स्वप्नाकडून सत्याकडे...कल्पना चावलाची कहाणी

धगधगते अग्निकुंड... अंगावर शहारे आणणारी कल्पना चावलाची उत्कंठावर्धक कहाणी. २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या तरुणाईला प्रेरणादायी ठरेल असे माधुरी शानभाग यांचे हे पुस्तक. आपल्या अंतरातला स्फुलिंग पेटता ठेवून त्यावर जगणाऱ्या राखेला प्रयत्नवादच्या आणि बुद्धिवादाच्या फुंकरीने उडवून लावणाऱ्या कल्पनाच्या व्यथांची ही कथा! कुणाचाही आदर्श समोर नसताना, किरण बेदींचा दुर्दम्य आशावाद, इंदिरेची झळाळणारी जिद्द, जे. डी. ची ईर्षा यांचा एकेक प्रकाशकण वेचून कल्पना त्याचा धु्रवतारा बनवते.

स्वप्नाकडून सत्याकडे कल्पनाने जी खडतर वाटचाल केली त्याचे उत्कंठावर्धक चित्रण लेखिकेने केले आहे. तिच्या वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असे हजारो पालक आपल्या पाल्यांला यापुढे सांगतील. येणाऱ्या पिढ्यांपुढे एक आदर्श ‘रोल मॉडेल' म्हणून स्वतःला सिद्ध करणाऱ्या कल्पनाचे हे धगधगते अग्निकुंड! तिच्यापासून स्फूर्ती घेऊन विज्ञाननिष्ठ पिढी निर्माण होईल, असा विश्वास वाटतो. कल्पनाच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया जरी भारतात घातला गेला तरी तिचे कर्तृत्व फुलले ते अमेरिकेत. कल्पनासारखे भारतीय जेव्हा परदेशी जाऊन उज्ज्वल यश मिळवितात, तेव्हा आपण ते भारतीय असल्याचा अभिमान व्यक्त करतो. कल्पनाने जो विज्ञानवाद जोपासला, प्रयत्नवाद आणि परिश्रमाची वाट धरली ती प्रसिद्धी व पैसा देणारी नव्हती. तेव्हा कल्पनाचा मृत्यू ही क्षणिक लाट न ठरता स्त्री-पुरुषांनी डोळसपणे आजूबाजूला पाहावे. गल्लीबोळात नवी देवळे उभी राहण्यापेक्षा अभ्यासमंडळे आणि प्रयोगशाळा उभ्या राहाव्यात. १९४७च्या भारत-पाक आणि नंतर फाळणीपासून ते २००३ माधुरी शानभाग यांनी कर्नल ते केपकॅनव्होराल या भागात कल्पनाच्या जन्मापासून ते नासाच्या कॅलिफोर्नियातील अमेन्स रीसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून काम करताना कल्पनाने घेतलेल्या गरुडभरारीचे त्रोटक पण अचूक चित्रण केले आहे.

‘वैसी' या नावाने अमेरिकेत ओळखली जाणारी, निळ्या नभाच्या पलीकडे झेपावणारी ‘आय ॲम कल्पना चावला फ्रॉम कर्नाल इंडिया' म्हणत भारताविषयी सार्थ अभिमान बाळगणारी आणि १९९७ या दिवशी ‘कोलंबिया' मधून अवकाशात झेप घेणारी ‘पहिली भारतीय अंतराळ स्त्री' म्हणून लेखिकेने कल्पनाची करून दिलेली ओळख उल्लेखनीय आहे. ‘कोलंबिया'चे अवकाशात उड्डाण जितके महत्त्वाचे त्यापेक्षा अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण अधिक महत्त्वाचे आणि धोकादायक असते. त्यांचे उतरणे, अंतराळ यात्रीचे प्रशिक्षण, कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग, खास पोशाख, उड्डाणाच्या वेळीचा प्रचंड वेग आणि शरीरावर चार गुरुत्वाकर्षणाएवढा असलेला दाब हे सारेच लेखिकेने तरलपणे उभे केले आहे. पुढे यानाची गती २८,००० कि.मी. इतकी झाल्यावर यान आडवे होऊन अवकाशात पृथ्वीभोवती फिरायला सुरुवात होते. पृथ्वीभावेती घिरट्या घालून १६ दिवसांनी ते परतणार होते, परंतु जडत्वाच्या गुणधर्मामुळे फिरणारे यान त्याच गतीने फिरत राहते. लेखिकेचे समाजभान येथे प्रकट झाले असून त्यांनी केलेली सुरक्षा निरीक्षणे हे त्यांचे द्योतक आहे. अंतराळातील वर्णने रोमहर्षक केली असून अविस्मरणीय बनली आहेत. त्यामुळे ही वर्णने वाचकाच्या आंतरमनाचा ठाव घेणारी बनतात.

उड्डाणाची वेळ अमेरिकेत पहाटेची होती. भारतात त्यावेळी रात्र होती. पहिल्या झटक्याला प्रचंड वेगामुळे माणसाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्या वेगाशी जुळवून घेताना रक्तदाबात अनियमित चढउतार होतात त्यासाठी जमिनीवर अशा वेगाचा सराव करावा लागतो. अंतराळवीर जेव्हा जमिनीवर असतात तेव्हा शरीरातील पाणी गुरुत्वाकर्षणामुळे पायाच्या दिशेने वाहते. अवकाशात आल्याबरोबर गुरुत्वाकर्षण नाहीसे होते. त्यामुळे पाणी सर्व शरीरावर साठून सर्वांगावर, विशेषतः चेहऱ्यावर सूज येते. १९ नोव्हेंबर १९९७ ते ५ डिसेंबर १९९७ असे १६ दिवस कल्पना ‘कोलंबिया' यानात अंतराळात होती. त्या काळात त्यांनी पृथ्वीभोवती २५२ फेऱ्या मारल्या. ३७६ तास ३४ मिनिटे ती अवकाशात राहिली. सुमारे १ कोटी कि. मी. अंतर त्यांनी काटले. पृथ्वीपासून १५० कि. मी. उंचीवर होते. १६ जानेवारी २००३ साली ‘ए.ऊ.ए.१०७' या कोलंबियाच्या दुसऱ्या फेरीसाठी तिची निवड होते. तेव्हा परत प्रशिक्षणासाठी नासाच्या वेगवेगळ्या विभागात काम करावे लागते. त्यामुळे पुढे ढकललेली भारत भेट रद्द होते. कल्पनाला अवकाशात जाण्यासाठी कोणकोणत्या दिव्यांतून जावे लागले याचे तपशीलवार वर्णन लेखिकेने केले आहे. तिला अभिनिवेश किंवा आत्मप्रौढी बिलकुल नव्हती. समोरच्या तरुणींना तिने, ‘आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करा, त्यांना कधीही विसरू नका. एक दिवस ते सत्यात उतरते.' असा संदेश तिने दिला. तिचा हा उपदेश नसून अनुभवाचे बोल वाटावेत असा प्रामाणिकपणा त्यात होता. दुसऱ्या उड्डाणाच्या वेळी या फेरीची ती कमांडर होती. प्रमुख आणि पलाईट इंजिनिअरच्या खुर्चीत बसलेली होती. यानात पाण्याने अंघोळ करता येत नाही.

कारण पाण्याचा फवारा पडत नाही आणि तांब्या उलटा केला तर पाणीही पडत नाही. ओल्या सुगंधी टॉवेलने अंग पुसणे हीच अंघोळ सर्वांत कठीण काम म्हणजे मलमूत्र विसर्जन. ती एक कसरतच असते. कारण गुरुत्वाकर्षण नसल्याने काहीही खाली पडत नाही. द्रव पदार्थ स्ट्रॉने ओढून प्यावे लागतात. नियोजित वेळेआधी ६१ मिनिटे कल्पनाने कोलंबियाचा ताशी २८,००० कि.मी. असलेला वेग कमी केला. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्याचा संदेश पृथ्वीवरील नासाच्या नियंत्रण कक्षाला पोचला गती कमी करताना त्याची दिशा बदलून पृथ्वीपासूनची उंची कमी करण्यात आली. तेव्हा साधारण ऑस्ट्रेलियावर कुठेतरी ‘कोलंबिया'ने वातावरण प्रवेश केला. नियोजन वेळेआधी फक्त १६ मिनिटे कोलंबियाचा आणि कक्षाचा संपर्क तुटला. तेव्हा कोलंबिया जमिनीपासून सुमारे ६० कि.मी. अंतरावर होते. लुझियानातील लोकांना स्फोट झाल्याचा मोठा आवाज ऐकू आला आणि श्वास रोखून नियंत्रण कक्षात बसलेल्या नासाच्या वरिष्ठ तंत्रज्ञानां ‘कोलंबिया' जळून नष्ट झाल्याची बातमी जाहीर करावी लागली. कल्पना जीवनाला पारखी झाली. भारतभेटीचे स्वप्न स्वप्नच राहिले. ‘मरावे परी किर्ती रूपी उरावे' कल्पनाच्या मृत्यूने हे शब्द खरे करून दाखविले. भव्य यश मिळवून ती परत आली असती तर...! कल्पना चावलाचे आयुष्य, तिची धडपड, चिकाटी व तिचा प्रयत्नवाद लेखिकेने उत्कटपणे मांडला आहे. समाजाला विज्ञानभिमुख करण्यासाठी कल्पना चावला ही प्रवृत्ती नव्यापिढी समोर ठेवण्याचा लेखिकेचा प्रयत्न स्तुत्य वाटतो.

स्वप्नाकडून सत्याकडे..कल्पना चावलाची कहाणी
लेखिकाः प्रा. माधुरी शानभाग वर्ग : चरित्र, विज्ञानविषयक
प्रकाशक :  मेहता पब्लिशिंग हाऊस पृष्ठे : ६८
- सौ. मनिषा कडव 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

विकासाच्या मुद्दयांपेक्षा एकमेकांची उणीदुणी काढण्यातच अधिक रस घेणारा प्रचार