स्मार्टफोन, समाजमाध्यमे निकोप कुटुंब व्यवस्थेच्या मूळावर?

दिवसेंदिवस विभक्त होत चाललेली कुटुंब व्यवस्था, दुरावत चाललेली माणसा-माणसांमधील नाती, हे एक भयानक वास्तव आहे. त्यासाठीच कोणतेही व्यसन कसे असावे? तर कोणतेही व्यसन ये म्हटले आले की, आले पाहिजे आणि जा म्हटले की, गेले पाहिजे. दिवसेंदिवस माहिती तंत्रद्यानात आमुलाग्र बदल होत असून स्मार्ट फोन व इतर सोशल माध्यमातून साऱ्या जगाचे अपडेट चुटकीसारखे आपल्याला उपलब्ध होतात. आज १५ मे जागतिक कुटुंब दिनानिमित्त कुटुंबवार होणाऱ्या त्याच्या बऱ्यावाईट परिणामांची चर्चाही व्हायला हवी.

समाजमाध्यमांचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. तेव्हा त्याचा वापर कधी, कुठे, केव्हा करावयाचा हे प्रत्येकाने विचारपूर्वक लक्षात घेतले पाहीजे. समाजमाध्यमे व इंटरनेट हे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे सर्वात मोठे मुक्तपीठ झाले आहे. त्यामुळे या माध्यमातून संवाद जरी वाढला असला तरी संपर्क मात्र कमी होऊ लागला आहे. आपली व्यक्तिगत माहिती, फोटो, समारंभ, पर्यटन याविषयी नोंद सर्वासमोर शेअर करण्यात बहुतांशी धन्यता मानू लागले आहेत. परंतु यामधील तोटे काय आहेत हे समजून घेण्याची मानसिकता राहिली नाही. मग ज्या काही दुर्घटना, गैरप्रकार घडतात त्याला तोंड देण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्याहीपेक्षा लहान मुले सुद्धा आजकाल स्मार्ट फोन वापरू लागले आहेत. काही अपवाद वगळता बहुतांशी पालक त्यात धन्यता मानू लागले आहेत. आज त्याचा वापर हा प्रमाणाबाहेर केला जाऊ लागला आहे. इतका की कुटुंबातील सदस्य एकमेकांशी बोलत नाही, नाती दुरावत चालली आहेत, आरोग्यवर सुद्धा विपरीत परिणाम होऊ लागले आहेत, मानसिक स्वास्थ्य बिघड़त चालले आहे, घटस्फोटांची  टक्केवारी वाढत चालली  आहे.

ही सर्व परिस्थिती पाहणी व अहवालानुसार समोर आली आहे. खरी गरज आहे ती निकष आणि नियंत्रणाची. ही माध्यमे जरी पारदर्शक असली तरी कोणत्याही स्वातंत्र्याबरोबर आचार विचारांची एक चौकट असावी लागते. तशी चौकट नसेल तर स्वातंत्र्याचा स्वैराचार होण्यास वेळ लागत नाही. इंटरनेट, स्मार्ट फोनच्या माध्यमातून कोणालाही, कोणाबद्दल, कोणत्याही विषयी व्यक्त होण्याची संधी मिळत असल्याने अफवा, अनादर, द्वेष अगदी खालच्या भाषेत केला जातो. इतकेच नव्हे तर अश्लील चित्रफीती, भावना भडकवणारी छायाचित्रे, समाजात विषमता पसरवणारे मजकूर पसरविले जात असल्यामुळे, समाजात एक प्रकारची तेढ निर्माण केली जात आहे. यातील काही पाहणीतुन व अहवालातून समोर आले आहे. लहान मुलांचा सर्वांगींण विकास खूंटला आहे. त्याच्यामधील कल्पकता, विचारशक्ती, बुद्धिला ताण देण्याची क्षमता कमी होत चालली आहे.

एकूणच तंत्रज्ञान कितीही फायदेशीर, प्रगतीशीर असले तरी जेव्हा समाज, कुटुंब यांवर जेव्हा विपरीत परिणाम होऊ लागतात तेव्हा त्याला नियम व निकष यांची चौकट असणे अत्यंत गरजेचे आहे. अतिवापर व त्याचे उमटणारे प्रतिसाद, ढासळत चाललेली कुटुंब व्यवस्था हे लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत पावले उचलीत आहेत. या माध्यमांवर निकष व नियंत्रण सूचना व हरकती घेत  सुरवात केली आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे.परंतु मी एक यूजर या नात्याने याचा वापर केव्हा, कधी, कोठे, किती वेळ वापर करावयाचा हे जेव्हा स्वतः ठरवू तेव्हा शासन निकष व नियंत्रणाची गरजच भासणार नाही. आज आपली कुटुंब व्यवस्था सुदृढ राहिली तरच समाज व्यवस्थासुद्धा निकोप राहील! - पुरुषोत्तम कृ. आठलेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

स्वप्नाकडून सत्याकडे...कल्पना चावलाची कहाणी