राष्ट्रीय सेवा योजनाची निवासी शिबिरे

उत्कृष्ट अनुभवांची शिदोरी

दिवाळी संपली की नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष हिवाळी निवासी  शिबिरे दत्तक गावात घेतली जातात. सात दिवसाचे  ही शिबिरे  विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त लागण्याचे महत्त्वाचे केंद्र बनलेले आहेत. या संगणकीय युगातून व मोबाइलच्या मोहपाशातून सुटका करून मेंदूला वेगळी चालना देण्यासाठी  शिबिरात सहभागी होण्यासाठी तरूण तरूणी सज्ज होतात.

 दिवसाची आठ प्रहर तरुण तरुणी काम करतात.सकाळी साडेपाच ते संध्याकाळी साडेदहा या वेळेत ते कार्यरत राहतात. सकाळी पहाटे घरी कधी न उठणारे विद्यार्थी शिबिरात सगळ्यात लवकर उठायला लागतात. चहा बनवायला शिकतात. कांदा, लसुण, मिरची, टोमॅटो, बटाटा शिमला मिर्च इ. भरभर निवडायला व कापायला शिकतात. चहाचा कप, नाष्टा जेवणाचे ताट, स्वतः धुतात. स्वतःची कामे स्वतः करतात. स्वतः मध्ये नेते गीरी व आत्मविश्वास निर्माण करतात. मीही करू शकतो! ही भावना त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

वादविवाद, वक्तृत्व, एकपात्री, पथनाट्य, सूत्रसंचालन इ. महत्त्वाच्या कार्यक्रमात हे युवा हिरीरीने भाग घेतात.  माझा ग्रुप कसा सर्वोत्कृष्ट होईल या साठी जीवाचे रान करतात. सकाळी श्रमदान करीत गावकऱ्यांची मनं जिंकतात. आपल्याच भावाबहिणीने बनवलेले चहा, नाष्टा, दुपार आणि संध्याकाळचे जेवण आवडीने खातात. शिबिराची सुरूवात कवाईती व योगा करून होते. नंतर उठे समाज के लिये उठे, खरा तो एकची धर्म, हम होंगे कामयाब ई. प्रार्थना बोलल्या जातात. यामुळे एक वेगळीच ऊर्जा मिळते. नंतर श्रमदान करतात वनराई च्या कुशीत नदीवर वनराई बंधारा तयार करतात, गावकऱ्यांसाठी संडास बांधून देतात, नाले, मंदिरे व मैदान  व स्मशान भूमी इ. ची सफाई करतात.  दुपारच्या बौद्धिक सत्राची सुरुवात  छान रंगरंगोटी करून येणाऱ्या  पाहुण्यांसाठी प्रसन्न वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.  वन राईतील पाने, फुले गोळा करून पाहुण्यांसाठी छान गुच्छ बनवितात. देश सेवेसाठी एकनिष्ठ राहून राष्ट्रीय एकता-एकात्मता निर्माण करतात. वेगवेगळे उपक्रम राबवत ते सामाजिक समस्यांना हात घालतात व समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. शिबिरात तो विद्यार्थी तर असतो; पण त्यांच्यातील स्वयंसेवक सतर्क झालेला असतो. तो आळस झटकून दिवसाच्या आठही प्रहरी काम करण्यास सज्ज असतो. गावकऱ्यांसाठी रक्तदान, आरोग्य सेवा, नेत्र सेवा, रोजगार निर्मिती मार्गदर्शन, वीज बचत, जल संधारण, मतदार नोंदणी इ. उपक्रम राबवून यशस्वी करतात.

या सात दिवसात गावातील व वाडी वस्त्या वरील वातावरण फार बदलून जाते. मदतीसाठी प्रत्येक ग्रामस्थ पुढे येतो. हे करतकरत असताना मात्र सूर्योदय व सूर्यास्त त्यांच्या साठी थांबलेला नसतो. यातच एक-एक दिवस पुढे सरकत जातो. आईची आठवण काहींना अस्वस्थ करते. आणि मग येतो समारोपाचा दिवस. मला बोलायचे, मला मनोगत व्यक्त करायचे यासाठी सर्वच उत्सुक असतात. पहिल्या दिवशी गुपचूप बसलेला मुलगा, मुलगी समारोपाच्या दिवसी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून मिरवत असतात. कौतुकाची थाप मिळावी म्हणून असुसलेले त्यांचे डोळे कधी भरून येतात हे त्यांनाही कळत नाही. आणी अशा या अश्रुपूर्ण नयनांनी ते त्या गावाचा निरोप घेतात.

शिबिर संपले तरी गावातील लोकांचे प्रेम व ऋणानुबंध कायम जोडलेले असतात. नवेआयुष्य जगायला  वक्तृत्व, लिडरशिप, जबाबदारी  आणि सामाजिक भागाची शिदोरी सोबत असते ती मात्र कायमची. - प्रा. डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे, नागोठणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी