मुशाफिरी

घासावा शब्द । तासावा शब्द । तोलावा शब्द । बोलण्या पूर्वी।।

शब्द हेचि कातर । शब्द सुईदोरा । बेतावेत शब्द । शास्त्राधारे ।। असे संत तुकाराम महाराजांनी अनेक वर्षांपूर्वी आपल्याला सांगून ठेवले आहे. आपल्यातल्याच अनेकांनी ते किती मनावर घेतले (म्हणजे कसे मनावर घेतले नाही..) याचा तुम्ही आम्ही राजरोस पडताळा घेत आहोतच. ७ मे रोजी लोकसभेच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. येत्या १३ तारखेस चौथा व १ जून रोजी सातवा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे. मात्र या साऱ्या टप्प्यांत विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी प्रचारसभांमधून सुसंस्कृतपणे बोलण्याचा टप्पा धुडकावून लावून वाट्टेल तसले शब्द वापरण्याची हौस फिटवून घेतली आहे. काहींवर निवडणूक आयोगाची कारवाईही झाली आहे.

   मला कळायला लागल्यापासून गेली सुमारे पन्नास-पंचावन्न वर्षे राज्यातल्या आणि देशातल्या विविध निवडणूकींच्या वातावरणाला सामोरे जात आहे. त्यांची वैशिष्ट्ये टिपून घेत आहे आणि गत एकोणतीस वर्षांपासून त्याचे वार्तांकनही करीत आलो आहे. यावेळच्या निवडणूकीत प्रचंड वाढत्या प्रमाणावर व अत्यंत विस्फोटकरित्या सोशल मिडिया अर्थात समाजमाध्यमांचा कसा वापर होत आहे तेही आपण सारे पाहात आहोत. मला आठवते..१९६८ च्या सुमारास बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती. त्यावेळी ‘व्होट फॉर काँग्रेस' असा मजकूर लिहुन भिंती रंगवल्या जात. चौकाचौकात कापडी फलक झळकावले जात असत. तेंव्हा बैलजोडी ही काँग्रेसची निशाणी असे. मी त्यावेळी अगदीच लहान-पाच वर्षांचा असल्याने त्यावेळी कोणते नेते कोणत्या प्रकारची भाषणे करीत, शब्द कोणते वापरीत याचे फारसे ज्ञान नसे. १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली. त्यात बरेच काही घडले. त्यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या देवकांत बरुआ यांनी १९७६ च्या सुमारास ‘इंदिरा इज इंडिया ॲण्ड इंडिया इज इंदिरा' असे जाहीर करायलाही मागेपुढे पाहिले नव्हते. त्यानंतर १९७७ च्या सुमारास जनता पक्षाने नांगरधारी शेतकरी चिन्हावर देशभर निवडणूका लढवल्या व ‘इंदिरा इज इंडिया' म्हणणाऱ्यांचा धुव्वा उडवून केंद्रात सत्तेमध्ये आले. त्यावेळी रिवशातून, जीपमधून प्रचार होई. घरे, दुकानाच्या भिंती प्रचार मजकूराने बरबटून ठेवल्या जात. टी. एन. शेषन तोवर देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले नसल्याने आचारसंहिता अस्तित्वात होती; पण तिचे पालन कुणी करीत नसत. अगदी विरोधी पक्षांनाही त्याचे सोयर सुतक नसे. रात्री बारा-एक वाजेपर्यंतही निवडणूक प्रसारसभा चालत असत.

   तेंव्हाच्या निवडणूक प्रचारातील एक घोषणा मला आठवते...‘वाह रे इंदिरा तेरा खेल सस्ता बेवडा मेहंगा तेल' असे जनता पक्षाचे कार्यकर्ते रिवशा, जीपमधील लाऊडस्पीकरवरुन दारोदार ओरडून सांगत असत. लोकांनी प्रचंड बहुमतांनी निवडून दिलेले जनता पक्षाचे सरकार केवळ अडीच वर्षातच कोसळले. कारण सरकारमधील सारेच विद्वान! कुणीच कुणाचे ऐकेना. पुन्हा १९८० साली इंदिरा गांधी प्रचंड बहुमतांनी निवडून आल्या व पंतप्रधान बनल्या. त्या वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीत काँग्रेस (इंदिरा) हा पक्ष सर्वाधिक जागा मिळवून सत्तेत आला. दरम्यानच्या काळात शिवसेना हा प्रादेशिक पक्ष मुंबई, ठाणे परिसरात आपले बऱ्यापैकी अस्तित्व दाखवून होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खासगीत, जाहीर सभेत, वर्तमानपत्रांतून विविध पक्षांच्या लोकांची, नेत्यांची, विरोधकांची चंपी केलेली असे. बाळासाहेबांनी तोंडातून गेलेल्या शब्दांबद्दल दिलगिरी वगैरे कधी व्यक्त केली नाही. काही देशद्रोही, पाकधार्जिण्या अल्पसंख्य लोकांसाठी त्यांनी पाकडे, साप, लांडे, विंचू असेही शब्दप्रयोग केले. मतभेद असलेली व्यक्ती कितीही मोठी असली तरी बाळासाहेब त्या व्यवतीला सोडत नसत. मृणाल गोरे यांना त्यांनी ‘पुतना मावशी' म्हटले होते. तर स्वतःचे गुरु असलेल्या पु. ल. देशपांडे यांना ‘झक मारली आणि पुरस्कार दिला' असे म्हणायला मागेपुढे पाहिले नाही. त्यावेळी ‘आपलं महानगर' हे सायंदैनिक चालवणाऱ्या निखिल वागळे यांना ते ‘माहिमचा महारोगी' म्हणत असत. सांगायचे तात्पर्य हेच की अलिकडे सोशल मिडियामुळे आताच्या नेतेमंडळींनी उधळलेली मुक्ताफळे लागलीच तळागाळापर्यंत पोहचतात, पण म्हणून पूर्वीची नेतेमंडळी कठोर शब्दांचे प्रयोग करीतच नसत असे समजायचे काहीच कारण नाही.

 १९९५ च्या सुमारास शिवसेना-भाजपा यांचे सरकार महाराष्ट्रात आले आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. तेंव्हा विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधक घोषणा देत असत..‘जोशी मुंडे दोनो गुंडे.' त्या आधी छगन चंद्रकांत भुजबळ यांनी १९९१ च्या सुमारास शिवसेना सोडून काँग्रेसची वाट धरली. तेंव्हा बाळासाहेब ठाकरे भुजबळांना ‘लखोबा लोखंडे' म्हणत असत. मग काही पत्रकारांनी बाळासाहेबांना विचारले की, ‘छगन भुजबळ लखोबा.. तर मग मनोहर जोशी कोण?' असल्या प्रश्नांना उत्तरे देण्यात तरबेज असलेले बाळासाहेब क्षणाचाही विलंब न लावता म्हणत की, ‘ते लखोबा तर हे लाडोबा!'  हळुहळु भारतीय राजकारणातून तत्व, सत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा, इमानदारी, पक्षशिस्त इत्यादी गोष्टी गायब होऊ लागल्या. अपवाद कम्युनिस्ट पक्ष!  अलिकडच्या काळात मी, माझे राजकीय करिअर, माझ्या कुटुंबाचेच भले, माझ्या घरातच सत्ता आणि सत्तापदे या गोष्टी केंद्रस्थानी आल्या. सकाळी एका पक्षात असलेला नेता संध्याकाळी कोणत्या पक्षात जाईल आणि कुणावर टीका करेल याचा काहीच नेम राहिला नाही. २०१४ च्या सुमारास ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?' या जाहिरातीने लोकप्रियता मिळवली. त्या पाठोपाठ ‘अबकी बार मोदी सरकार' ही जाहिरातसुध्दा गाजली. सध्या ‘अबकी बार चारसौ पार' पाहायचे दिवस आले आहेत. सोबतीला ‘आयेगा तो मोदीही', ‘हाथ बदलेगा हालात' हे आहेच. याच दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा विरोधी लोकांवर टोकाची व खालच्या पातळीवरील टिका करताना संदर्भ सोडून जोडलेल्या व्हिडिओंचा वाढता वापर झाल्याचे आपण पाहात आहोत. सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही घडलेल्या घटनेचा व्हिडिओ कधी मुळ स्वरुपात तर कधी मॉर्फ करुन वापरला जातो व जनमानसात खळबळ माजवण्यात येते. जोडीला काेंबडीचोर, मनोरुग्ण, कमळाबाई, टोमणेबाई, काँग्रेसकी विधवा, घरकाेंबडा, पप्पू, फेकू, धरणात मुतणारा, भुतनी, माकड, पंधरा सेकंदात संपवू, ‘निकम यांना लोकसभेत नव्हे..जेलमध्ये पाठवायला हवं' (किरण मने यांची पोस्ट) असे सारे काही सतत सुरु आहे.

   अलिकडच्या काळात तर  नेत्याच्या राजकीय उलाढालीशी संबंध नसलेल्या त्याच्या घरच्या पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात अशा घटकांनाही टार्गेट करीत त्यांच्यावर खालच्या शब्दात भाषेचा वापर झालेला पाहण्याचे दिवस आले आहेत. पक्षाचे अध्यक्ष, नेते, कार्यकर्ते, अनुयायी यांच्या जोडीने सोशल मिडियावरील सायबर सेलचा फौजफाटाही उतरल्याने निवडणूका असोत, नसोत..या भाषेने साऱ्याच मर्यादा ओलांडल्या असल्याचे तुम्ही आम्ही आज पाहात आहोत. कोण कुणाची बी टीम यावरुनही मोठे वादंग सुरु आहेत. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी आणि ओवैसी यांची एमआयएम या भाजपच्याच बी टीम असल्याचे सांगितले जात आहे. युट्युब, इंस्टाग्राम, टि्‌वटर, फेसबुक पेज, फेसबुक ग्रुप्स अशा साऱ्या बाजूंनी चालवलेल्या प्रचार, अपप्रचारात समाजमान्य, संसदीय, कुटुंबात बोलायच्या भाषेला तिलांजली देऊन झाली आहे आणि खुलेआम माता-भगीनींवरुन शिविगाळ केली जात आहे. तुम्ही यातील कुणाच्याही बाजूचे असा अगर नसा..तरीही तुम्हाला याचा मनस्ताप होणे हे क्रमप्राप्त आहे. भाजपची बाजू घ्याल तर अंधभक्त, गोदी मिडियावाले, फेकू गँग आणि भाजप विरोधक असाल तर लिब्राडू, फेवयुलर, पाकधार्जिणे, चप्पलचाटे, लाळघोटे, गांधी-नेहरु परिवाराचे बूटचाटे तसेच ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'वाले असतील तर त्यांना ‘संघोटे' आणि आंबेडकरी चळवळीतील असतील तर त्यांच्यासाठी ‘भिमटे' असे शब्दप्रयोग केले जात असल्याचे तुम्ही पाहात असालच. जे गेंड्याच्या कातडीचे समजले जातात, त्यांना यामुळे काही फरक पडत नाही. पण सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कारी, संवेदनशील व्यवती यामुळे खूप दुखावल्या जातात. शाळेतील शिक्षक, घरात आई-वडील, बाहेर समवयीन मित्र मैत्रीणी, शेजारी-पाजारी यांच्याकडून कळत-नकळत कठोर शब्दांमुळे अपमानित झालेली किशोरवयीन मुले-मुली यांनी आत्महत्या केल्याच्या घटना अलिकडे सतत वाढत आहेत. किशोरवयीनच का, कोणत्याही वयाच्या संवेदनशील व्यक्तीला जिव्हारी घाव लागणाऱ्या शब्दात डिवचले तर ती दुःखी होणारच! अशा परिस्थितीत या प्रकारची भाषा या मुलांवर, हळव्या मनाच्या व्यवतींवर काय दुष्परिणाम करीत असेल याचा ज्याने त्याने स्वतःशीच विचार करावा.

निवडणूका महिना-दीड महिना चालणाऱ्या..मात्र समाजात तुम्ही-आम्ही सारे नित्यनेमाने एकमेकांच्या  सोबतीने, साथीने, एकत्र येत वावरणार आहोत. रोज एकमेकांना भेटणार आहोत, परस्परांच्या सुखादुःखात सामील होणार आहोत, याचे योग्य ते भान जरी ठेवले तरी वाईट, असंसदीय, पातळी सोडून वापरण्यात येणारे शब्द टाळून बोलता, लिहिता, वावरता येईल. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 मतदान हक्क असून बेदखल केल्यास शिवकाळात काय झाले असते?