गणेशोत्सव-नवरात्रोत्सव बाबत महापालिकेने विकसीत केली इ-सेवा संगणक प्रणाली

 नवी मुंबई : गणेशोत्सव 2022, 31 ऑगस्ट ते दि.09 सप्टेंबर 2022 या कालावधीत तसेच नवरात्रौत्सव 2022 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे.

 नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १७३/२०१० संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षाप्रमाणे या वर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” महापालिकेने विकसीत केली आहे.

सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव मंडळे व नागरिक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरिता परवानगी अर्ज सादर करण्याची मुदत 14 जुलै 2022 पासून कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा सुरु करण्यात येत आहे. तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच वेबसाईटवर मंडप उभारणेकरिता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाईन प्रणालीद्वारे दोन्ही उत्सवाच्या १० दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे, याची कृपया नोंद घ्यावी. गणेशोत्सव व नवरात्रौत्सव याकरिता सर्व संबधित विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये. तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहित धरु नये. परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नये. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल. सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ/नागरिकांनी याची दक्षता घ्यावी. मंडप उभारणी परवानगी अर्ज उपरोक्त नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे तसेच www.rtsnmmconline.com या वेबसाईटवर ऑनलाईन सादर करावेत. लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये. विशेष करुन गणेशोत्सव/नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी याची नोंद घ्यावी. उत्सव सुरु होण्याच्या १० दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी, असेही सूचित करण्यात येत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रोत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत मागील वर्षी 29 जून 2021 अन्वये शासनाच्या गृह विभागाकडील परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावयाची आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एकल प्लास्टिकचा वापर न करण्याचा निर्धार