पत्रकारांना ‘सिडको'च्या गृहनिर्माण योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग सुकर

 

 

नवी मुंबई ः ‘सिडको'च्या गृहनिर्माण योजनेतील पत्रकारांच्या घरांकरिता अर्ज करण्यासाठी राज्याच्या माहिती-जनसंपर्क संचालनालय कडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली आहे. ‘सिडको'कडूनच योग्य ती शहानिशा करुन पत्रकारांची पात्रता निश्चित करण्यात येणार आहे. सदर निर्णयामुळे पत्रकारांना ‘सिडको'च्या गृहनिर्माण योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.


‘सिडको'कडून सातत्याने गृहनिर्माण योजनांद्वारे सर्व आर्थिक स्तरांतील नागरिकांकरिता परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करुन दिली जात आहेत. तसेच सिडको गृहनिर्माण योजनांतील सदनिका या विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव ठेवण्यात येत आहेत. यापूर्वी पत्रकारांना, पत्रकार प्रवर्गातील सदनिकेसाठी अर्ज करताना महाराष्ट्र शासनाच्या माहिती-जनसंपर्क संचालनालय कडून ते पत्रकार प्रवर्गातील असल्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक होते. परंतु, या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात कालापव्यय होत असल्याने, पात्रता प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरलेल्या पत्रकारांना सदनिकेचे वाटपपत्र देण्यास विलंब होत होता.  


पत्रकारांची होणारी सदर गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांना ‘सिडको'च्या योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सिडको'ला दिलेल्या मार्गदर्शनानुसार शासनाच्या माहिती-जनसंपर्क विभागाकडून प्राप्त कराव्या लागणाऱ्या पात्रता प्रमाणपत्राची अट ‘सिडको'कडून शिथिल करण्यात आली आहे. यापुढे गृहनिर्माण योजनेच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरणाऱ्या पत्रकार अर्जदारांची पात्रता ‘सिडको'कडूनच निश्चित करण्यात येणार आहे.  

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणाऱ्या पत्रकारांना ‘सिडको'च्या गृहनिर्माण योजनेतील सदनिका मिळण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा याकरिता पात्रतेची अट शिथिल करण्याबाबतचे आदेश ‘सिडको'ला देण्यात आले आहेत. समाज आणि शासन यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या पत्रकारांप्रति कृतज्ञता म्हणून शासनाने सदर निर्णय घेतला आहे. - ना.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री-महाराष्ट्र.

‘सिडको'ने कायम पत्रकारांचा सन्मान केला आहे. पत्रकारिता विषयक उपक्रमांसाठी देखील ‘सिडको'ने नेहमीच सहाय्य केले आहे. यावेळीही राज्य शासनाच्या मार्गदर्शनानुसार पत्रकारांना सिडको गृहनिर्माण योजनेतील घरे अधिक सुलभतेने मिळण्याकरिता ‘सिडको'कडून पात्रतेबाबतची अट शिथिल करण्यात आली आहे. ‘सिडको'ने घेतलेल्या सदर निर्णयाचा फायदा अनेक पत्रकारांना होणार असून नवी मुंबईसारख्या पायाभूत सुविधांनी परिपूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात हक्काचे घर घेण्याचे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे. - डॉ.संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको. 

 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई शहरात अनधिकृत बांधकामाचा धुमाकुळ सुरूच