चांगभलं'

भिंतीवरी कॅलेंडर...असावे !  

कधीकाळी कॅलेंडर्स अस्तित्वात नसावीत. त्यावेळी ‘पंचांग' हेच एकमेव कालमापक पुस्तक उपलब्ध होतं. मात्र ते पंचांगही फक्त उच्चवर्गीय पंडिताकडेच असायचं. मग काही शुभकार्याचा मुहूर्त वगैरे पाहण्यासाठी अशा पंचांगधारी पंडिताकडे जाऊन मुहूर्त काढावा लागायचा. हल्ली नवनव्या रूपात कॅलेंडर येत आहेत. भिंतीवरच्या कॅलेंडरप्रमाणे टेबल कॅलेंडर, पॉकेट कॅलेंडर अशी विविध प्रकारची कॅलेंडर्स येताहेत.. आणि आता तर काय! जग मुठीत आल्याने, मोबाईलमध्ये कॅलेंडर असल्याने, घरी-दारी कुठेही, कधीही कॅलेंडर पहाता येते.

कुणा, नॅस्ट्राडॉमिनस नामक जर्मन भविष्यकाराने म्हणे, भयानक भविष्य चारशे वर्षांपूर्वीच लिहून ठेवलंय, त्यानुसार तिसरे महायुद्ध होऊन लवकरच जगाचा सर्वनाश होणाराय म्हणतात. गेल्या काही वर्षाभरातल्या घटना पाहिल्यानंतर माणूस आतून पुरता हादरलाय, एवढं मात्र खरं!

       एकीकडे विसाव्या शतकाची सुप्रभात होऊन दुपार होत आलीय आणि त्याबरोबरच भेसूर भविष्याविषयी आशंकांनी मन दाटू पाहतेय. तरी काळ थांबणार नाही. मुळात काळाला थांबता येतच नाही. न थांबो बिचारा!

       दसरा गेला, दिवाळी आली, किती किती गंमत झाली. सुखद थंडीत लपेटून एकतीस डिसेंबरची रात्र येईल. सरत्या सालाला निरोप आणि येत्या वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने माणसं खूप मजा मारतील, खातील, पितील, नाचतील, गातील, आणखी काय काय करतील! नववर्षाच्या शुभेच्छा देण्याचा सोपस्कार सराईतपणे घाऊक प्रमाणात पार पडतील. नववर्षाच्या कॅलेंडरच्या सुरनळ्या  लोकलच्या गर्दीतून न चुरगाळता घरी नेतील आणि सालाच्या बारा पानावर आशाळभूतपणे नजर टाकून भिंतीला टांगतील. एक अख्खं साल...त्यांच्या भिंतीला टांगलं जाईल.  कॅलेंडर मग ते ‘कालनिर्णय घ्या हो' असेल किंवा ‘निर्णय सागर न्या हो' असेल. कॅलेंडर कोणतं चांगलं हा वादाचा मुद्दा होऊ शकतो..पण, महिन्याच्या तीस-एकतीस चौकटीत, सुट्टयांच्या चांगल्या आठ-दहा लाल चौकटी र्दिशाविणारं कॅलेंडर, ‘आराम हराम है'चा  संदेश देणा-या जवाहरलाल नेहरूंच्या आजच्या भारतीयांच्या मनाला सुखावते.

       कधीकाळी कॅलेंडर्स अस्तित्वात नसावीत. त्यावेळी ‘पंचांग' हेच एकमेव कालमापक पुस्तक उपलब्ध होतं. मात्र ते पंचांगही फक्त उच्चवर्गीय पंडिताकडेच असायचं. मग काही शुभकार्याचा मुहूर्त वगैरे पाहण्यासाठी अशा पंचांगधारी पंडिताकडे जाऊन मुहूर्त काढावा लागायचा. पंचांग जरी इतरांनी विकत घेतले तरी ती वाचता आणि वाचता आले तरी त्याचा अर्थ समजणे इतरेजणांच्या कृवतीपलीकडे असायचं. साधी ‘एकादशी' कधी आहे ही विचारणा करण्यासाठी जोशीबुवांकडे पोराटोरांना पिटाळलं जायचं. काही गावात तर ‘गुरुवारी एकादशी' म्हणून जोशी बुवा घरोघर सांगत फिरत व त्या बदल्यात पसापसा धान्य गोळा करीत. ‘उद्याची...आवस' अशी आरोळी मात्र मातंग मावशी दारात उभे राहून द्यायची आणि पोटासाठी तेल पीठ मागायची.

     कॅलेंडर म्हटलं म्हणजे, एकदम आठवते, पुढ्यात सूप घेऊन विड्या वळणाऱ्या लावण्यवती बाईचे चित्र असलेले, भिकुसा  विडीचे कॅलेंडर. टेलरच्या दुकानातल्या कोऱ्या कापडांचा वास आणि किराणा दुकानातला तेल, गुळ-तंबाखूचा मिश्रित सुगंध घेत बावरल्यासारखे उभ्या असताना...समोरच्या भिंतीवरील कॅलेंडरवरच्या भिकूसा विडी कॅलेंडर मधली ती, मन लावून विड्या वळणारी बाई ...पटकन नजर उचलून आपल्याकडे पाहणार नाही ना ? अशी शहारा उठवणारी शंका यायची. ‘काय घ्यायचं रे कार्ट्या? आरं ध्यान कुठं हे तुझं ?अजून कोंबडं तरी आरवतय का रं तुझं ? वाणी दादा करवादायचा. मुठीतली पावली घामाळायची. होल महाराष्ट्रात त्या काळी त्या कॅलेंडरला तोड नव्हती. ती बाई तशी कोणी ‘मिस इंडिया किंवा प्रसिद्ध प्रचुर' अभिनेत्री 'नव्हती. मात्र खाली नजर झुकवून, एकाग्रतेने काम करणाऱ्या, त्या भारतीय मोनालिसाने घराघराच्या भिंती, एकदम देखण्या आणि आकर्षक करून टाकल्या होत्या.

       वर्षे उलटली, भडक, रंगीबेरंगी, नवनवी कॅलेंडर्स आली, फाटली, कचऱ्यातून उकिरड्यावर जाऊन पडली. पण  ‘बिडीवाली बाई' मात्र दहा दहा वर्षे घराच्या भिंतीवरून खाली उतरली नाही. कैक हौशीी धन्यांनी तर, तिला काचेच्या तस्बिरीत मढवून कायमचं आपल्या घरी ठेवून घ्ोतलं आणि भिंतीवरच्या पंगतीत, थेट समर्थांच्या शेजारी बसवलं! अजूनही कुठेतरी घोंगडीवर बसून, चहा घेता घेता सहज व आढ्याकडं बघावं तर, धुरकटलेल्या तसबिरीत बाई निमूट विड्या वळीत बसलेली दिसते आणि बघता बघता घराचा चिरेबंदी वाडा होतो. बाई पुढ्यातलं बिड्याचं सूप दूर सारून उठते. लपफेदार इरकली नेसते, भाळावर बंद्या रुपया एवढं कुंकू लावून...जरासं आळसून पाटलिणीच्या दिमाखात झोपाळ्यावर बसून झुलायला...लागते. नकळत गाणं मनात घुमायला लागतं.  ‘राजसा...जवळी जरा बसा !...जीव हा पिसा ! तुम्हाविन बाई...कोणता करू शिणगार...सांगा तरी...काहीऽऽ!'.

         सुरुवातीच्या काळात कॅलेंडर्सचा सारा भार मुख्यतः देवादिकांवर असायचा. एका घराच्या चार भिंतीवर तेहतीस कोटी देवांपैकी किमान डझनभर तरी देव, आशीर्वादाचा पंजा दाखवत, एकजात सोजि-या चेहऱ्यावरून ममत्व सांडीत मौजूद असत. शंकर-पार्वती, मागे कैलास पर्वत, पुढ्यात नंदी घेऊन, गळ्यात नाग आणि जटातून वहाती गंगा सांभाळीत उभी असत. शेषाच्या अंगावर विष्णुपंत निवांत पडून पत्नीकडून पाय दाबून घेत तर, लक्ष्मणाला आलेली मुर्च्छा घालविण्यासाठी, वीर हनुमंत अख्खा डोंगर, एका हातावर, चहाची कपबशी घेतल्यासारखा, आकाशातून उड्डाण करीत चाललेला असायचा! तर कधी श्रीरामचंद्र आपल्या अखेरच्या बाणाने दहातोंड्या रावणाचा शिरच्छेद करू पहात तर, पलीकडे लव-कुश बाळांनी रामाचा ‘अश्वमेध' धरून, फोटोसाठी पोज दिलेली. एखाद्या दृश्यात कुरुक्षेत्रावरील महायुद्धाचा समर प्रसंग दिसायचा. कौरव-पांडव सैन्यदल, दोन्ही खेळाडू संघाची, खेळ सुरू होण्यापूर्वी ओळख करून घेण्यासाठी उभे करतात तसे समोरासमोर ठाकलेले. मध्येच गळफटलेल्या अर्जुनाला गीतेचे अमृत पाजून पुन्हा ‘तयार' करू पाहणाऱ्या कृष्णाची चित्रं मात्र फारच टेरिफिक दिसायचं. एवढ्या पौराणिक दृश्यात अगदी बिनधास्त देखावा असायचा, गोपींची वस्त्रं चोरून कदंबावर बसलेला कान्हा व खाली तळ्याच्या स्वच्छ, नितळ पाण्यात ओलेत्या, एकसोएक, मादक टंच गोपी.

       पहिल्या पाळीला जाणारा गिरणी कामगार येरवाळी उठून, असेल तितक्या पाण्यात अंघोळ उरकतो, देवापुढे अगरबत्ती फिरवतो, सहाणेवर अष्टगंध उगाळून, अलगत स्टुलावर चढतो, अपुऱ्या उजेडात, अगदी अदबीनं, केवळ अंदाजानं असेल तितक्या तसबीरीतल्या देवादिकांना गंधाची बोटं लावतो. गोपींची वस्त्रं चोरून कदंबाच्या झाडावर डूक धरून बसलेल्या कृष्णाच्या देहाच्या कुठल्याही भागावर गंधाचा ठसा उमटला तर चालतो मात्र, खाली पारदर्शक पाण्यात उभ्या अर्धउघड्या एकजात गौरवर्ण गोपिकांच्या अनावर देहाच्या, पहात रहावं अशा भागावर, भावुकपणे किंवा भाविकपणे अष्टगंधाचा भलाथोरला ठसा लावला जातो. तो तिथेच वाळून जातो. झाडावरचा अचेतन कृष्णही कपाळावर हात मारून घेतो. गोपींची वस्त्रं चोरणारा तोच कृष्ण, नंतर केव्हातरी महाभारतात वस्ररहरणाच्या वेळी द्रोपदीला वस्त्रं पुरवीत असल्याचे कॅलेंडरही पाहायला मिळायचं.

        देवादिकांचा साठा संपल्यानंतर कॅलेंडर्स इतिहासाच्या नादाला लागली. त्यात मुख्यतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज रुबाबात रायगड उतरत आहेत. एका ठिकाणी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची सन्मानपूर्वक पाठवणी करताहेत. बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड जिगरबाजपणे लडत आहे. अशी रोमहर्षक दृश्ये कॅलेंडरवर चितारलेली असायची. ती पाहताना मन आणि छाती भरून यायची. कॅलेंडरवरचा इतिहास पुढे सरकायचा. राणा प्रताप. झाशीची राणी ( पाठच्या पोरासह) ‘सुपर' निघालेली. मिठाचा सत्याग्रह करायला गांधीजी तरातरा निघालेत. नेहरू लाल किल्ल्यावरून कबूतर उडवतात तर, दुसऱ्या ठिकाणी जॉन केनेडी बरोबर बागेत फेरफटका मारताहेत. तिरप्या हॅटचा रूबाबदार भगतसिंग, भरदार छातीचा पिळदार दंडाचा राजगुरू, मिशीला भरतोय. अशी मनोहरी दृश्य दिसायची आणि छाती देशाभिमानाने भलतीच फुगायची.

        याशिवाय, निरनिराळ्या खत कंपन्यांची बी-बियाणांची, कीटकनाशकांची, किर्लोस्कर इंजिनाची, त्याचा वापर केल्याने बहरलेल्या हिरव्यागार मळ्यासहित व फुललेल्या मालकीणीसह बहारदार चित्रं असायची. मध्येच कधीतरी दलालांच्या कुंचल्यातून साकारलेल्या लावण्यवती कॅलेंडर सजवत असत, घराघरातल्या भिंती रंगीत होत आणि कित्येक रूक्ष संसारात सप्तरंग भरले जात.

         अजूनही सालाबादप्रमाणे नवनव्या रूपात दरवर्षी कॅलेंडर येत आहेत. भिंतीवरच्या कॅलेंडरप्रमाणे टेबल कॅलेंडर, पॉकेट कॅलेंडर अशी विविध प्रकारची कॅलेंडर्स दरवर्षी न चुकता हजर होत आहेत. आणि आता तर काय! जग मुठीत आल्याने, मोबाईलमध्ये कॅलेंडर  असल्याने, घरी-दारी कुठेही, कधीही कॅलेंडर पहाता येते. त्यामुळे सर्वांना काळासोबत सहज जगता येते.

 कॅलेंडरचा उपयोग, समस्त महिलांना मोठ्या प्रमाणात होतो. भाविक महिला संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री कधी सोडायचा ते पाहून स्वयंपाकात लागतात, गॅस, मासिक पाळी कधी आली, कामवालीचे खाडे, दुधाचे खाडे अशा तारीखवार नोंदी, कॅलेंडरवर करून संसाराचा हिशेब ठेवतात आणि मुख्य म्हणजे, ह्यांच्या पगाराला आणखी दिवस राहिलेत. हे पाहून संसाराचे बजेट आणि तोल सांभाळतात. भितीवर कॅलेंडर असले नसले तरी, घर संसारच काय, सारे काही कॅलेंडरनुसारच चालते आणि काळ घड्याळानुसार, न थांबता, चालतोच चालतो! -साहेबराव ठाणगे, मो. ९८२००९३८६७ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पंचनामा