दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही - केंद्रीय मंत्री रामदास आठवले

पनवेल: दिबा सर्वांचे बाप होते, त्यांनी सर्व महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे, त्यामुळे दिबांचे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दात नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्ही कोपर येथे नवी मुबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत केली. तसेच ठाकरे सरकारला भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी, अशा शब्दात घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वडिलांच्या नावाचा विचार न करता वडीलधारी दिबांचे नाव देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही केले. 

       लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून दिबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज भूमिपुत्रांची 'भूमिपुत्र परिषद' आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, भारतीताई पवार, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, नंदराज मुंगाजी, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दशरथ भगत, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, राजाराम पाटील, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, सुनिल म्हात्रे, रुपेश धुमाळ, सदानंद वास्कर, कांचन घरत, सुनील पाटील, प्रशांत पाटील, गोवर्धन डाऊर, के. के. म्हात्रे, सीमा घरत यांच्यासह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आदी विभागातील समस्त हजारो भूमिपुत्र उपस्थित होते. तत्पूर्वी दिबांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी, तसेच जासई येथे तसेच गावोगावी दिबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 
नामदार रामदास आठवले यांनी पुढे बोलताना सांगितले कि, दिबांचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राहिला आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय सरकारला घेणे भाग पडले आहे. दिबा संघर्षशील नेते होते. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी गौरवशाली कार्य केले आहे.  समाजाला न्याय देण्याचा संघर्ष सर्वानी पाहिला आहे. त्यामुळे वाटेल ते झाले तरी चालेल पण विमानतळाला दिबांचेच नाव लागलं पाहिजे असे सांगतानाच त्यांच्या नावासाठी आरपीआयचा जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
नामदार रामदास आठवले यांनी पुढे म्हंटले कि, रामशेठ ठाकूर आणि मी मित्र आहे. ते एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. संघर्ष करून ते पुढे आले. दिबांच्या नेतृत्वाखाली संघर्ष करणारा माणूस म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. दिबांनी सर्वांसाठी संघर्ष केला. भूमिपुत्रांना न्याय मिळावा म्हणून ते जेलमध्येही गेले आहेत. सिडकोने जमिनी घेतल्या पण मात्र प्रकल्पग्रस्तांच्या जीवनाचा विचार सिडकोने केला नाही. गावांचे योग्य पुनर्वसन, बांधकाम परवानगी, रोजगार, नोकरी, असे अनेक प्रश्न आहेत ते सिडको आणि राज्य सरकार सोडवू शकतात. ते प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिकोनातून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी त्यांच्या शैलीत सिडको, ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला. यावेळी नामदार रामदास आठवले यांनी दिबांच्या वर कविता सादर करत त्यांना आदरांजली वाहिली. तसेच भीमशक्ती दिबाशक्ती मध्ये एकवटली असल्याचे यावेळी अधोरेखित केले. न्याय मिळत नाही म्हणून मागण्यांसाठी हा एल्गार आहे, असेही त्यांनी नमूद केले. 
 
अध्यक्षीय भाषणात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भूमिपुत्रांच्या दृष्टिकोनातून दोन ठराव जाहीर केले. काहीही झाले तरी दिबांच्या १०० व्या जयंतीपूर्वी दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे तसेच सिडको संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे, बहुजनांचे प्रश्न सुटलेच पाहिजे नाही तर २४ जानेवारीला विमानतळाचे काम करून द्यायचे नाही असे दोन ठराव त्यांनी जाहीर करताच सर्व उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट स्वागत केले. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बाजार समितीमुळे कांदा शेतकऱ्यांचे वीस लाख एक्केचाळीस हजार वसुल