मुशाफिरी

गावपण जाई देवाsss 

आपण कितीही नामांकित महानगरांतून राहात असलो तरी आपल्याला भूरळ घालते ते गाव...खेडेच! जिथे विहीर आहे, शेते आहेत, गायी-गुरे, वासरे आहेत, त्यांच्या शेणामुताचा वास येतोय, आजूबाजूला भरपूर झाडझाडोरा आहे, सुखद वारे वाहताहेत, पायाला थेट जमिनीचा स्पर्श होतोय, चुलीवरचे जेवण शिजतेय. घरावरील कौलांवरुन पावसाच्या पाण्याचे नर्तन स्पष्टपणे ऐकू येतेय, जवळच नदी आहे, तेथे डुंबण्याचा आनंद घेता येतो.. हे सारे हवेहवेसे वाटणारे आहे. मामाचा गाव, आजोळ, आईचे गाव, वडिलांचे गाव, मावशीचे गाव, आत्याचे गाव या साऱ्यातून आपण सारे जवळीक व्यक्त करतो ती गावाप्रतिच; महानगराप्रति नव्हे!!

   मी गेली अठ्ठावीस वर्षे नवी मुंबई महानगरात राहात आहे. अलिकडे नवी मुंबई देशाच्या नकाशावर स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत सातत्याने नावाजले गेलेले महानगर आहे. रस्ते, रेल्वे, जल या तिन्ही मार्गांनी राज्याच्या अन्य शहरांशी जोडली गेलेली नवी मुंबई आता लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यानंतर देशाशी व परदेशांशी हवाई मार्गानेही जोडली जाईल. पण तरीही मला आकर्षण आहे ते ‘त्या' काळच्या नवी मुंबईचेच..जेंव्हा नवी मुंबई ही ग्रामपंचायत काळात होती. १९८३ पासून मी नवी मुंबईशी जोडला गेलो आहे. त्यामुळे या महानगराच्या विविध स्थित्यंतराचा मी साक्षीदार आहे. नमनालाच इतके घडाभर तेल घालण्याचे कारण म्हणजे याच नवी मुंबई शेजारीच आता उरण, पेण, पनवेल या तीन तालुवयांतील १२४ गावांचे मिळून आणखी एक महानगर अर्थात नवनगर वसवण्याचे एमएमआरडीए ने निश्चित केले आहे. म्हणजे लवकरच याही गावांचे गावपण संपणार आणि ती गावे महानगराच्या वाटेला लागणार किंवा त्यांची वाट लागणार!

   माझा जन्म मुंबईच्या जे जे हॉस्पिटलचा, बालपण व शिक्षण कल्याणमधील खेड्यात व त्यानंतर कल्याण शहरात आणि आता पुढील आयुष्य चाललेय नवी मुंबईत! त्यामुळे खेडे, शहर आणि महानगर या साऱ्या ठिकाणचे अनुभव मी घेतलेले आहेत. मुंबईतील गर्दी कमी व्हावी म्हणून नवी मुंबई वसवण्यात आली. पण नवी मुंबईचेही तेच झाले. मग ही गर्दी पनवेलकडे सरकली. त्यानंतर तिसरी मुंबई, चौथी मुंबई अशा मुंबईच्याच आवृत्या काढण्याचे काम सुरु राहिले आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल-उरण, अंबरनाथ-बदलापूर, ठाणे-शहापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार, पेण-खोपोली-अलिबाग या आसपासच्या शहरांमधील गावांचा घास या नागरीकरणाने घेतला व या शहरांच्या आसपास असणाऱ्या खेडेगावांचे गावपण हळुहळू..पण निश्चितपणे संपत चालले. जरा शांतपणे विचार करा. जमिन नव्याने तयार होत नाही. तिची मर्यादा ठरलेली असते. मग ही महानगरे वसवण्यासाठी किती शेतजमिन, किती वनराई, किती वृक्षराजी, किती डोंगर, टेकड्या नष्ट केल्या गेल्या? कळवा-मुंब्रा येथील डोंगर, दिवा येथील खाडीकिनारा, शेती, कांदळवने यांची नासधूस करुन कशा चाळी उभ्या राहिल्या आहेत यावर नजर टाकल्यास आपण काय गमावले आहे हे ध्यानात येईल. कल्याण-डोंबिवली-ठाणे येथील अनेक विहिरी, तलाव बुजवून अपार्टमेण्ट्‌स बांधल्या गेल्या. बरं हे सारे होताना तेथील मूलनिवासी, स्थानिक मराठी माणसांचे काय झाले? तेथे नव्याने राहायला आलेले कोण आहेत? मुंबई नजिकच्या या साऱ्या नव्या नगरांमधून बहुसंख्येने राहायला आले किंवा खरेदी करुन तेथे भाडेकरु ठेवणारे मोठ्या प्रमाणावर आहेत ते परप्रांतीयच! त्यातही दुबईत जाऊन पैसे कमावलेले व ‘तुम सिर्फ दाम बोलो..हम पैसा खडा करेंगे' म्हणणारे अधिकतर आहेत. लव्ह जिहाद, मुलींना फसवणे, त्यांचे तुकडे करणे, चरस-अफू-गांजा-एलएसडी व तत्सम नशिल्या पदार्थांचा चोरटा व्यापार, वाहनचोरी, सायबर गुन्हे, देहविक्री व आणखी काय काय समाजविघातक बाबी यातील काही लोकांकडून सातत्याने होत असतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, पालघर जिल्हा या एकमेकांना खेटून असणाऱ्या भागातील पोलीस ठाण्यात नोंदल्या गेलेल्या तक्रारी, सजा ठोठावलेले गुन्हेगार यांची यादी जरी पाहिली तरी यात व्यस्त असणारे लोक कोण आहेत हे सहज ध्यानात येईल. या साऱ्यांनी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) परिसरातील सामाजिक समतोल बिघडवायला घेतला आहे असे म्हटले तर ते अजिबातच धारिष्ट्याचे होणार नाही. या सगळ्यांना आमच्या स्थानिकांनी का झेलावे? का सहन करावे?

   हल्ली रायगड जिल्हा व त्यातही पनवेल, उरण, अलिबाग, पेण हे तालुके जलद प्रगतीच्या मार्गावर आहेत. शिवडी-न्हावा शेवा अर्थात मुंबई पारबंदर सागरी मार्ग मुंबईतून नवी मुंबईत केवळ वीस-बावीस मिनिटांत पोहचवणार असून येत्या लोकसभा निवडणूकांपूर्वी तो कदाचित वापरात यायला सुरुवात झाली असेल. लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळही वर्षभरात सुरु होईल. नेरुळ-बेलापूर ते उरण हा रेल्वेमार्गही पू्‌र्णपणे बांधून तयार असून पंतप्रधान कार्यालयाने वेळ देताच त्याचेही लोकार्पण होईल. हे सारे पनवेल व उरण तालुवयांत होत आहे. त्यासाठी स्थानिकांची जमिन मोठ्या प्रमाणावर संपादित केली गेली आहे. त्यांची गावेच्या गावे उठवली गेली आहेत. त्यांची शेते, गोठे, खळे, भाजीचे मळे, देवळे, गावातील शाळा हे सारे त्यांच्या डोळ्यादेखत नाहीसे झाले. त्या ग्रामस्थांच्या मनात काय भावना दाटल्या असतील? पैशांच्या स्वरुपात भरपाई त्यांना मिळाली; पण त्यांच्या पूर्वजांनी जपून ठेवलेल्या संचिताचा लचकाच तोडून नेला, त्या मानसिक आघाताची भरपाई कशी व्हावी? हे सारे त्यांच्या गावांच्या सभोवताली होत असताना आता मुंबईतून गोव्याकडे जाणाऱ्या हजारो वाहनांचे प्रदूषण त्यांना झेलावे लागणार आहे. रात्रंदिवस उतरणारी व उड्डाणे घेणारी विमाने तेथे प्रचंड मोठे आवाज नेहमी करणार आहेत. ते ध्वनी, हवाई प्रदूषण वेगळेच! या साऱ्या बाबी त्यांचे गावपण हिरावून घेणार हे निश्चित! कुणी म्हणेल की ही सारी रडकथा तुम्ही लावली आहे, जणू काही या भागाची कोणतीच प्रगती या विविध प्रकल्पांमुळे होणार नाही.

   प्रगती होईल, निश्चित होईल. स्थानिकांना रोजगार मिळेल, दळणवळणाची जलद साधने उपलब्ध होतील, त्यामुळे मुंबई-ठाण्याच्या विविध भागात पटकन पोहचणे शवय होईल, शिक्षणासाठी अन्य शहरांत लवकर जाणे-येणे सुकर होईल, बाजारपेठा-मॉल्स जवळपास होतील, रस्ते सुधारले जातील, उड्डाणपुलांचे जाळे विणले गेले आहेच, ते आणखी बळकट केले जाईल. हे सारे होईल; पण त्यात तुमचे गाव हरवून गेलेले असेल! स्थानिकांची अस्मिता, स्थानिकांची आराध्य स्थाने, स्थानिकांच्या रुढी-परंपरा, चालीरीती या साऱ्यांचा घास घेतलेला असेल...आणि एका नव्याच मिश्र, धेडगुजरी, संकरीत, सबगोलंकारी व्यवस्थेने इथे जागा बनवली असेल. सुमारे वीस वर्षांपूर्वी उरण तालुक्यात खोपटे हे नवे प्राधिकरण स्थापून तसे नवे उपनगर वसवण्याचे येथे घाटत होते. तशा आशयाच्या नकाशांचे फलकही उरण, पनवेल तालुवयात काही ठिकाणी पाहायला मिळायचे. त्यानंतर उरण, पनवेल, पेण या तीन तालुवयांत स्पेशल इकॉनॉमिक झोन अर्थात एस ई झेड ची घोषणा झाली होती. पण ते प्रकल्प गुंडाळले गेले. मात्र आता याच तीन तालुक्यांतील १२४ गावांच्या नव्या शहराबद्दल तसे होणार नाही. कारण ज्याला त्याला राहायला घर हवे आहे. त्यातही ते विमानतळ, रेल्वेस्थानक, बंदर, बसस्थानकाच्या आसपास मिळणार असेल तर कुणाला नको? मात्र या घरांचे लाभार्थी हे मोठ्या प्रमाणावर अ-मराठी लोक असणार आहेत. गिरगाव, मुलुंड, घाटकोपर, बोरीवली अशा मुंबईच्या काही भागात गुजराती लोकांची एकगठ्ठा वस्ती बनली व त्यातून पुढे त्यांची दादागिरीही सुरु झाली. ती इतकी वाढली की तृप्ती देवरुखकर या मराठी महिलेला मुलुंडमध्ये भाड्याने जागा मागायला गेली असता मराठी असल्याबद्दल अपमानित करुन व मारहाण करुन हाकलून देण्यात आल्याची घटना ताजी आहे. मुंबईत भेंडीबाजार, कुर्ला, बांद्रे, बैंगनवाडी, तसेच भिवंडी, मालेगाव अशी ठिकाणे विशिष्टधर्मियांची पॉकेट्‌स बनतात, जिथे स्थानिक मराठी माणसांनाही उपद्रव दिला जातो, अनेक प्रकारची गुन्हेगारी कृत्ये तिथे चालतात. कल्याणजवळच्या आंबिवली रेल्वेस्थानकानजिक अशीच इराणी गुन्हेगारांची वस्ती आहे. तिथे तर पोलीस गेले तरी त्यांच्यावर या इराणी गुन्हेगारांच्या कुटुंबियांकडून हल्ले चढवले जातात याचे अनेक व्हिडिओही उपलब्ध आहेत. हे सगळे या नियोजित नव्या महानगराबाबत घडू नये. गावाचे गावपणही शिल्लक राहावे, नव्याने राहायला येणाऱ्या परप्रांतीयांनी दुधात साखर विरघळावी तसे येथील लोकजीवनात विरघळून एकरुप व्हावे, एकोपा ठेवावा, उपरे असताना माजोरडेपणा, दादागिरी दाखवू नये ही अपेक्षा आहे.

   आपल्या महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे प्रगती झाली नाही, विकास पोहचला नाही. ती ठिकाणे नवीन शहरे वसवण्यासाठी निवडण्यात यावीत, तिथे रेल्वे, रस्ते,  पाणीपुरवठा, शाळा-महाविद्यालये, बाजार, दवाखाने या सुविधा उपलब्ध केल्या जाव्यात. म्हणजे सारी प्रगति, सारा विकास केवळ मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांभोवती केंद्रीत करुन प्रादेशिक समतोल ढळवण्याचे काम केले जात आहे, ते होणार नाही आणि महाराष्ट्रातील अविकसित भागालाही मुख्य प्रवाहात आणता येईल, गावांचे गावपणही बऱ्यापैकी शाबूत राहील आणि ‘चुलीवरचे जेवण' मिळवण्यासाठी महामार्गांवरची हॉटेले धुंडाळण्याची वेळ येणार नाही. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै.आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चांगभलं'