मुशाफिरी

‘हा' गेला त्याची गोष्ट

   शाळेत एका बाकावर सुरु झालेली ह्याची गोष्ट अशी अकाली, नकोशा पध्दतीने तो रहात असलेल्या भाड्याच्या घराजवळ आम्हा एकेकाळच्या शाळकरी मित्रमंडळींनी एकत्र जमून शोक व्यक्त करत, तो एकेकाळी कसा चांगला होता, हार्मोनियम वाजवीत असे, चांगले गुण मिळवीत असे, पहिल्या पाचात येत असे अशा आठवणी काढीत संपली.

   करोना संपला असे म्हणताहेत. त्याचवेळी आपल्या शहरातील करोनाबाधेने दवाखान्यात उपचार घेणारेही वाढत असल्याचे पहायला मिळत असून गोवराच्या आजाराने काहींना हैराण करुन ठेवले आहे. करोना, एड्‌स, टी बी, कॅन्सर, किडनी विकार, हृदयविकार अशा रोगांचे नाव ऐकून उरात भरणारी धडकी या रोगाने आपण किंवा आपले प्रियजन मरणार केवळ याच भितीने भरत नसते; तर या रोगांवर करायचे जे उपचार आहेत, ते रुग्णासह त्याच्या परिवाराला आर्थिक व मानसिकदृष्ट्या पार लुळेपांगळे करुन ठेवतात.. काही रोगांमुळे तर समाजात तोंड दाखवायला जागा उरत नाही...याचीही ती भिती व ती धडकी असते. जर घरातील कर्त्या पुरुषाला अशापैकी कोणत्या रोगाने ग्रासले असेल तर ‘आपल्या पश्चात आपल्या परिवाराचे काय होणार' या भितीनेही तो अर्धा होऊन जातो.  मला आठवते..सहा वर्षे झाली असतील त्या घटनेला. माझ्यासोबत शाळेत शिकणारा एक मित्र. त्याला पोटाच्या कॅन्सरने गाठले. तीन चार वर्षे उपचार सुरु होते. त्याची कमाई मर्यादित होती. मग त्याची शारीरिक व मानसिक शक्तीही कमी पडली व २०१६ साली त्याने जगाचा निरोप घेतला. आजच्या या लेखापुरते त्याच्या मूळ नावाऐवजी आपण त्याला ‘हा' या सर्वनामाने ओळखू या. तर हा आणि मी १९७२ सालापासून पाचवी ते आठवी अशी चारच वर्षे एकत्र होतो. हा आणि मी दोघेही अभ्यासप्रिय व क्रीडाप्रेमी. त्यामुळे आमची गट्टी जमली. ह्याला हार्मोनियमही वाजवता यायची. त्यामुळे शाळकरी जीवनात त्याला वर्गातही नाव मिळे. माझ्या सर्वात जवळच्या मित्रांत त्याचा समावेश असे. एकत्र शाळेत जाणे, सिनेमे पाहणे, अभ्यासाला एकमेकांच्या घरी जाऊन रात्री जागून अभ्यास करणे, खेळायला जाणे, एकमेकांच्या गावी जाणे, विविध नातेवाईकांच्या घरीही जाणे इतके आमचे संबंध चांगले होते. दहावीला अधिक चांगली टक्केवारी हवी म्हणून ह्याने आमची शाळा आठवी पास झाल्यावर सोडून भरपूर अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला.

  ह्याने शाळा बदलल्यावर वेळा वेगवेगळ्या झाल्या. ह्याचा मित्रपरिवार बदलत गेला. अधिक टक्केवारी सोडा...आठवीला होते तेवढेही मार्क त्याला एस एस सीला मिळू शकले नाहीत. चूकीच्या संगतीमुळे पुढे महाविद्यालयीन जीवनात ह्याला तंबाखू, गुटखा खाण्याचे वाईट व्यसन जडले. अकरावीला सायन्स शाखा निवडून व बीएससी होऊ पाहणाऱ्याला तंबाखू खाताना पाहणे माझ्यासारख्याला तसे जड होते. मी, इतर मित्रांनी ह्याला भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला. कडक शब्दात या वाईट व्यसनांबद्दल ह्याची निर्भत्सना करायचो. हा आम्हाला कधीही उलटून बोलत नसे व रागावतही नसे...पण व्यसनही सोडत नसे. मी कला शाखेत गेलो. आमची महाविद्यालयेही वेगवेगळी होती. पण भेटीगाठी होत असत. त्याचे आई-वडील, बहीण-भाऊ यांच्याही मी संपर्कात असे. दरम्यान तो कसाबसा बी एस सी झाला. पण चांगल्या कंपनीत काम करण्याऐवजी कुठल्यातरी गावखाते टाईपच्या फर्ममधील कामे करी. मध्येच ह्याला भिशी, डबल इन्कम मिळवून देणाऱ्या स्किम्स यात पडायची हुक्की येईल. त्यात तो सोबत पाच पंचवीस जणांना धक्क्याला लावी व सगळ्यांचेच नुकसान होऊन जाई. कोणत्याच कामात ह्याचे नीट लक्ष नसे, कामाचे गांभीर्य नसे. यथावकाश ह्याला दारुचे व त्यापाठोपाठ येणारे खोटे बोलण्याचे व्यसन लागले. दारुडे लोक म्हणे दारु प्यालेले असताना खरे बोलतात. म्हणजे  शुध्दीवर असताना सतत खोटे बोलत असतात की काय? याबद्दल माझा अभ्यास व अनुभव तोकडा आहे. पण मी दारुड्यांना थापा मारताना अनेकदा पाहिले आहे.

   गुटखा, तंबाखू, दारु यातून ह्याचा घसरत आणखी खोलात  जाणारा पाय आम्ही सारे मित्र-मैत्रीणी पहात होतो. आमच्या परीने ह्याची समजूत घालून त्याला ह्या वाईट बाबींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्नही करीत होतो. पण आता हा दारु पित नव्हता. तर दारुच ह्याला पित होती व संपवू पहात होती. यातून त्याच्या कुटुंबाचीही बदनामी होऊ लागली होती. ह्याचा धाकटा भाऊ वस्ताद होता. त्याने आईवडिलांच्या मनातून ह्याला पुरेपुर उतरवण्याचे काम व्यवस्थित सुरु ठेवले. यात आणखी एक चमत्कारिक गोष्ट घडली. ह्याच्या घरी धुणीभांडी करणाऱ्या व ह्याच्याहुन सात-आठ वर्षे वयाने जास्त असणाऱ्या एका अ-मराठी कामवाल्या बाईसोबत ह्याचे ‘मधुर' संबंध जुळले. हे सारे ऐकूनच आम्ही सगळे सर्द झाले होतो. मग ह्याच्या घरच्यांची स्थिती काय झाली असेल? म्हणजे बाटलीच्या सोबतीला आता (वयाने ज्येष्ठ) बाईही आली. ह्याच्या आयुष्याच्या घसरणीला सुरुवात तर महाविद्यालयीन जीवनातच झाली होती, या बाईच्या प्रवेशाने आता आयुष्यही वेगाने उतरणीला लागले. ‘तिच्याशी संबंध सोड किंवा घर सोड, तुला आम्ही या घरातून बे-दखल करीत आहोत..' असा निर्वाणीचा ईशारा ह्याच्या आई-वडीलांनी देऊन पाहीला. यावर ‘आता मी इतकी वर्षे तिच्याशी संबंध जोडून आहे, तिला असे मध्येच कसे सोडू?' असे म्हणत ह्याने चवक तिच्याशी लग्न केले. याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ह्याच्या घरच्यांनी ह्याला घरातून हाकलून दिले. आम्ही मित्रांनी हा व्यसन सोडत नसल्यामुळे केलेल्या बडबडीमुळे आम्हा सगळ्यांना ह्याने या लग्नापासून दूर ठेवले.  दुराचारी, व्यसनासक्त, चरसी, गांजाडू लोकांसोबत राहुन हा बिघडत गेला. दरम्यान आम्ही बाकीचे मित्र-मैत्रीणी पदवीधर होऊन, नोकऱ्यांमध्ये स्थिरावून, दोनाचे चार, चाराचे सहा, आठ होत गेलो.

   ह्याच्या कपटी भावाने आई-वडीलांना अंधारात ठेवून त्यांची संपत्ती बळकावली. मधल्या काळात ह्याच्या आईने जगाचा निरोप घेतला. मग तर ह्याच्या धाकट्या भावाने वडीलांना चवक वृध्दाश्रमात नेऊन टाकले. नालायकपणाचा कळस म्हणजे त्यांचे निधन झाल्याचे वृध्दाश्रमाने कळवूनसुध्दा ह्याचा भाऊ तिकडे फिरकलाही नाही. ह्याला हस्ते परहस्ते कळले. ह्याने मग वडीलांचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले. तोवर दारुच्या, तंबाखूच्या, गुटख्याच्या व्यसनाने आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. याला कॅन्सरने गाठले, केमोथेरपीची सायकल्स सुरु झाली. जीवघ्ोण्या वेदना व आर्थिक हलाखीचे चटके अशा दुहेरी आगीने ह्याला मग भाजून काढले. आम्ही मित्र अधूनमधून काही आर्थिक मदत करीत असू. पण कॅन्सरसारख्या दुखण्यावरील उपचारासाठी आमची मदत म्हणजे ‘दर्यामे खसखस' वाटे. ह्याच्या व ह्याच्या बायकोच्या एकूणच शारिरिक दौर्बल्यामुळे त्यांना मुलबाळ झालेच नाही..हे एकापरीने बरेच झाले म्हणायचे. नाहीतर त्या बालकाचे अतोनात हाल होणे ठरलेलेच होते. हळूहळू हा खचत जाऊन ह्याचे शरीर आक्रसत गेले. सहा वर्षांपूर्वी त्याने हे जग सोडले. आम्हा मित्रांना वेगवेगळ्या शहरांत हे कळेपर्यंत ह्याच्यावर कुणीतरी अंत्यसंस्कारही करुन टाकले होते. आम्हाला ह्याची राखही पाहता आली नाही. पुन्हा आम्ही सारेजण मिळून ह्याच्या पत्नीची भेट घेतली व तिच्या हातावर काही पैसे ठेवले.  तिचे सांत्वन केले. ह्याने आधीच्या आयुष्यात अनेकांशी आर्थिक दुर्व्यवहार केल्याने कित्येकांनी ह्याच्याकडे पूर्वीच पाठ फिरवली होती. मग हा ज्या घरात भाड्याने रहात होता, त्या घरमालकानेही ह्याच्या बायकोला ते घर सोडण्यास सांगितले. त्यानंतर आमच्यापैकी काहींना एखाद दुसऱ्या वेळी तिचा फोन आला असेल. मग तो मोबाईल बाळगणे तिला परवडत नसल्याने कदाचित तोही बंद करुन टाकण्यात आला.

    अनेकजण व्यसने करतात, दारु पितात, अनाचारी-दुराचारी वर्तन करतात..सगळ्यांनाच सावरायला, उपदेशाचे डोस पाजायला कोण जाणार? आणि गेलो तरी ऐकणारे किती? पण कुणाचाही असा अकाली, दुःखद शेवट होऊ नये, आयुष्याचे तीन-तेरा वाजू नयेत, जिवंतपणीच बाकीच्यांनी आपल्याकडे पाठ फिरवू नये असे ‘ह्या'ची ही कहाणी वाचणाऱ्या दहा टक्के वाचकांना जरी वाटले तरी हे लिखाण सार्थकी लागल्यासारखे होईल. बाकी ‘आम्ही आमच्या पैशाने खातो-पितो;  शौक, नाद करतो आणि तरीही चांगले ठणठणीत आहोत. आम्हाला ब्रह्मज्ञान शिकवणारे तुम्ही कोण टिकोजीराव?' असल्या प्रश्नांची मला सवय झालीय, त्यांच्यासाठी हे नाही. कारण आपल्याकडे दारु, गुटखा, मावा, सिगरेट ह्यांच्या कंपन्या धो धो चालतात; पण माणसं बिघडवणाऱ्या या उत्पादकांच्या विरोधात कोणताही राजकीय पक्ष, नेता कधीही आंदोलन करीत नाही, मोर्चे काढीत नाही. मात्र चार चांगल्या गोष्टी सांगणाऱ्या, प्रबोधन करणाऱ्या संत, प्रबोधनकार लोकांच्या जिवंतपणी प्रेतयात्रा काढल्या जातात, दिवसाढवळ्या त्यांचे खून पाडले जातात व त्या खुन्यांना (शक्यतो) कधीही फाशी होत नाही, असे आपला महान इतिहास सांगतो.

-(मुशाफिरी) राजेंद्र घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

थेट मंत्रालयातून