एकल प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्धार

नवी मुंबई : हजारो वर्षे नष्ट न होणारे प्लास्टिक हे मानवी जीवनाला व पर्यावरणाला हानीकारक असून केंद्र व राज्य शासनाने एकल वापर म्हणजेच सिंगल यूज प्लास्टिकला प्रतिबंध केला आहे. या अनुषंगाने कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षणाप्रमाणेच नागरिकांच्या संपूर्ण सहयोगामुळे एकल प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे प्रतिबंध घालणारे नवी मुंबई प्रथम क्रमांकाचे शहर ठरेल असा विश्वासअतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विदयमाने वाशी येथील विष्णुदास भावे नाटयगृह आयोजित एकल
प्लास्टिक वापर प्रतिबंध जनजागृतीपर कार्यशाळेप्रसंगी त्या मनोगत व्यक्त करीत होत्या.

याप्रसंगी परिमंडळ 1 विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ बाबासाहेब राजळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डी बी पाटील, रायगडचे प्रादेशिक अधिकारी बी व्ही किल्लेदार, उप प्रादेशिक अधिकारी विक्रांत भालेराव व जयंत कदम, महापालिकेचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत सुधारित प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम अन्वये 1 जुलै 2022 पासून कोणत्या प्रकारच्या प्लास्टिक वापरावर बंदी आहे याची सादरीकरणाव्दारे सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांशी प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात संवाद साधून शंकानिरसण करण्यात आले. यावेळी नागरिकांकडून प्लास्टिकच्या काही वस्तूंच्या वापराबाबत उपस्थित प्रश्नांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात लेखी निवेदने सादर करण्याची सूचना करण्यात आली.

प्लास्टिकमुळे पर्यावरणाची व आपली हानी होते हे माहित असूनही प्लास्टिकचा वापर केला जातो. हे थांबविण्याची गरज असून त्यामध्ये प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून प्लास्टिकचा वापर टाळायला हवा, असे मत व्यक्त करीत उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी कटीबध्‍ द होऊया असे आवाहन केले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ बाबासाहेब राजळे यांनी प्लास्टिक बंदीचे नियम आपल्याच हितासाठी असल्याचे सांगत प्लास्टिक वापरावरील प्रतिबंधात्मक कारवाया या दंड वसूल करावा म्हणून नाही तर त्यामधून समज मिळावी व प्लास्टिक प्रतिबंधाची जनजागृती व्हावी म्हणून केल्या जात असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पाटील यांनी 1 जुलैच्या सुधारित नियमावलीनुसार पॉलिस्टिरीन आणि विस्तारित पॉलिस्टिरीनसह सिंगल यूज प्लास्टिकचे उत्पादन, आयात, साठवण, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी असल्याची माहिती देत या कार्यशाळेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबतची वस्तुस्थिती नागरिकांपर्यंत पोहचविली जाणार असून कार्यशाळेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी याबाबतचा प्रचार करावा, असे आवाहन केले.

      पावसाळी कालावधीतही या कार्यशाळेस पर्यावरणप्रेमी नागरिक, व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, शाळा, महाविद्यालये, महिला बचत गट, हॉटेल तसेच सामाजिक व निमशासकीय संस्था यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जीवनावश्यक वस्तूवरील जीएसटीच्या निषेधार्थ शनिवारी व्यापाऱ्यांचा लाक्षणिक संप