वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे      

मानवी जीवनात वृक्ष वेलीचे महत्व मोठे आहे. वृक्ष हे मानवाचे साथीदार असे म्हटले जाते. त्यापासून आपणास ऑक्सिजन तर मिळतोच; पण याशिवाय फळे, फुले, लाकूड, इत्यादी गोष्टी सुद्धा मिळतात. वृक्षराजी बघितली की आपले मन प्रसन्न व आनंदी होते. प्राचीन काळापासून वृक्षाचे महत्व मानवाला आहे दुसऱ्यासाठी कसे जगावे हा मूलमंत्र मानवाने वृक्षापासून शिकावा; पण त्या वृक्षांची आजची अवस्था काय आहे ?

 शहरीकरण, औधोगीकरण व विकास  या नावाखाली प्रचंड वृक्षतोड सर्वत्र होत आहे. जंगले नष्ट होत चालली आहेत. अर्थात त्याचे परिणाम पर्यावरणावर जाणवू लागले आहेत. भारतातही अनेक ठिकणी तापमानाचा पारा ४५ अंशावर आत्ताच पोहचला आहे. जगाच्या दृष्टीने वृक्षराजीबाबत विचार करता भारताचा क्रमांक जगात दहावा आहे. भारतात मध्य प्रदेश हे राज्य वृक्षाच्या व जंगलाच्या दृष्टीने आघाडीवर आहे. सध्या महाराष्ट्रातील जंगलाचे प्रमाण १६ टक्के एवढे आहे. राष्ट्रीय लक्ष गाठण्यासाठी आपणास खूपच प्रयत्न करावे लागतील.

पर्यावरण व सृष्टीचा एकूण समतोल राखण्याच्या दृष्टीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम नियोजन पद्धतीने घेणे आवश्यक आहे. त्याबरोबरच लावलेली झाडे जोपासणे महत्वाचे आहे. वृक्ष लागवड करून त्याची योग्य जोपासना न केल्यामुळे झाडे नष्ट होण्याचे प्रमाण मोठे आहे. थोडक्यात वृक्ष लावा व वृक्ष जगवा ही मोहीम राबविल्यास योग्य होईल. महाराष्ट्रात मुलगी सासरी जाताना तिची आठवण म्हणून वृक्ष लावून स्मृती जपणारी अनेक गावे आहेत. हे वृक्षराजी टिकविण्याच्या दृष्टीने भावनात्मक पाऊल आहे. जंगले वाचविण्यासाठी व वृक्षराजी टिकविण्यासाठी अलीकडील काळात १९७३ साली चिपको आंदोलन उत्तराखंड राज्यात मंडल गावात सुरु झाले. नंतर ते हिमाचल प्रदेश व राजस्थानच्या अनेक भागात पसरले. या आंदोलनात स्त्री पुरुष जंगलातील झाडांचे कापण्यापासून संरक्षण करतात. सुंदरलाल बहुगुणा यांचं नेतृत्वाखाली या चळवळीने वेग घेतला आहे. त्यांची प्रचार घोषणा आहे Ecology is permanent economy.

आजकाल जंगलात वणवे लागण्याचे प्रमाण सुद्धा मोठे आहे . मध्यंतरी ऑस्ट्रेलिया देशात वणव्यामुळे हजारो एकर जंगल नष्ट झाले. त्यामुळे पर्यावरणाची हानी झाली अगदी अलीकडेच उत्तराखंड मध्ये मोठ्या वणव्यामुळे अनेक हेक्टर जंगल नष्ट झाले व पर्यावरणाची मोठी हानी झाली. अनेक पशु पक्षी नष्ट झाले. जगात अनेक ठिकणी वणव्याचे  प्रकार होत आहेत  जंगले मोठी होण्यात अनेक वर्षे जातात पण वणव्यामुळे ती क्षणात नष्ट होतात. वृक्ष ही आपली संपत्ती आहे ह्या दृष्टीने  जंगलाकडे सर्वानी पाहिले  पाहिजे.
भारतातील अनेक राज्ये वृक्ष लावण्याचा उपक्रम दरवर्षी राबवितात; तथापि त्यातील किती झाडे जगली याचे गणित आवश्यक आहे. सरकारी अनेक जागा रिकाम्या असतात. रेल्वेच्यासुद्धा अनेक जागा पडून आहेत. त्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यास हरकत नसावी. शालेय मुलांना वृक्षाचे महत्व पटवून सांगावे व शाळेतसुद्धा जेथे जेथे मोकळी जागा असेल तिथे वृक्ष लावावेत. गावातील ग्राम पंचायती व शहरातील नगर पालिका तसेच महानगर पालिका यांनी दरवर्षी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबवावा व वृक्ष लावणारास उत्तेजन द्यावे. याशिवाय काही दिवसापूर्वी नवीन वधूला एक झाड देऊन त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी तिला देण्यासारखे उपक्रम राबविण्यास हरकत नाही.  

हल्ली वृक्ष तोडून त्याचा कागद तयार केला जातो, याला दुसरा पर्याय शोधावा. तसेच पेपरलेस ऑफिसची संकल्पना राबवावी. सरकारी ऑफिस, आस्थापना, कारखाना  इत्यादी ठिकाणी पेपरलेस ऑफिस कसे काय्रान्वित होईल हे पहावे. काही राज्यांचं विधानसभेमध्ये पेपरलेस ही संकल्पना राबविली जात आहे. हेसुद्धा स्वागतार्ह पाऊल आहे. लोकसभेत पेपर लेस संकल्पना राबविली गेली त्यामुळे कोट्यवधी रुपयांची बचत झाली आहे. अलीकडे रस्ते करताना खुपच जुनी झाडे  तोडली जात आहेत. त्यांचे संवर्धन दुसरीकडे केल्यास त्यांना जीवदान मिळेल. मध्य प्रदेशात नूरजहांँ नावाची एका आंब्याची जात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याची काही झाडेच शिल्लक राहिली आहेत. देशी आंब्याच्या काही जाती याचा मार्गावर आहेत. त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.  

या वृक्ष दिनाच्या निमित्ताने नवीन झाडे लावणे व असलेली झाडे जगविणे हे महत्वाचे कर्तव्य आहे. असे न केल्यास पुढची पिढी आपणास क्षमा करणार नाही या वृक्ष दिनाच्या निमित्ताने आपण एकतारी झाड नवीन लावूया ही प्रतिज्ञा करूया - शांताराम वाघ, पुणे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतातील शिल्पधन