मुशाफिरी

स्नेह आणि संमेलने

   नुकताच डिसेंबर संपून आपण इंग्रजी नववर्ष २०२४ मध्ये प्रवेश केला आहे. हे दिवस म्हणजे शाळा महाविद्यालयांमधील क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभांचे! ज्यांनी ज्यांनी शालेय-महाविद्यालयीन जीवनात वेगवेगळे खेळ, विविध गुणदर्शनपर स्पर्धा यातून सहभाग घेत पारितोषिके पटकावली असतील, स्नेह संमेलनांमधून गाणी, नृत्य, नाट्यप्रवेश, मिमिक्री आदि कलाविष्कार सादर करुन उपस्थितांच्या पसंतीची थाप मिळवली असेल त्यांना हे दिवस एकदम ‘त्या' काळात घेऊन जाणारे वाटण्याचा दाट संभव आहे.

   गेले काही दिवस सर्वत्र शाळा-महाविद्यालयांचे क्रीडा महोत्सव आणि स्नेहसंमेलने पार पडताहेत. नवी मुंबई परिसरातील अशा अनेक स्नेह संमेलनांची वारंवार आमंत्रणे येत आहेत. तेथे कधी अध्यक्ष, प्रमुख पाहुणा, विशेष निमंत्रित, वक्ता तर कधी पत्रकार म्हणून उपस्थित राहण्याचा योगही येत आहे. या निमित्त तेथे केली जाणारी भाषणे ऐकता येत आहेत, मलाही ‘चार शब्द' बोलण्याची विनंती झाल्यानंतर थोडेफार बोलावे लागत आहे. शाळा-महाविद्यालयांचे हे असले कार्यक्रम म्हणजे युवावर्गाचा फसफसता उत्साह नुसता. मीही या साऱ्यातून गेलो असल्याने  तिकडे विचारमंचासमोर बसल्यावर काय वाटते, बक्षीसासाठी आपले नाव पुकारल्यावर काय फील येतो, यानंतर आपले सादरीकरण होणार असल्याची घोषणा झाल्यावर कसे वाटते व आता विचारमंचावर बसायला मिळत असल्याने समोरच्यांशी हितगुज साधताना इकडे काय वाटत असते या साऱ्या अनुभवांचा मी प्रत्यक्षदर्शी आहे. स्नेह संमेलन, गॅदरिंग, पारितोषिक हे कधीच थोडक्यात आटोपत नसते. त्यात हे दिवस नेमके थंडीचे असतात. एकदा का तुम्ही व्यासपीठावर स्थानापन्न वगैरे झालात की तेथून लवकर सुटका नसते. मग तुम्हाला जोराची  ‘एक नंबर'ला येवो की ‘दोन नंबर'ला! वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात तसेच साहित्य मंदिर सभागृहात अशा अनेक कार्यक्रमांना हजर राहता आले आहे. भावे नाट्यगृहातील अशाच एका कार्यक्रमात विख्यात साहित्यिक श्री. प्रविण दवणे यांनी एका शाळेतील किस्सा सांगितला होतो..तो येथे उद्‌घृत करावासा वाटतो. तेथे विद्यार्थ्यांना पारितोषिके श्री. दवणे यांच्या हस्ते प्रदान केली जात होती. अशीच सुमारे शंभरहुन अधिक पारितोषिके देऊन झाल्यावर हुश्श करीत त्यांनी मुख्याध्यापकांना विचारले, ‘झाले का आता पारितोषिक वितरण?' मुख्याध्यापक म्हणाले..‘प्राथमिकचे झाले, आता माध्यमिक आणि उच्च्च माध्यमिकची अडीचशेच बाकी आहेत!'

   आता बोला!

   अशा वेळी त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष किंवा प्रमुख पाहुणा म्हणून ज्याला बोलावले असेल त्याची काय अवस्था होत असेल याची कल्पनाच केलेली बरी! महानगरात किंवा शहरी, निमशहरी भागात कार्यक्रम असेल तर त्यांना निदान वेळेचे बऱ्यापैकी भान तरी असते. कारण बऱ्याचदा कार्यक्रमासाठी घेतलेले सभागृह पुढच्या कार्यक्रमाकरिता मोकळे करुन देण्याचा अप्रत्यक्ष दबाव आयोजकांवर असतो. ग्रामीण भागात ते असेलच याची शाश्वती नाही. मला अशाच एका गावात कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोलावले होते. माझ्या सवयीप्रमाणे मी तेथे नियोजित वेळेपूर्वी हजर झालो. तिथे पाहतो तर आयोजकच खुर्च्या लावत होते.  त्या आयोजकांनी खुर्च्या लावण्याचे काम सोडून प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली. ते तर माझ्याआधी दहा मिनिटे आले होते. मी आणि प्रमुख पाहुणे एकमेकांकडे पाहातच राहिलो. म्हणजे आणखी तीन-चार तास तरी आमची तेथून हमखास सुटका नव्हती. मग आमच्यासमोरच परत एकदा आम्हालाच आमची नावे विचारत आयोजकांपैकी एकाने तेथील फळ्यावर आमची नावे ग्यारंटेड चुकीची लिहीली. त्या शुध्दीकरणात आणखी वेळ घालवला. दोन कार्यकर्त्यांना पिटाळून गावानजिकच्याच मळ्यातून फुले, पाने आणायला लावली आणि आम्हाला द्यायचे गुच्छ आमच्यासमोरच बनवायला सांगितले. नशिब... आमच्या सत्कारासाठी लागणाऱ्या शाली त्यांनी आमच्यासमोर विणायला घेतल्या नव्हत्या.

    स्नेहसंमेलनातील समुह नृत्याविष्कार म्हणजे नुसता मजेचा मामला असतो. त्याची प्रॅवटीस अनेक दिवस चालूनही ऐनवेळी सादरीकरणात ज्या व्हायच्या त्या चूका होतातच. मला आठवते..बी.ए.प्रथम वर्षाला असताना आर.के.तलरेजा महाविद्यालय, उल्हासनगर येथील गॅदरिंगच्या एका समुह नृत्यात माझे नाव जबरदस्तीने घुसडून मला प्रॅवटीसच्या जंजाळात सवंगड्यांनी अडकवले होते. नाचकाम हा माझा प्रांत कधीच नव्हता. सरावानेही ते मला जमणार नव्हते. त्यातही त्यावेळी प्रचंड गाजलेले ‘हे नाम रे सबसे बडा तेरा नाम' हे सुहाग चित्रपटातील अमिताभ-रेखा आणि मंडळींवर चित्रित झालेले गरब्याचे गाणे या समुहनृत्यासाठी निवडायची खुमखुमी आमच्या सवंगड्यांना झाली होती. या समुह नृत्यात खाली बसून, उभे राहुन, गिरक्या घेऊन, उड्या मारुन करायच्या खूप अवघड स्टेप्स होत्या. त्यात पुन्हा हातात गरब्याच्या टिपऱ्या! दर दिवशी प्रॅवटीसला सहा मुली व सहा मुलगे अशा आमच्या बारा जणांच्या ग्रुपमधली कुठलीतरी नवी पोरगी माझ्या वाट्याला समोर यायची. ती माझ्या हातातील टिपरीऐवजी माझ्या बोटांवर नेम धरल्यासारखी टिपरी मारे. त्या आठवड्याभराच्या प्रॅवटीसमध्ये  या पोरींनी माझी बोटे चांगलीच सुजवली आणि मी अलगदच त्या समुहनृत्यातून बाद झालो आणि माझी स्टेजवरची संभाव्य फजितीच जणू टळली.

   समुह नृत्य असो की युगल सादरीकरण. त्यात एकमेकांशी चांगले ट्युनिंग असणे महत्वाचे असते. त्यातही मेकप आणि अंगावरचा वस्त्रभार व्यवस्थित केला जाणे, तो सांभाळता येणेही तेवढेच गरजेचे असते. मी अनेकदा पाहतो की गॅदरिंगला पोरं-पोरी चांगली, दमदार, पल्लेदार, भारी भरकम गाणी निवडतात. मात्र त्यासाठी आवश्यक रंगभूषा, केशभूषा, वेशभूषा पेलताना त्यांची दमछाक होते आणि समोर बसलेल्यांना नकळत हसू फुटते. धोतर, नऊवारी, मुंडासे, फेटे, नथी, घोंगडी, चाळ, घुंगरु, केसांतील भरघोस गजरे हे रोजच्या दैनंदिन जीवनात वावरताना कुणी नित्यनेमाने घालत नसते. प्रॅवटीस करतानाही हे एवढे सारे अंगावर नसते. मग सादरीकरणाच्या वेळीच एकदम हे सारे अंगावर येते. त्यात पुन्हा हा सारा भार उरावर घेऊनच संवाद बोलायचे असतात, हालचाली, नृत्य, लढाया करायच्या असतात. ते सारे मंचावर सादर करताना विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो आणि समोर बसलेल्यांना वेगळाच प्रकार पाहायला मिळतो. मी अशा काही सादरीकरणांचा साक्षीदार राहिलो आहे. काष्टा सुटणे, धोतर सुटणे, गजरा पडणे, पायातील चाळ निघणे, पुरुष पात्रांनी लावलेल्या मिशा निघणे, फेटा डोवयावरुन खाली पडणे हे असे होत असते. यावेळी समयसूचकता, प्रसंगावधान दाखवले जाणे फारच महत्वाचे असते. त्यामुळे मग या  कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, निवेदन करणाऱ्याची जबाबदारी अशा वेळी वाढत असते. त्यासाठी प्रसन्नवदनी, हजरजबाबी, उत्स्फुर्तपणे बोलत सांभाळून घेणारा/घेणारी सूत्रसंचालक हवा/हवी. अनेक स्नेह संमेलन प्रसंगी मी पाहिले आहे की पडद्याखालच्या भागातून समोर प्रेक्षागृहात बसलेल्यांना मंचावरील धावपळ करणाऱ्यांचे पाय, चपला दिसत असतात, त्यांची लगबग जाणवत असते. अचानक सूत्रसंचालक येतो आणि रेडिमेड लिहून आणलेले कागद सावरत पडदा उघडायची अनाऊन्समेंट करतो व प्रेक्षकांना स्टेजवरच्या बेसावध पात्रांचे दर्शन होते आणि एकच गोंधळ उडतो. सुरुवातच अशी झाल्याने मंचावरच्या पात्रांचा हिरमोड होतो. ‘आता हे नटराजाला, ते गणपतीला, त्या सरस्वतीला पुष्पहार अर्पण करतील' अशीही एक अनाऊन्समेट अशा कार्यक्रमाचा एक भाग असतो. यावेळी नटराजवाला हार घालायला जातो, तेंव्हा सरस्वतीवाल्याने नटराजाला हार आधीच घालून टाकलेला असतो, मग तो गणपती मूर्तीकडे वळतो, तेंव्हा गणपतीवाला गोंधळून सूत्रसंचालकाकडे पाहतो.

   स्नेहसंमेलन असो की कोणताही अन्य कार्यक्रम..सूत्रसंचालकाने प्रसंगाचे औचित्य ओळखत निवेदन करीत कार्यक्रम सुविहितपणे पुढे कसा सरकत राहील याची काळजी घ्यायला हवी. अनेकदा असे पाहायला मिळते की सू्‌त्रसंचालकालाच स्वतःचे प्रमोशन करण्याचा मोह होतो आणि कसलाही संदर्भ नसताना ‘र' ला ‘र'  ‘ट' ला ‘ट' जोडून कसलीमसली, ओढूनताणून काव्यनिर्मीती करण्याची खुमखुमी त्याला/तिला येते... आणि या साऱ्यात तो उगाचच फुटेज खात राहतो. त्याच्या हातून माईक खेचून घेण्याची किंवा मागून जाऊन त्याचा सदरा ओढण्याची सोयही नसते. अशाच एका कार्यक्रमात तत्कालिन अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष श्री. फ.मुं.शिंदे यांनी आपल्या भाषणात सूत्रसंचालकाला नेटवया शब्दात सुनावले होते.

   तर अशी ही स्नेहाची संमेलने आणि त्यातील गंमती जमती..तुम्हीही या सारख्या किंवा याहुन घनगंभीर गंमती अनुभवल्या असतीलच! स्नेह कायम राहो आणि संमेलने सुविहीतपणे पार पडत राहोत यासाठी शुभेच्छा. - राजेंद्र गोपीनाथ  घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अपरिचित शिवराय लेखमाला