५ जून पर्यंत मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सूट

ठाणे : सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके १ एप्रिल, २०२४ रोजी तयार करण्यात आली असून त्याची लिंक करदात्यांना ‘एसएमएस'द्वारे पाठविण्यात आली आहे. तसेच मालमत्ता कराची छापील देयकेही वितरीत करण्यास सुरुवात झाली आहे. करदात्यांनी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर (थकीत रवकमेसह) एकत्रितपणे महापालिका कडे १५ जून पर्यंत जमा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करावर १० टक्के सूट देण्यात येणार आहे.

करदात्यांना सवलत...

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा संपूर्ण मालमत्ता कर (थकित रकमेसह) एकत्रितपणे महापालिका कडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत दिली जाते. १५ जून पर्यंत १० टक्के, ३० जून पर्यंत ४ टक्के, ३१ जुलै पर्यंत ३ टक्के आणि ३१ ऑगस्ट पर्यंत कर भरणा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके एसएमएस आणि लिंकच्या माध्यमातून करदात्यांना १ एप्रिल, २०२४ पाठविण्यात आली आहे. या ‘एसएमएस'मध्ये मालमत्ता कर भरण्याची लिंक करदात्यास उपलब्ध करुन देण्यात आली असून, त्याला ठाणेकर करदात्यांनी उत्तम असा प्रतिसाद दिला आहे. ठाणेकरांच्या या प्रतिसादाबाबत महापालिका प्रशासनाने नागरिकांचे आभार मानले आहेत. मालमत्ता कराची देयके प्रिंट करुन आता करदात्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. तसेच propertytax.thanecity.gov.in  या लिंकच्या माध्यमातून कराची देयके उपलब्ध असून याद्वारे कर ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  


सवलतीचा तपशीलः
कालावधी                                          सुट (%)
 दि. १ एप्रिल ते १५ जून २०२४              १० %
 दि. १६ ते ३० जून २०२४                  ४ %
दि. १ ते ३१ जुलै २०२४                     ३ %
दि. १ ते ३१ ऑगस्ट२०२४                   २ %

कर संकलन केंद्रे सुरु...
 महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्र तसेच मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्रामधील संकलन केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायं. ५.३० वाजेपर्यंत तसेच शनिवारी आणि सर्व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते सायं. ४.३० वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहेत.

मालमत्ताधारक आपला मालमत्ता कर क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड, चेक, डीडी तसेच रोखीने भरणा करु शकतात. तसेच Google Pay. PhonePe, BHIM APP, Paytm मार्फत सुलभतेने मालमत्ता कराचा भरणा करु शकतात. ठाणेकर करदात्यांनी मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे.

-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई मधील बाजारात ‘रानमेवा' दाखल