थेट मंत्रालयातून

बदला घेणं ही विकृतीच...

विद्यमान उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाची एकूणच पध्दत ही बदला घेणारी असल्याचं त्यांच्याच तोंडून स्पष्ट झालं. आता ते केवळ कपटी नाहीत. तर आपल्याला अपेक्षित असलेलं साध्य होत नसेल तर ते बदला घेऊ शकतात हे लक्षात घेतलेलं बरं. सत्तेसाठी कोणत्याही थराला माणूस जाऊ शकतो, यासाठी आवश्यक असलेली कुठलीही गोष्ट करायला तो मागेपुढे पाहत नाही हे फडणवीसांच्या कबुलीवरून आता स्पष्ट झालं.

आजवर याप्रकारे वागणारे वृत्तीने गुंड, पुंड असायचे. आता त्याची काही आवश्यकता नाही. आता हुशार, चाणाक्ष, बुध्दीमानही या मार्गाचा वापर करू शकतो, हे फडणवीसांनी दाखवून करून दिलं आहे. तेव्हा राजकारणात कोणावर किती विश्वास ठेवावा हेही ठरवलं पाहिजे. वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या राजकारणात आपण किती माहीर आहोत हे सांगताना आपल्याला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शिवसेनेचा बदला घेतल्याचं वक्तव्यं केलं होतं. सुरुवातीला त्यांचं हे वक्तव्य अनवधानाने आलं असावं असं वाटत होतं. पण पुढे त्यांनी या वक्तव्याची री ओढायला सुरुवात केल्यावर फडणवीस पोटातून बोलले हे स्पष्ट झालं. देशाच्या राजकारणात महाराष्ट्र जसा पुढारलेला वाटे तसा तो बुरसटलेलाही आहे, हे फडणवीसांच्या स्पष्टीकरणाने दाखवून दिलं आहे. सत्तेसाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे त्यांनी याआधीच दाखवून दिलं होतं. मात्र त्याला बदला म्हणून कोणी संबोधलं नव्हतं. कृतीचा थर कोणाताही असला तरी त्यावर वाच्यता केली जात नसे. बदला घेतला अशी भाषा तर कधीच आली नाही.  राजकारणात उट्टं काढलं जाणं ही नित्याचीच बाब होय. पण तसं कोणी कधी बोलून दाखवत नसतं. कधीतरी त्याच व्यक्तीचा वा त्याच्या संघटनेचा हात धरावा लागू शकतो, हे यामागचं कारण होय. फडणवीस यांनी ते बोलून दाखवलं आणि आपण किती निष्ठूर आहोत, किती क्रूर आहोत हे जगाला दाखवून दिलं.

शिवसेनेचा बदला घेण्यासाठी फडणवीसांनी जी काही कारणं दिली ती पाहाता फडणवीस केवळ बदल्याच्याच भावनेतून राजकारण करतात असा अर्थ निघतो. विद्यमान सत्ताही अशाच बदलाच्या भावनेतून उभी राहिली असंही म्हणता येईल. नैसर्गिक न्यायाने २०१९मध्ये भाजप-शिवसेनेला जनाधार मिळाला असं एकवेळ आपण मान्य केलं तरी या दोन पक्षांनी जन्मभर एकमेकांच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंच पाहिजे, असं थोडंच आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जवळकी साधून सेनेने मिळवलेल्या सत्तेचा फडणवीसांना इतकाच राग होता तर त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देणं क्रमप्राप्त आहे. एका वाहिनीवरील मुलाखतीत राजकारणाचा सन्यास घेईन पण राष्ट्रवादीशी युती नाही म्हणजे नाही, असा आव आणणाऱ्या फडणवीसांना पहाटेचा शपथविधी आठवतो की नाही? ते म्हणतील तोही बदलाच होता. तुम्ही बदला घेण्यासाठी राष्ट्रवादीचा हात धरू शकता; तर खोटारड्या भाजपचा बदला घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसचा हात शिवसेनेने धरला तर चुकलं कुठे?

महाराष्ट्राचं राजकारण याआधी इतकं कोतं कधीच नव्हतं. राजकारणाच्या चष्म्यातून यशवंतराव चव्हाणांना निपुत्रिक म्हणणाऱ्या आचार्य अत्रेंना यामागचं वास्तव कळल्यावर अत्रे यशवंतरावांच्या घरी गेले आणि यशवंतरावांचे पाय धरले. अशी परंपरा जोपासलेल्या महाराष्ट्रात एका मोठ्या राजकीय पक्षाचा नेता जो या राज्याचा मुख्यमंत्री होता तो सत्तेसाठी इतक्या कोत्या कृतीचा होतो, हे अजबच म्हटलं पाहिजे. फडणवीस हे काही अशिक्षित नाहीत वा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची अजिबात माहिती नाही, असंही नाही. राज्याच्या राजकारणात अनेक वर्ष घालवलेले फडणवीस बदला घेतलेल्या शिवसेनेचं बोट धरून २०१४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, याचाही त्यांना विसर पडला. म्हणजे फडणवीस हे बदला घेताना सोयीचं तेवढं विसरत असतात. राजकारणात इतका बेतालपणा नेत्याने करू नये.

बदला या शब्दकोषातील अर्थ काढायचा तर बदला घेणारी व्यक्ती एकतर क्रूर, कर्मठ, खुनशी असा आहे. अशा व्यक्ती या गुन्हेगारीतच शोभत असतात. राजकारणात त्यांना स्थान नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातील असंख्य उलथापालथी राज्यातल्या जनतेने पाहिल्या. पण एकाही नेत्यावर बदला घेतल्याची भावना कोणी व्यक्त केली नाही.

थोडं मागे जाऊन पाहिलं तर फडणवीस यांनी केवळ शिवसेनेचा बदला घेतला असं नाही. जे जे आपल्या स्पर्धेत आले त्यांचाही फडणवीसांनी बदला घेतल्याचं दिसून येईल. शिवसेना तर पक्षाबाहेरील विरोधक होता. आपल्याच पक्षातील नेत्यांची बेअबदी करताना, त्यांच्यावर नको ती विशेषणं लावताना फडणवीसांनी मागेपुढे पाहिलं नाही तिथे इतरांची काय गत? आपल्या पक्षांतर्गत स्पर्धकांची त्यांनी केलेली अवस्था पाहाता फडणवीस हे कोणाचेच नाहीत, हे लक्षात येतं. राज्याच्या राजकारणात येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना नितीन गडकरींचं बोट धरावं लागलं होतं. पण राज्यात सक्रीय झाल्यानंतर फडणवीस गडकरींचा विसर पडला. अगदी विदर्भाच्या राजकारणातही हम करेसो.. चा वापर त्यांनी गडकरींच्या समोर केला. गडकरींना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने मुख्यमंत्री पदाच्या दावेदारीतून ते अलगद दूर फेकले गेले. राहिलेल्या एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे या जनाधार असलेल्या नेत्यांची फडणवीसांनी केलेली अवस्था साऱ्या राज्याला ठावूक आहे. ज्या राष्ट्रवादीला फडणवीस शिव्याशाप देतात त्याच पक्षाच्या नेत्यांचा आपल्या प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी फडणवीसांनी वापर केल्याचं दिसून येईल. परळीतून पंकजा मुंडे पराभव होणं, एकनाथ खडसे यांना उमेदवारी न मिळणं या बाबी हा फडणवीसांच्या बदला घेण्याच्या पध्दतीचाच भाग होता, हे आता लक्षात येईल. त्याआधी आपल्याच मंत्रिमंडळात असलेल्या या नेत्यांच्या खात्यांतर्गत चौकशा, त्यांच्या खात्यांमधील त्रुटींची माहिती विरोधकांपर्यंत पोहोचवण्याच्या कला या बदला घेण्यासाठीच होत्या हे स्पष्ट होतं. खडसेंना क्लिन चिट मिळूनही ते पुन्हा मंत्रिमंडळात येऊ शकले नाहीत, यावरून फडणवीसांच्या राजकारणाची पध्दत लक्षात येईल. विनोद तावडे या आणखी एका स्पर्धकाच्या खात्यात शालेय उपकरणाच्या खरेदीत झालेला कथित भ्रष्टाचार, त्यांच्या पदवी प्रकरणाचा बोलबाला हा फडणवीसांचाच चमत्कार होता, हेही तेव्हा बोललं जाई.

जे आपल्या पक्ष नेत्यांचे झाले नाहीत ते शिवसेनेचे होणं हे केवळ अशक्यच होतं. २०१४ च्या सत्तेत त्यांनी सेनेला वाटा दिला हे खरं. पण त्या वाट्यात जराही दम नव्हता. जी खाती सेनेला देण्यात आली, ती सारी बिनमहत्वाची. तरीही निर्णय घेता येणार नाही, अशाप्रकारे फडणवीस यांनी सेनेच्या मंत्र्यांची गोची करून ठेवली होती. आपल्या सत्तेविरोधात उभ्या राहिलेल्या मराठा आंदोलनाची आणि त्यानंतरच्या शेतकरी आंदोलनाची फडणवीसांनी लावलेली वासलात हाही बदलेकी भावना.. या उक्तीचीच री होती. या दोन्ही  संघटनांमध्ये फाटाफूट पाडून ही आंदोलनं कमजोर करण्यात दाखवलेली चतुराई सत्ता पूर्ण पाच वर्षं चालवण्याला कारण ठरली.

राज्यातल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआय कारवाईचा सुरू असलेला खेळ हा फडणवीसांनी घेतलेल्या बदलाचा परिणाम होय, हे आता सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यांच्या विरोधात कारवाई झाली त्यातल्या सर्वांच्याच नातेवाईकांनी या कारवायांमागचं सुपिक डोकं फडणवीसांचं असल्याचा अनेकदा आरोप केला. सध्या तुरुंगात असलेले नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून फडणवीसांचं दुखणं होतंच. फडणवीसांची जवळीक असलेल्या समीर वानखेडे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती निर्माण करण्याचा बदला मलिक यांना ईडीच्या कारवाईतून घेतला गेला. पोलीस खात्यात होत्याचं नव्हतं करणारे परमबीरसिंग यांची झालेली अडचण लक्षात घेऊन अनील देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करत त्यांचा बदला घेण्यात आला. संजय राऊत हे महाविकास आघाडीचे निर्माते. राऊतांमुळेच आपल्याला सत्तेबाहेर रहावं लागल्याचा बदला घेणं ही फडणवीसांची गरज होती. पुढे न्यायालयाच्या फटकाऱ्याने अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. बदला व्यक्तीचा घेतला जाऊ शकतो. पण एखादी संघटना वा सेनेसारखा राजकीय पक्ष संपवण्याचा बदला घेणं हे अयोग्य आणि राज्याच्या राजकारणाला काळिमा फासणारं होय. याने फडणवीसांचीच विश्वासार्हता जाईल हे सांगायला नको...

- प्रविण पुरो, ज्येष्ठ पत्रकार.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

फॅमिली शेतकरी