देवभूमी केरळहुन...!

देवभूमी केरळहुन...!

   आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतके प्रान्त, इतक्या भाषा, इतके धर्म, इतके भेद आणि तरीही चांगली एकात्मता अन्य कोणत्या देशांत क्वचितच पाहायला मिळत असावी. आपलाच पूर्ण देश फिरायला, तेथील जनजीवन, रुढी, परंपरा, राहणीमान, लकबी, सवयी, सुंदर स्थळे, अभिमानबिंदू, पाककला, भोजनसिध्दी हे सारे अनुभवायला एक जन्म अपुरा आहे. म्हणून अनेक देशभक्तानी म्हणून ठेवले आहे की ‘आमची माता आणि आमची जन्मभूमी या स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहेत', ते काही उगाच नव्हे. उत्तरेतली अनेक राज्ये व जम्मू-काश्मिर पाहुन झाल्यावर यंदा केरळ-तामिळनाडूची सैर आखली होती. तुम्हा आम्हा अनेक मराठी माणसांचा केरळशी पहिला परिचय होतो तो जन्मापासूनच!

   तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या चार राज्यांना भारताचे दक्षिणी प्रान्त म्हणून संबोधले जाते. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन त्याच्या पोटातून तेलंगण बाहेर पडल्याने आता चाराऐवजी दक्षिणी प्रान्त पाच झाले आहेत. इतर सारी राज्ये  आणि आपले राज्य महा ‘राष्ट्र' म्हणून या जन्मभूमीचा रास्त (दुराभिमान किंवा अहंकार नव्हे..तर साधा सिंपल..) अभिमान वाटण्यात गैर असे काहीच नाही. तुम्हा आम्हा अनेक मराठी माणसांचा केरळशी पहिला परिचय होतो तो जन्मापासूनच! कारण अनेकदा माता बाल रुग्णालयातील नर्सचे काम करणाऱ्या महिला या शक्यतो केरळीच असायच्या व असतातही!  चांगले शिक्षण, सेवाभाव आणि चांगले इंग्लिश हे केरळी शिक्षित महिलांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्यानंतर आपल्याला केरळ राज्य भेटते ते इतिहास आणि भूगोलाच्या क्रमिक पुस्तकामधून..भारतीय पावसाळ्याला म्हणे केरळपासून सुरुवात होते आणि मग तो देशभर प्रवासाला निघतो. तसेच स्वातंत्र्य सैनिक एन. के. दामोदर नायर, के. केलप्पन, के.कुमार, अकम्मा चेरियन, ए.व्ही.कुट्टीमालु अम्मा, मोहम्मद अब्दुर रहमान तसेच धावपटू-फ्लाईंग क्वीन पी.पी.उषा, चतुरस्त्र अभिनेत्री विद्या बालन या आणि अशा शेकडो, हजारो नामवंत-गुणवंतांच्या रुपाने आपला केरळ राज्याशी परिचय दृढ होत जातो. माझ्या चारपैकी एका मेहुण्याची पत्नी ही केरळी नायर परिवारातली आहे. त्यामुळे केरळ हे तिच्या रुपाने आणखी जवळ येऊन ठेपले होतेच! उत्तरेकडील अनेक राज्ये पाहुन झाल्यानंतर यंदा केरळ पर्यटन करण्याचे निवडक मित्रमंडळी आणि परिवारासह निश्चित केले होते. केरळला जोडुनच कन्याकुमारीही पाहायचे ठरवले होते.

   जाताना मंगला एक्सप्रेस आणि येताना राजधानी एक्सप्रेस असा ट्रेन प्रवास सुनिश्चित करुन आमचा जवळपास २९ जणांचा चमू केरळ-कन्याकुमारी पर्यटनाला ५ डिसेंबर २०२३ रोजी निघाला. त्रिचूर, मुन्नार, टेकडी, जंगल सफारी, मसाला गार्डन, रोज गार्डन, मुतापट्टू धरण, हत्ती सफारी, बोटींग, जटायू राम मंदिर, कन्याकुमारी सुर्यास्त आणि सुर्योदय, स्वामी विवेकानंद समाधी स्थळ, कन्याकुमारी माता मंदिर, त्रिवेणी संगम, पद्मनाभ स्वामी मंदिर हे सारे या प्रवासात पाहता आले. जाताना आम्ही प्रवास करत असलेल्या मंगला एक्सप्रेस या गाडीत मूळचा स्पेनचा व जयपूर येथे त्याच्या मित्राच्या लग्नासाठी आलेला एनरिक ओहल्लो हा विदेशी पर्यटक भेटला. तो खूपच मनमोकळा निघाला.  त्याने आमच्यासोबत आणलेल्या खिमा, कोळंबी, चपात्या, चटणी यांचा मनसोक्त आस्वाद घेतला. मग मी त्याला ‘आमचा भारत कसा वाटला, येथील लोक, जनजीवन कसे आहे'  याबद्दल विचारले असता त्याने बिनधास्त आम्हाला ते सारे कॅमेऱ्यासमोर सांगितले व आम्ही ते "शूट" केले.

   आमचे पहिले देवदर्शन हे ‘गुरुवायुर मंदिराचे' होते. हे मंदिर छान आहे. मात्र देवदर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. शिवाय पुरुषांना लुंगीसह (वेष्टी) आणि अंगात बनियन, शर्टविना जावे लागते; तर महिलांना साडी नेसणे अनिवार्य आहे. किमान दीड तास रांगेत ताटकळल्यानंतर देवदर्शन होते. लालबागच्या राजासमोरुन जसे सर्वसामान्य भवतांना केवळ काही सेकंदच दर्शन घेतल्यावर लगेच लोटून दूर केले जाते..जवळपास तसाच फॉर्म्युला येथेही वापरला जातो. पद्मनाभस्वामी मंदिर (त्रिवेंद्रम) येथेही तसेच केले जाते. ओळखी दाखवून रांगेत घुसणे, स्थानिक प्रशासकीय पदांच्या परिचयावर घुसखोरी करुन आपली माणसे रांगेत घुसवणे, अयप्पा भवतांनी मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी झुंडीने घुसुन दर्शन घेणे हेही प्रकार पाहायला मिळतात. पण रांगेतले लोक तोवर ‘देवा'सारखे गप्प राहायला शिकलेले असतात, त्यामुळे राडा होत नाही. ज्यांना तेथील स्थानिकांची भाषा येत नाही ते एकमेकांना हिंदीमध्ये ‘ऐसा बीचमे घुसके दर्शन लेना ठीक नही! कमसे कम भगवान के दर पे तो इमानदार रहो' असले संवाद ऐकवत राहतात. कारण त्याशिवाय त्याठीकाणी त्यांच्या हाती दुसरे काहीच नसते. केरळमध्ये मला जागोजागी भरपूर केळी, शहाळी, ताडगोळे, केळी वेफर्स, फणसाचे वेफर्स, अननस, रायवळ आंबे, संत्री, संकरीत बोरे, इडली, डोसे, पुट्टु, तळलेली केळी, मेदू वडे, लाल आणि हिरवी चटणी यांचे दर्शन होत होते. मी जात्याच खाद्यप्रेमी असल्याने त्यांचा यथोचित समाचार घेतला. आपल्या महाराष्ट्रात ताडगोळे व्यवस्थित काढून ते सुटे विकले जातात. केरळमध्ये मी पाहिले की काही ठिकाणी आख्खा ताडगोळा ववचितच विकला जातो. ताडगोळ्याचे तुकडे व त्यातील पाणी एका टोपात भरुन ठेवले जाते. एक ग्लास सत्तर रुपये या दराने ते सारे ग्लासमध्ये भरुन मिळते. अशा एक दोन ग्लासांनी माझे समाधान होत नसते. आपल्याकडे साठ रुपयांना मिळणारे शहाळे तिकडे तीस रुपयांत मिळते...याचा मी लाभ उठवला.

   ‘अरे वा टुर्स' या कल्याण येथील ट्रॅव्हल कंपनीतर्फे आम्ही गेलो असल्याने व जेवणाची सारी व्यवस्था त्यांच्याच तर्फे असल्याने तेथील हॉटेलांतून जेवण्याची वेळ काही आली नाही. अपवाद पद्मनाभस्वामी मंदिराचा. तेथे लवकर जायचे असल्याने सकाळची न्याहरी करता आली नाही, ती आम्ही तेथील हॉटेलांतून इडली, डोसा, चटणी या स्वरुपात केली. कल्याणहुन आलेल्या माझा मित्र शरद ननावरे व मैत्रीण मीनल कर्णिक हिने घरुन निघतानाच खिमा, कोळंबी, केक, चपात्या, ठेपले, बोंबिल चटणी, शेंगदाणा चटणी तसेच अन्य सहप्रवाशांनीही गोळ्या, बिस्किटे, वेफर्स, बटाटा चिवडा, चिवकी, तसेच काजू, पिस्ता, मनुके, बडीशेप, ओवा, जवळा, पोह्याचा चिवडा, भडंग असा व्यापक इंतजाम केला असल्याने कुठेही आमचे खाण्यावाचून अडले नाही. कुणालाही अपचन, अजीर्ण, जुलाब अशा प्रकारच्या त्रासांनी सतावले नाही, हे विशेष! त्रिसूर, अलेप्पी, मुन्नार या भागात रात्री पाऊस आणि दिवसा उन अशा वातावरणाचा आम्हाला अनुभव आला. त्यामुळे डिसेंबरला तिकडे थंडी असेल म्हणून घेतलेले स्वेटर्स, मौजे, कानटोप्या, शाली हा सारा ऐवज बॅगेतच बंद राहिला. केरळात हिंदुंची देवळे भरपूर जरी असली तरी तेथील स्थानिक मतदार हिंदुत्ववादी पक्षाला निवडून देत नाही, हे वास्तव आहे. एवढ्या साऱ्या प्रवासात मला भाजपची पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे, कमळ एकाच शहरात पाहायला मिळाले. तेथे ‘लेफ्ट डेमॉक्रेटिक फ्रंट' आघाडीचे  पिनाराई विजयन हे २०१६ पासून मुख्यमंत्री आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे प्राबल्यही केरळात भरपूर ठिकाणी आहे. त्यामुळे मशिदी आणि चर्च यांचेही प्रमाण लक्षणीय आहे. पत्रकार असल्याने केरळात वेगळे काय, ते पाहण्यासाठी माझी नजर आतुर होती. तेथे मी पाहिले की राज्यांतर्गत व दोन राज्यांना जोडणारे रस्ते सुस्थितीत आहेत आणि तरीही आम्ही ज्या ज्या भागात फिरलो तेथे टोल टॅक्ससाठी आमची वाहने कुठेही अडकली नाहीत. केरळातील काही लोक शक्यतो हिंदी बोलणे टाळतात. ते इंग्रजीतून संवाद साधू पाहतात. आम्ही हॅशटॅग नावाच्या कपड्यांच्या दुकानात गेलो असता त्याने आम्हाला चांगले कन्सेशन दिले खरे; पण ‘फ्रॉम व्हिच स्टेट?' म्हणून विचारत आम्ही कुठून आलो हेही जाणून घेतले. महाराष्ट्रात असे होत नाही. पद्मनाभस्वामी मंदिर येथे गेलो असता दर्शन घेतल्यावर मी व माझ्या दोन मैत्रीणी रिक्षाने हॉटेलकडे लवकर परतत होतो. कारण माझी मैत्रीण तिच्या सीकेपी पध्दतीने दुपारच्या जेवणासाठी मासे बनवणार होती. रिक्षावाल्याला आम्हाला कुठे सोडायचे आहे ते आमच्या बस ड्रायव्हरने नीट त्याच्या भाषेत समजावून सांगितलेही! पण तो अखिल भारतीय (ठराविक) रिक्षावाल्यांच्या वर्तनाला जागला व आम्हाला आमच्या हॉटेल परिसरात घुमवत राहिला. दीडपट भाडे जास्त झाल्यावर व अनेकांना आमची फोनाफोनी झाल्यावरच त्याने आम्हाला आमच्या हॉटेलवर आणून सोडले.

   केरळातील बॅकवॉटर व तेथील जलसफारी, जटायू मंदिर, दत्तमंदिर तसेच तामिळनाडूमधील विवेकानंद समाधी स्थान ही स्थळे आम्हाला खुपच आवडली. चहाचे मळे, रबराची, चंदन, दालचिनी, वेलची, ब्राह्मीची झाडे, अन्य औषधी वनस्पतीची झाडे, अर्क, काढे, चूर्ण, मसाल्याचे पदार्थ, त्यांचे प्रदर्शन व विक्री या साऱ्याचा आम्ही लाभ घेतला. कोल्लम जिल्ह्यातील चंदयमंगलम येथे असणारे जटायूपारा हे जटायू मंदिर व तेथील रोप वे हे ठिकाण तर एखाद्या मिनी विमानतळासारखे नेटके, स्वच्छ आणि मोहात पाडणारे आहे. काश्मिरमधील श्रीनगरचे विमानतळही त्याच्यापुढे फिके वाटावे! विवेकानंद समाधी स्थानाजवळ विवेकानंद  केंद्र चालवणारे कार्यकर्ते भेटले. त्यांनी मराठीतून माहिती देताना सन्मा. एकनाथ रानडे या मराठी माणसाने स्थानिकांचा विरोध पत्करुनही हे ठिकाण कसे अथक मेहनत घेऊन उभारले ते सांगितले. (केरळमधील काही ख्रिस्ती व मुस्लिम स्थानिकांनी येथे विवेकानंदांचे इतके सुंदर स्मृतीस्थळ उभारले जाऊ नये यासाठी भरपूर अडथळे आणले होते असेही समजले.) या ठिकाणाबद्दल तेथील केंद्राने आमचे अभिप्राय एका फॉर्मवर नोंदवून घेतले.

   येताना राजधानी एवसप्रेसचा प्रवास १२ डिसेंबरला रात्री सव्वासात वाजता तिरुवनंतपुरम येथून सुरु झाला. नाव राजधानी..पण थ्री टायर ए.सी. तिकिटातच पैसे घेऊन देण्यात येणारे जेवण मचूळ, पाणचट आणि दर्जाहीन असाही अनुभव घेतला. यापेक्षा आपल्याकडचे स्ट्रीट फूडही आणखी चविष्ट, रुचकर, स्वस्त आणि पोटभर असते. राजधानीतल्या जेवणातले तुम्ही चिकन खा, पनीर खा, वरण खा..किंवा भाजी खा..चव एकाच प्रकारची..गुळचट आणि गुळमट! असो!! एवढ्या अवाढव्य खंडप्राय देशात इतक्या विविधतांमध्ये हीही एक विविधता म्हणून आम्ही ते गोड म्हणून ( नव्हे, ते गोडच होते!) समाधान मानून घेतले आणि दुसऱ्या दिवसाच्या रात्री १३ डिसेंबर रोजी ८.२० वाजता पनवेल येथे उतरुन सहलीची सांगता केली.

(मुशाफिरी)© राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपले नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अनेकतेत एकता काळाची गरज!