शौचालय अस्वच्छ आढळल्यास कडक कारवाईचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाच्या शहराचा बहुमान लाभण्याप्रमाणेच ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबईला वॉटरप्लस हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. त्या अनुषंगाने शहर स्वच्छतेप्रमाणेच शौचालय स्वच्छता ही अत्यंत महत्वाची व जबाबदारीची गोष्ट असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. याकामी कसूर दिसल्यास मोठ्या रक्कमेची दंडात्मक कारवाई करणे तसेच तरीही कामामध्ये सुधारणा न झाल्यास संस्थेला काळ्या यादीत टाकण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते अशी स्पष्ट जाणीव करून देत महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी शौचालय साफसफाईकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश शौचालय सफाई कंत्राटदारांना दिले.

शौचालय व्यवस्थापन हा स्वच्छ सर्वेक्षणामधील एक महत्वाचा भाग असून नागरिकांमार्फत दररोज वापर केली जाणारी बाब आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ व सुविधाजनक शौचालये उपलब्ध करून देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून याबाबत शौचालय व्यवस्थापन करणा-या कंत्राटदारांसमवेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी थेट संवाद साधला. याप्रसंगी प्रशासन व परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर विभागात 83, नेरुळ विभागात 84, वाशी विभागात 37, तुर्भे विभागात 80, कोपरखैरणे विभागात 70. घणसोली विभागात 98, ऐरोली विभागात 76 व दिघा विभागात 78 अशी एकूण 606 सार्वजनिक व सामुदायिक शौचालये आहेत. प्रत्येक विभागासाठी 1 याप्रमाणे 8 विभागांमधील शौचालयांचे स्वतंत्रपणे व्यवस्थापन करण्यात येते. या सर्व संस्थांच्या प्रमुख प्रतिनिधींशी थेट संवाद साधताना आयुक्तांनी सार्वजनिक व सामुदायिक शौचालय स्वच्छच हवेत, त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता असताच कामा नये असे स्पष्ट केले. शौचालये दिवसातील कोणत्याही वेळी स्वच्छच राहतील याकडे काटेकोर लक्ष दिले जावे व त्याठिकाणी पुरेसा प्रकाश असणे, हवा खेळती राहणे, हात धुण्यासाठी लिक्विड सोपची व्यवस्था असणे अशा प्रत्येक बाबीकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

जे लोक परिस्थितीमुळे घरातच शौचालय असणा-या मोठ्या घरांमध्ये राहू शकत नाहीत त्यांनाही स्वच्छ शौचालये वापरण्याचा अधिकार आहे हे स्पष्ट करीत सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता ठेवताना ती तुलनात्मकदृष्ट्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शौचालयांसारखी असावी असे त्यांनी सांगितले. नवी मुंबई हे स्वच्छतेमध्ये मोठ्या क्षमता असणारे शहर असून त्यादृष्टीने नवी मुंबईकडे अपेक्षेने पाहिले जाते असे सांगत आयुक्तांनी आपण आपल्याशीच तुलना करून शौचालय स्वच्छतेतही आंतरराष्ट्रीय दर्जाची गुणवत्ता राखावी असे सूचित केले.

यावेळी आयुक्तांनी शौचालय ठेकेदारांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यामध्ये विशेषत्वाने एमआयडीसी भागात शुक्रवारी व शनिवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो ही शौचालयांच्या नियमित स्वच्छ राखण्यात येणारी अडचण लक्षात घेऊन प्रत्येक शौचालयातील विद्यमान परिस्थितीचा आढावा घेऊन त्याठिकाणी पाण्याच्या टाकीची क्षमता वाढ वा इतर प्रकारे अडचणी दूर करण्याविषयी तातडीने कार्यवाही करावी असे अभियांत्रिकी विभागास सूचित केले. महानगरपालिका क्षेत्रातील 606 सार्वजनिक, सामुदायिक शौचालयांची बारकाईने पाहणी करून त्याठिकाणी आवश्यक सुधारणा कराव्यात व त्याचा अहवाल या आठवड्यात विभाग कार्यालयामार्फत आयुक्त कार्यालयात सादर करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शौचालयांचे स्थान गुगल मॅपवर सहजपणे उपलब्ध असून नागरिकांना व प्रवाशांना स्वच्छ शौचालये उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे हे लक्षात घेत संबंधित ठेकेदारांनी प्रत्यक्ष शौचालय स्वच्छता राखणा-या संबंधित केअरटेकर यांना तशा प्रकारच्या काटेकोर सूचना द्याव्यात व प्रत्येक शौचालय स्वच्छ व कोरडे राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या कामी एकही त्रूटी असलेली चालणार नाही असे स्पष्ट केले. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 शिवसेना तर्फे  महापालिका उपायुक्त दालन समोर आंदोलन