मुशाफिरी

जर असे असते..किंवा तसे असते तर..?

   प्रत्यक्ष जीवनात, कायद्यात, न्यायालयात, पोलीस स्टेशनात, संविधानात, मंत्रालयात, प्रशासनात, विधीमंडळात अशा कोणत्याही ठिकाणी ‘जर तर..., असे असते तर..., तसे घडले असते तर.. असल्या हायपोथेटिकल बाबींना काहीही अर्थ नसतो. ‘आयदर ऑर..नायदर नॉर हे साहित्यात, व्याकरण शिकताना-शिकवताना, वर्गात, शाळेत, रंजक लिखाणात, कल्पनेच्या विश्वात वावरताना वगैरे ठीक वाटते. वास्तवातल्या-व्यवहाराहातल्या आयुष्यात त्याचा थेट संबंध नसतो.

   असे असते तर, तसे घडले तर या प्रकारच्याही शक्यता पडताळून पाहण्याचीही वेळ येत असतेच कधी कधी. विशेषकरुन प्रशासनातील अधिकाऱ्यांना कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष देताना अनेक बाबी गृहीत धरुनही चालावे लागते. तेंव्हा हे जर तर चे मुद्देही ध्यानात घ्यावे लागतात.

     ताजी घटना सांगतो. हा लेख लिहायला घेताना ‘हर हर महादेव' या सिनेमाचा ठाण्यात विविआना मॉलमधील खेळ जीतेंद्र आव्हाड या माजी मंत्र्यासोबतची काही माणसे  प्रेक्षकांना मारहाण करीत बंद पाडल्याची दृश्ये विविध वाहिन्यांवरुन दाखवली जात होती. एका कुटुंबप्रमुखाचे कपडे फाडून त्याला सार्वजनिक ठिकाणी ही माणसे मारझोड करीत असताना पाहुन आपण ‘तालिबानी राजवटी'त तर नाही ना असे आपल्याला क्षणभर वाटून गेल्याचे काही जण म्हणत होते. आज राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असती तर? जीतेंद्र आव्हाड आजही मंत्री असते तर? आजमितीस तत्कालिन ठाणे जिल्हा शिवसेनाप्रमुख आनंद दिघे हयात असते तर? हे असले काही पहायला मिळाले असते काय? ‘इतिहासाची तोडमोड झाली, हिंदुत्वाचे विकृतीकरण झाले, मराठ्यांचा इतिहास बदलून सांगितला जातोय' अशी भूमिका याआधी न फुटलेली एकसंघ शिवसेना घेत असे. विजय तेंडुलकरलिखित ‘घाशीराम कोतवाल' या नाटकावरुन उठलेले वादळ आठवा. त्या नाटकाच्या परदेश दौऱ्यासाठी मराठी कलावंतांना विमानतळावर सुखरुप नेण्यासाठी बंदोबस्त पुरवण्याची वेळ तत्कालिन काँग्रेस सरकारवर आली होती. मात्र त्यावेळच्या एकसंघ शिवसेनेचे ते कार्ड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता वापरताना दिसत असून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे (मशाल) व बाळासाहेबांची शिवसेना (ढाल-तलवार) हे दोन्ही पक्ष यावर तितक्या जोरात बोलताना दिसत नाहीत. तर मूळ शिवसेनेच्या पोटातून जन्माला आलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष हर हर महादेवच्या निर्माता-दिग्दर्शकांच्या पाठीशी ठाम राहिला असून त्यांनी या सिनेमाच्या खेळांचे आयोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज तेच, महाराष्ट्र तोच, राजकारणीही तेच! फवत त्यांचे पक्ष, त्यांच्या जागा इकडे तिकडे काय झाल्या..लगेच बघा काय काय पहायला मिळतेय ते ..हेच ते ‘जर.. तर' होय!

     आणखी जवळचे उदाहरण देतो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर ही सारी मुंबई-ठाणे जिल्ह्यांतली एकमेकांशी भौगोलिक सानिध्य असलेली, एकमेकांना खेटून असलेली महानगरे असून तेथे महानगरपालिका स्थापन होऊनही पुरेसा कालावधी लोटला आहे. यापैकी एकेकाळचा ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टा एवढीच ओळख असलेल्या नवी मुंबईला आता नियोजनबध्द नगरी, एकविसाव्या शतकातले शहर, इन्फोटेक सिटी, सायबर सिटी, एज्युकेशन हब, भारतातील नेटके, स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर असा सातत्याने पुरस्कार मिळवणारे महानगर अशा विविध बिरुदांनी ओळखले जाते. ग्रामपंचायतींतून थेट महानगरपालिकेत रुपांतरीत झालेली ही नवी मुंबई आहे. येथील नगर नियोजन आधी सिडकोच्या हाती होते. सिडकोने विविध चूका तेंव्हा केल्या..आजही करीत आहे.., त्याविरोधात मोर्चे-आंदोलने, गोळीबार झाले, अनेक त्रुटीही नगर नियोजनात राहुन गेल्या; पण तरीही नवी मुंबईच्या नेटकेपणाचे श्रेय आजही अनेक लोक सिडकोलाच देतात. सिडको जर नवी मुंबईत आलीच नसती तर? ठाणे-वाशी-पनवेल तसेच मानखूर्द-पनवेल रेल्वेमार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, त्या अनुषंगाने विमानतळाकडे-उरणकडे जाणारेे विविध नवीन-कॉंक्रिटीकरण झालेले रस्ते, तेथील मोठमोठाले उड्डाणपुल, नेरुळ-खारकोपर-उरण रेल्वेमार्ग या साऱ्या गोष्टी नवी मुंबई परिसरात एवढ्यात पहायला मिळाल्या असत्या? १९९५ साली नवी मुंबई महानगर पालिका स्थापन झाल्यावर तर येथील सोयी-सुविधांत, आकर्षण बिंदूंत सातत्याने भरच पडत गेली. आज येथे सिडको-नवी मुंबई महानगरपालिकेसह नैना प्राधिकरण, मुंबई विभागीय प्रादेशिक प्राधिकरण (एमएमआरडीए) अशा यंत्रणाही कार्यरत आहेत. जरा बाजूच्याच उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर या महानगरांची अवस्था व तेथील सोयी-सुविधांचा दर्जा पहा. म्हणजे या ‘जर.. तर' चा अर्थ नेमकेपणाने कळेल.

  हल्लीच्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे तसे कमी  बोलतात. जेलात जाण्यापूर्वी संजय राऊत ज्याम बोलायचे. मधल्या काळात त्यांची जागा सुषमा अंधारेबाईंनी जणू भरुन काढली. तशा विद्यमान विधानपरिषद हंगामी सभापती निलमताई गोऱ्हेही बोलतात. पण या दोघींमध्ये एक विलक्षण साम्य व त्याचवेळी विलक्षण भेद माझ्या नजरेला दिसतो; तुम्हीही ते टिपले असेल कदाचित! अंधारेबाई व निलमताई या दोघीही मूळच्या शिवसैनिक नव्हेतच मुळी! २००२, २००८, २०१४ व आता २०२० अशी सलग चार सत्रं शिवसेनेची विधान परिषद आमदारकी भूषवणाऱ्या निलमताई या मूळच्या आर पी आयच्या. त्या तिकडे सरचिटणीस म्हणून काम पहात. तर शिवसेनेच्या फायरब्रॅण्ड वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या अंधारेबाई याही मूळच्या बुध्दीस्ट विचाराच्या, आक्रमक व वक्तृत्वाबद्दल स्पर्धांमधून विविध पारितोषिके मिळवणाऱ्या वक्त्या, आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेल्या व राष्ट्रवादी-काँग्रेसच्या विचारमंचावरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर खरपूस टिका केलेल्या. २८ जुलै २०२२ रोजी त्या शिवसेनेत दाखल होताच त्यांना लगेच शिवसेना उपनेतेपदाची ‘गिफ्ट' उध्दव ठाकरे यांनी दिली. निलमताई या विचारी, संयमी, समतोल, मोजूनमापून बोलणाऱ्या; तर अंधारेबाई काय आहेत हे सर्वजण आता पाहताहेतच! या मूळच्या शिवसैनिक नसलेल्या दोघी शिवसेनेत आल्या नसत्या तर?  

  काही दिवसांपूर्वी भारताचे माजी उपपंतप्रधान, माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचा वाढदिवस साजरा झाला. त्यावेळी त्यांचे अभीष्टचिंतन करण्यासाठी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या घरी गेले व काही काळ त्यांनी अडवाणींसोबत घालवला. हे लालकृष्ण अडवाणी भाजपमधील एकेकाळच्या जहाल गटाचे प्रतिनिधित्व करीत; तर माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी मवाळ गटाचे नेते होते. अडवाणींना ‘पी एम इन वेटींग' असेही संबोधले जाई. पण काही वर्षांपूर्वी ‘वयाची मर्यादा' हे कारण पुढे करीत भाजपच्या शिखर नेतृत्वाला ‘कंपल्सरी रिटायरमेण्ट स्कीम (सी आर एस)' अंतर्गत घरी बसवण्यात आले. त्यात हे अडवाणीही होते. भाजपचा सत्ता सोपानाचा मार्ग सोप्पा करण्यात अडवाणींची राम मंदिरासाठी काढलेली रथयात्रा व नंतर बाबरी पाडण्याचे आंदोलन कसे कारणीभूत ठरले हे सारेजण जाणताच! त्यावेळी अडवाणींच्या त्या रथात नरेंद्रभाई मोदीही दुय्यम भूमिकेत कसे होते याच्या अनेक ध्वनिफिती, छायाचित्रे, वार्तापत्रे तुम्हाला पहायला मिळतील. त्यानंतर विविध कार्यक्रमांत अडवाणी बिचारे केविलवाण्या अवस्थेत मोदींना हात जोडताहेत..तर मोदी त्यांच्याकडे पहातही नाहीत अशा विलप्स प्रसारीत होत होत्या. अडवाणींचे शिष्य प्रमोद महाजन यांना फार आयुष्य लाभले नाही. तर भाजपमधून महिला पंतप्रधान म्हणून सुषमा स्वराज पुढे याव्यात असे अनेक भाजपविरोधकांनाही वाटे;  त्याही अकाली गेल्या. मनोहर पराीकर गेले. प्रा. मुरली मनोहर जोशी, व्यंकय्या नायडू, सुमित्रा महाजन या अनुभवी लोकांना पध्दतशीरपणे बाजूला सारले गेले. उमा भारती मध्येच सेवानिवृत्त झाल्या. यशवंत सिन्हा यांना पक्ष बदलावा लागला; तर नितिन जयराम गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून पध्दतशीर वगळले गेले आणि पक्ष व सरकार यांच्यावर केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुजराती माणसांचीच पकड राहील अशी चाल खेळण्यात आली. भाजपमधील ही बाकीची सारी माणसे त्यांच्या पूर्ण शक्तिनिशी आज कार्यरत असती तर?

...पण या ‘जर..तर' ला तसा काही अर्थ नसतो..हेही आपण सध्या पाहतोय.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी