मुशाफिरी : लग्नगाठी सैलावताहेत ?

लग्नगाठी सैलावताहेत?

   लग्नाचा भपकेबाजपणा महत्वाचा..की लग्नानंतर त्या उभयतांचे आनंदी सहजीवन? हळदीला/लग्नाला दोन-तीन हजार भोजनभाऊ मंडळींचे लग्नघरी जेवून जाणे महत्वाचे की त्या वधूवरांचे व त्या दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन व त्या कुटुंबसदस्यांचे परस्परांतील साहचर्य? लाखो रुपये खर्चून प्रदर्शनी थाटमाट दाखवीत केलेले शूटींग मोलाचे की वधू वरांतील ताळमेळ? याचा आता लग्नाळू लोकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी विचार करण्याची वेळ आली आहे.

   ‘विवाहाच्या गाठी म्हणे ब्रह्मदेव बांधतो. विवाह हा एक संस्कार आहे. विवाहप्रसंगीचे सारे विधी लक्षपूर्वक, गांभीर्याने करावेत. मुहुर्त काढला असेल तर त्या वेळेचे भान ठेवून विवाह विधी संपन्न व्हावेत. समाजाच्या साक्षीने एकमेकांना दिलेली वचने पूर्ण करावीत. विवाह हा केवळ त्या दोन जीवांचाच मिलाफ नसतो तर तो दोन कुटुंबांना एकत्र आणतो. ‘आप्त इष्ट सारे..सगे सोयरे हे'.. असे सारे सोयरे सहचर या विवाहबंधनामुळे एकमेकांशी जोडले जाऊन एक महाकुटुंब आकाराला येते' असे विवाहांबद्दल थोरामोठ्यांनी सांगून, लिहुन ठेवले आहे.

    सध्याचा काळ हा विवाह सोहळे जिकडे तिकडे मोठ्या व प्रदर्शनी स्वरुपात साजरे केले जाण्याचा आहे. गेल्या वर्षी २०२१ साली याच डिसेंबर महिन्यात माझ्या एकुलत्या एका मुलाचा विवाह करोना निर्बंध असताना मर्यादित वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत साजरा करावा लागल्याची आठवण ताजी आहे. आजही आजूबाजूला पार पडणारे विविध विवाह सोहळे हे यापूर्वीच्या काळातील  पाहिलेल्या वेगवगळ्या विवाहांच्या आधीच्या व नंतरच्या माझ्या आठवणी ताज्या करतात. ब्रह्मदेवाने मारलेली काहीजणांची लग्नगाठ कशी वरवरची, विसविशीत, ढिली, पटकन सुटणारी होती याचे खेदजनक स्मरण करुन देतात. सर्वसाधारणपणे हिंदुंमध्ये काही अपवाद वगळता एकच विवाह केला जातो. (पती किंवा पत्नी जिवंत असतानाही एकाहुन अधिक नवरे व एकाहुन अधिक बायका काही अटीशर्तींवर करायला परवानगी देणारेही काही धर्म आहेत. त्याबद्दल रीतसर माहिती नसताना त्याची चर्चा इथे नको!)  आज परिस्थिती बदलत चालली असून शिक्षण, पोषाखी आधुनिकता, अहंकार, ‘आम्ही दोघं राजाराणी व नवऱ्याचे आईवडिल म्हणजे डस्ट बिन' समजण्याची काही नवविवाहित मुलींची मानसिकता व काही घरांतील मुलीच्या आईबापाने तिला घातलेले खतपाणी, नव्या घरातील वातावरण, लग्नाआधीचे सुरु असलेले ‘प्रकरण', लठ्ठ पॅकेज देणाऱ्या नोकऱ्यांमुळे आलेली आर्थिक बेफिकिरी या व अशा अनेक कारणांमुळे थाटामाटात प्रि वेडिंग, वेडिंग, पोस्ट वेडिंग असे प्रदर्शनी शूटिंगबाजी केलेले, भपकेबाज, दिखाऊ, आपल्या पैशांचे प्रदर्शन मांडलेले अनेक विवाह अल्पकाळातच मोडले गेलेले मला पहायला मिळते..तेंव्हा मात्र मनापासून वाईट वाटते.

   पंचवीस वर्षांपूर्वी असे ‘मोडके विवाह' काही तथाकथित उच्चवर्गियांतच आढळून यायचे. मात्र आता शिक्षणाचे व आर्थिक परिस्थिती उन्नत होण्याचे प्रमाण वाढल्याने समाजाच्या सर्वच थरांतून विवाह विच्छेद, काडीमोड, डायव्होर्स, सोडचिठ्ठी, पोटगी, कोर्टबाजी, दुसरे लग्न वगैरे गोष्टी सरसकट पहायला मिळू लागल्या आहेत. वैवाहिक जीवन हा जरी खासगी मामला असला तरी विवाहपूर्व व विवाहोत्तर विविध सोहळे, विधी, रुढी-परंपरा हे सारे सार्वजनिक मान्यतेने पार पडत असते. आपल्याकडे विवाह हे ‘साजरे' होतात, कसेतरी ‘उरकले' जात नाहीत. कष्टकरी समाजात तर विवाहांना खूप महत्व असते. सारी हौस मौज करुन घ्यायची, नाचण्याची, नटण्या-मिरवण्याची, खाण्या-पिण्याची चंगळ म्हणजे विवाह समारंभ असे सरळसरळ समीकरण असते. ज्यांना असे खर्च करण्याची ऐपत नसते त्यांच्यासाठी काही सेवाभावी संस्था तसेच काही दानशूर दाते मंडळी सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करत असतात. नवी मुंबईत आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या पुढाकाराने असे सामुदायिक विवाह पार पडले आहेत. ऐरोली व खारघर येथे करोनापूर्व काळात संत निरंकारी मंडळाच्या पुढाकाराने संत समागम प्रसंगी मोठ्या प्रमाणावर सामुदायिक विवाहांचे आयोजन केले जात असे. पंजाब, हरियाना, गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली अशा विविध प्रांतांतून आलेल्या धनवान कुटुंबांतील अनेक वधू-वरांशीही मी अशा प्रसंगी थेट जाऊन संवाद साधला आहे, माहिती घेतली आहे. तर इकडे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड परिसरातील अनेक स्थानिक कुटुंबांतील प्रमुखांना आपापल्या घरातील लग्नसोहळ्यासाठी सिडकोचे प्लॉट विकून किंवा मग कर्ज काढून लग्नांचा भपकेबाजपणा दाखवताना, संपत्तीचे प्रदर्शन मांडताना  मी पाहिले आहे. मग काही काळानंतर अशा प्रकारचे (किंवा कोणतेही!) लग्न मोडल्याचे, विवाहित मुलगी पुन्हा माहेरी आल्याचे दबक्या आवाजात कळते तेंव्हा मनापासून वाईट वाटते.

   लग्नाचा भपकेबाजपणा महत्वाचा..की लग्नानंतर त्या उभयतांचे आनंदी सहजीवन? हळदीला/लग्नाला दोन-तीन हजार भोजनभाऊ मंडळींचे लग्नघरी जेवून जाणे महत्वाचे की त्या वधूवरांचे व त्या दोन्ही कुटुंबांचे मनोमिलन व त्या कुटुंबसदस्यांचे परस्परांतील साहचर्य? लाखो रुपये खर्चून प्रदर्शनी थाटमाट दाखवीत केलेले शूटींग मोलाचे की वधू वरांतील ताळमेळ? याचा आतालग्नाळू लोकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी विचार करण्याची वेळ आली आहे. काही वर्षांपूर्वी घणसोलीच्या नंदकुमार म्हात्रे यांनी ‘मांडवाचे मघारी चाललेय काय?' या विनोदी नाटकातून आगरी-कोळी समाजातील हळदी-लग्न प्रथेतील काही कालबाह्य बाबींवर हसत-हसवत बोट ठेवून त्यातील वैगुण्ये दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला. या नाटकाला व्यावसायिक यशही चांगले लाभले. अनेक आगरी-कोळी नेते मंडळींनी गर्दी करुन हे नाटक पाहिले. (..आणि स्वतःच्या घरचे लग्नसोहळे करताना मात्र वारेमाप खर्च करायला मागेपुढेही नाही पाहिले. आता बोला! अपवाद  माजी मंत्री, माजी खासदार मा. जगन्नाथ पाटील यांचा! ) लग्नात हसी मजाक चालते.. पण लग्न हा हसण्यावारी नेण्याचा अजिबातच  विषय नव्हे...आणि हळदी-लग्नातील भपका, थाटमाट, नाचकाम, रोषणाई, जेवणावळी, अपेयपान, लग्नपत्रिकेतील ढीगभर नावे ही काही केवळ आगरी-कोळी लोकांचीच मक्तेदारी नव्हे, हे मी विविध धर्म, विविध जाती-जमाती-समाजगट यांचे विवाह सोहळे पाहिल्यानंतर हवकाने सांगू शकतो.

   नवविवाहित पति-पत्नीचे एकमेकांत पटत नसेल तर रीतसर बोलणी, चर्चा, सामोपचाराचे मार्ग अवलंबूनही गाडी रुळावर येत नसल्यास काडीमोड घेता येण्याचा मार्ग असतो. पण नवविवाहितेला मारझोड, छळ, कौटुंबिक हिंसाचार तसेच विवाहितेकडून वृद्ध सासू-सासऱ्यांचा छळवाद, तिच्याकडून नवऱ्याच्या मागे त्याचे आईबाप वृध्दाश्रमात नेऊन टाकण्यासाठी तगादा अशाही बाबी अलिकडे वाढीला लागल्या आहेत. काही नवविवाहितांच्या आत्महत्याही घडून येत आहेत. तर काही घरांमधून नवविवाहितेकडून सासू-सासरे यांना हाकलून देण्याच्याही घटना घडताना पहायला मिळतेय. एकत्र कुटुंब पध्दती भंग पावून विभक्त कुटुंब पध्दती स्विकारल्याचे काही दुष्परिणाम होणार होतेच ! चुलत-मावस-मामे-आते-भावंडांची दूरी, ज्येष्ठ नातेवाईकांना घरात नसणारे स्थान यामुळे कोणताच दबाव न राहिल्याने अनेक घरात वितंडवाद भरपूर..पण ते बाकीच्यांना कळतही नाहीत. कळते..तेंव्हा वेळ...किंवा कधीकधी जीवही निघून गेलेला असतो. लग्नाचे फोटो दिसतात, लग्नाचा व्हिडिओ दिसतो, लग्नाच्या हॉलमधील रोषणाई, रुखवत, जेवणावळी, महागड्या साड्या व अन्य वस्त्रप्रावरणे घालून केलेले थीम शूटिंग दिसते, ‘तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव'..हेही ऐकू येते, वधूवरांना नेण्यासाठी सजवलेली गाडी दिसते, महागड्या भेटी, आहेर, हनिमूनसाठीचे डेस्टिनेशन हे सारे सारे दिसते...पण यानंतरचे (काही घरांतले!) हुंदके, अश्रू, घुसमट, चिडचिड, मग अलगद दूर होणे हे मात्र दिसत नाही. कारण त्याचे शूटिंग केले जात नाही. त्याचे कुणी फोटो काढत नसतात. ते धडपणे सांगायचीही सोय नसते. कारण लोकलज्जेला घाबरावे लागते. पत्रकार असल्याने व समाजाच्या विविध थरातील, विविध वयोगटातील व्यवितंना बोलते करण्याची माझी सवय असल्यामुळे हे सारे त्यांच्याकडून समजते..काही लोक विश्वासाने स्वतःहुन सांगतात, तेंव्हा कळते. चांगल्या पगाराचे पॅकेज असलेल्या किंवा स्व-रुपाचा तोरा असलेल्या, वडिलांच्या गडगंज मालमत्तेच्या एक वारस असलेल्या, ‘समोरच्याचे काहीही ऐकुन घेऊ नकोस' अशी शिकवण माहेराहुन मिळालेल्या काही मुली या विवाहानंतर वर्षभरात माहेरी परतलेल्या पहायला मिळताहेत. काही ठिकाणी मुल घेऊन तर काही परिवारात मुल सासरीच ठेवून त्यांनी माहेरची वाट धरली आहे. घटस्फोट लवकर मिळत नाही, वेडेवाकडे भरवणारे नातेवाईक-मित्रमंडळी अवतीभवती असल्याने अशांचे पुढचे आयुष्य एखाद्या अनिर्णित अवस्थेकडे जाणाऱ्या सामन्यासारखे बनून जाते. लग्न झालेल्या दहातली दोन तीन उदाहरणे यात येतात. उघडा डोळे..बघा नीट. तु्‌मच्याही लक्षात येईल ते!

- (मुशाफिरी) राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : स्नेह आणि संमेलन