हल्ली तर म्हणे गर्भावस्थेतच काही अर्भकांच्या हृदयाला छिद्र असते. अनेक जन्मजात व्याधी घ्ोऊन मुले जन्माला येतात. अपंगत्व, कर्णबधीरता, अंधत्व, रंगांधळेपणा, स्वमग्नता..एक ना दोन अशा कित्येक व्याधी अनेकांची जन्मभर साथ करतात. त्यात समाजाने, व्यवस्थेने, आपल्या माणसांनी, सोबती-कुटुंबिय म्हणवणाऱ्यांनी दिलेली दुःखे वेगळीच! ‘इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते..मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते..' या काव्यपंक्तींचा अर्थ अशावेळी नेमकेपणाने लक्षात येतो.  

     शिवसेनाप्रमुख सन्मा. बाळासाहेब ठाकरे व अन्य कित्येकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. नितु मांडके यांना स्वतःच्या हृदयावर किती ताण येत असेल याची कल्पना आली नसेल का? अनेकदा मृत्युच्या दारात जाऊन परत आलेले काही लोक आहेत. अनेक सैनिकांना सीमेवर शत्रुशी लढताना बंदुकीच्या गोळ्या चाटून जातात, बाजूलाच बॉम्बगोळे फुटतात..पण हे सहीसलामत बचावतात. रेल्वे स्थानकाचे फलाट व रेल्वेगाडी यातीत फटीत पडूनही आतमध्ये सुरक्षित राहिलेल्यांना मृत्यू व त्यांचे भय काय असते ते विचारा. आपल्याकडे प्राचीन काळी अनेक संत, त्रषी, आध्यात्मिक व्यक्तिमत्वांनी ‘समाधी' घेतल्याचे इतिहास सांगतो. याला आता कदाचित ‘आत्महत्या' असे नाव दिले जाईल. पति निधन पावल्यानंतर त्याच्या पत्नीला त्याच्या चितेवर ढकलून मारले जाई. यालाच काहीजण ‘सती जाणे' असे गोंडस नाव देऊन या पध्दतीचे उदात्तीकरण करु पहात असत. आपल्या इतिहासात ‘प्रायोपवेशन' हा एक प्रकार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्रायोपवेशनाने मृत्यु पत्करला होता. ‘श्यामची आई' या  पुस्तकाच्या माध्यमातून मातृप्रेमाचे महन्मंगल स्त्रोत्र लिहिणारे साने गुरुजी अर्थात पांडुरंग सदाशिव साने यांनीही आपले जीवन अकाली संपवले.

     एखाद्याचे प्राण जाताना पाहणे, हा कसा अनुभव असतो?  आमच्या घराजवळील एका वृध्दाचे अंग थंड पडत चालले होते. आजूबाजूचे तेथे जमले. त्या वृध्दाच्या पुत्राने मला सुचवले की जरा बघा..काय अवस्था आहे ती! मी काही डॉक्टर नव्हतो. पण सारासार विचार करीत मी त्या वृध्दाच्या छातीला कान लावला. छातीचे ठोके पूर्णतः थांबले होते. पण त्यांचे अंग काही थंडगार पडले नव्हते. वृध्दाच्या नाकपुड्यांजवळ हात लावून पाहिले. श्वासोच्छवास सुरु असल्याची कोणतीच खूण जाणवत नव्हती. मी म्हटले..आजोबा आता आपल्यात नाहीत. पण तरीही डॉक्टरांना बोलावून खातरजमा करुन सर्टीफिकेट घेऊ या.  

     मी इयत्ता पहिलीत असेन तेंव्हा माझ्या शेजारीच राहणाऱ्या बंडू नावाच्या माझ्या मित्राला काही आजारानिमित्त हॉस्पिटलमध्ये नेले होते. दोन दिवसांनी त्याला घरी आणले तेंव्हा तो झोपलेल्या स्थितीतच होता, त्याच्या नाकात कापसाचे बोळे घातले होते. माझी आई मला सांगत होती की तुझा मित्र बंडू आता ‘देवाघरी गेला आहे. आता तो तुझ्यासोबत खेळायला कधीच येणार नाही.'  नंतरच्या आयुष्यात आई-वडील, मावशी, मामा, मामी, आत्या, त्यांचे यजमान, भाचवंडे, आतेभावंडे, मेहुणे, जवळचे मित्र-मैत्रीणी अशा अनेकांनी माझी कायमची साथ सोडून आपला नश्वर देह ठेवला. पंचेचाळीस ते पंचावन्न या वयोगटातील माझे  तीन आतेभाऊ गेल्या दहा वर्षात हृदयविकाराने हे जग सोडून गेले. गेल्या सत्तावीस वर्षांमधील नवी मुंबईतील वास्तव्यात माझ्यापेक्षा वयाने खूपच धाकटे असणाऱ्या अनेक पत्रकारांनी जगाचा अकाली निरोप घेतला.

     हे जग सोडून जाणाऱ्या व्यवतींच्या मनात नेमक्या कोणत्या त्या शेवटच्या क्षणी भावना दाटून येत असतील? त्या व्यवितच्या जवळ त्यावेळी वावरणारी माणसे कोणत्या विचारांत असतील? २०१४ सालच्या जुलै अखेरीस  पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुवयातील माळीण गावावर बाजूच्याच डोंगराने काळ बनून घाला घातला. गावातील जवळपास १६५ व्यवित झोपलेल्या अवस्थेतच मृत्युमुखी पडल्या. जीव वाचवायचा विचार व कृती करायलाही अनेकांना फुरसद मिळाली नाही. जन्म घ्ोणे जसे आपल्या हाती नसते तसेच मृत्यु कधी, कसा, कोठे येणे हेही आपल्या हाती नसते हेच खरे!  मिळालेला जन्म मात्र चांगली कामे करुन सत्कारणी लावता येणे आपल्या हाती असते. अनेकांना चांगली कामे करुनही वाट्याला कौतुकाचे चार शब्द येत नाही. काही दिवसांपूर्वी नंदा खरे (अनंत यशवंत खरे)  या आय आय टी इंजिनियर असलेल्या साहित्यिकाचे निधन झाले. मग विविध वर्तमानपत्रांतून त्यांच्या साहित्यिक गुणांवर कौतुकांचा वर्षाव सुरु झाला. ते पाहून एका लेखकाने लिहिले की,  ‘यातील पाच टक्के कौतुक डेरे जिवंत असताना त्यांच्या वाट्याला आले असते तर आणखी सकस व अधिक गुणवत्तापूर्ण लिखाण करायला त्यांना उमेद मिळाली असती.'  कवी, लेखक, साहित्यिक यांचे जगणे आणि लिहीणे ही बऱ्याचदा वेगळी व स्वतंत्र खाती नसतात. एका इंग्रजी वचनाचा अर्थ असा आहे की,  ‘जन्माला आलो तेंव्हा मी रडत होतो आणि आजूबाजूचे सारे माझे हसून स्वागत करत होते. पण मी मरेन तेंव्हा हसत हसत मेलो पाहिजे व आजूबाजूचे सारे निरोप देताना रडत असले पाहिजे असे काम माझ्या हातून होवो!'  शाहीर विठ्ठल उमप हे हाडाचे कलावंत. नागपूरला दिक्षाभूमीवर कला सादर करीत असतानाच त्यांना मृत्यू आला. तर आमदार, लेखक, पत्रकार, स्तंभलेखक प्रमोद नवलकर हे साने गुरुजींच्या समाजवादी विचारधारेचे असूनही शिवसेनेत वावरलेले. दैनिक नवशक्ति मध्ये  ‘भटवयाची भ्रमंती' या त्यांच्या साप्ताहिक स्तंभासाठी त्यांनी लेख लिहुन हातावेगळा केला आणि काही वेळातच त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

     आयुष्य ज्या कामात घालवले ते आवडीचे काम करताना आणि घरच्या-दारच्या कुणालाही आपला त्रास होऊ न देता अलगद या जगातून निघून जाण्याचे भाग्य किती लोकांना लाभते?

-  राजेंद्र घरत.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी