११  वर्षापासून  बंद असलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे काम लागणार मार्गी 

नवी मुंबई -: वाशी सेक्‍टर १४ येथे  बांधकाम सुरू असलेली बहुउद्देशीय इमारत खचल्याने त्या इमारतीचे काम बंद ठेवण्यात आले होते. मागील आठ ते नऊ वर्षांपासून हे काम बंद होते. मात्र आता या इमारतीचे संरचना परीक्षणाचे काम होणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर या इमारतीच्या कामाला सुरुवात करुन तीन ते चार महिन्यात ही इमारत नागरिकांसाठी खुली करण्यात येणार आहे. वाशीतील सेक्‍टर १४ येथे भूखंड क्रमांक ४ व ५ येथे बहुउद्देशीय इमारत बांधण्याचे काम  २०११--१२ साली  सुरू करण्यात आले होते. त्यासाठी महापालिकाने अंदाजे पाच कोटी ५९ लाख ८८ हजार ४४२ इतका खर्च करणार होते. मात्र महापालिकेच्या परंपरेनुसार या रकमेवर २४.९५ टक्के वाढ करून सहा कोटी ९९ लाख ५७ हजार ५५८ रुपये इतक्‍या निधीला प्रशासकीय मंजुरी देऊन हे काम मे. मोक्षा कन्स्ट्रक्‍शनला दिले होते. त्यांना बांधकामासाठी २४ महिन्यांची मुदत दिली होती. मात्र सदर काम सुरू केल्यानंतर या इमारतीच्या छताचा भाग खचला होता. त्यामुळे सदर काम काही काळ बंद होते. त्यानंतर कंत्राटदाराने वारंवार मुदतवाढ घेत हे काम करण्याचा प्रयत्न केला. खचलेल्या छताला आधार देण्यासाठी या ठिकाणी लोखंडी बिम तसेच अतिरिक्त (कॉलम)  सिमेंट खांब बांधले आणि खचलेला भाग सावरण्याचे काम केले. मात्र या इमारतीचे मूळ आरेखनच चुकीचे झाल्याने ही इमारत खचली होती. त्यानंतर या इमारतीचे काम बंद अवस्थेत आहे. २५ जुलै २०१७ रोजी तत्कालिन आयुक्त रामस्वामी एन यांनी या इमारतीची पाहणी केली आणि त्यावेळी ठेकेदार आणि अभियंता यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला चार वर्षे उलटली तरी अजून त्यावर कारवाई केली नसल्याने ही इमारत नव्याने कधी पूर्ण होईल याकडे वाशीकरांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र आता  या इमारतीचे संरचना परीक्षण केले जाणार असून त्याचा अहवाल प्राप्त होताच या  इमारतीचे काम करून ती नागरीकांसाठी खुली केली जाणार आहे.

 बांधकाम  सुरू असतानाच ही इमारत खचल्याने ती पाडून  नवीन इमारत बांधण्याचे आदेश तत्कालीन आयुक्तांनी दिले होते. आज नवीन काम संबंधित कंत्राटदाराकडून करून घेण्यात येणार होते. तसेच असे प्रकार पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले होते. मात्र सदर कामात अधिकाऱ्यांनी आधीच हात ओले करुन घेतल्याने सदर ठेकेदाराला पुरेपूर वाचवण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता देखील संरचना  परीक्षण करून थोडीफार सुधारणा करून ही इमारत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खाजगी सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नवीन इमारतीच्या जागेवर धोकादायक अशी इमारत पुन्हा नागरीकांच्या माथी मारून ठेकेदार आणि अभियंत्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार मनपा प्रशासनाकडुन केला जाणार आहे?

वाशी सेक्टर १४ मधील बहुउद्देशीय इमारतीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असुन तीन ते चार महिन्यात हे काम पुर्ण करून ही इमारत खुली  केली जाणार आहे.

अरविंद शिंदे,

कार्यकारी अभियंता , वाशी, न.मु.म.पा.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रंगछटा 2022 एकपात्री व द्वीपात्री अभिनय स्पर्धेचे यशस्वी आयोजन