मुशाफिरी : डर्टी बॉय कोण?

डर्टी बॉय कोण?

अनेक जण मागचा पुढचा विचार न करता, आपली पात्रता, आपला वकूब लक्षात न घेता चटकन कुणाही बद्दल आक्षेपार्ह, अवमानकारक टिप्पणी करताना दिसून येतात. यातील अनेक लोक ‘मी हसतो लोकांना अन्‌ शेंबूड माझ्या नाकाला' या प्रकारातले असतात..आणि तरीही नाक वर करुन हे लोक बोलायचे थांबत नाहीत..पण नैसर्गिक न्याय आपले काम करत असतो. यांनाही अल्पावधीत ‘कडवा जवाब' मिळतो आणि मग तोंड लपवण्याची नामुष्की ओढवते.

दोन बालके खेळत असतात. एकमेकांत ते रमले असतात. पाच - सहा वर्षांच्या त्या दोन मुलांना आपसांत खेळताना जणू आजूबाजूचा विसरच पडलेला असतो. निष्पाप निरागस असे ते बाल्य... ‘बालपणीचा काळ सुखाचा' या उक्तीचा पुरेपुर आनंद घेत असते. तेवढ्यात त्यापैकी एका मुलाची आई येते. ती त्या दुसऱ्या मुलाकडे बोट दाखवीत सांगते.. ‘डर्टी बॉय. त्याच्याबरोबर खेळू नकोस. तो धुणीभांडी करणाऱ्या कामवालीचा मुलगा आहे.' कोऱ्या पाटीसारखे मन असलेल्या त्या बालकाला आई सांगते ते खरेच वाटते. ते बालक लगेच खेळ सोडून आईचे बोट धरत घरची वाट धरते. हा सारा प्रकार तेथील अन्य आयांनी मात्र पाहुन ठेवलेला असतो.

   आज देशात, राज्यांत, जिल्ह्यांत, तालुवयांत, शहरांत, गावांत, गल्लीत, भावकीत याहुन आणखी काही वेगळे घडत असते बरे? जो उठतो तो आपले लोक सोडुन इतरांना नावे ठेवण्यात, कुचाळक्या करण्यात, टिंगल,  टवाळकी करण्यात, द्वेष पसरवण्यात धन्यता मानताना दिसत आहे. वर्गवारी, वर्णवर्चस्ववाद, तुच्छतावाद, जातीयवाद, विभाजनवाद या गोष्टींना कधी नसेल तेव्हढा उत आलेला दिसत आहे. एक घटना काही महिन्यांपूर्वीची आहे..पण समाजमाध्यमांवर ती आता मोठ्या स्वरुपात अग्रेषित होत आहे. ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा' हा सोनी मराठी वरील विनोदी कार्यक्रम अनेकजण पाहतात व त्याचा आनंद लुटुन दिवसभराच्या ताणतणावांतून मुक्त व्हायला बघतात. त्यातील एका भागात समीर चौघुले याने आदिवासी समाजाच्या तारपा नृत्याची टवाळी केल्याची क्लीप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली असून त्यात समीर चौघुले व सोनी मराठी वाहिनीला अनेक दर्शकांनी अगदी ‘आडे हात' घेतले आहे. प्रत्येक समाजविशेषांचे काही सांस्कृतिक संचित असते, वैशिष्ट्य असते, खासियत असते. त्यापैकी एक आदिवासी समाजाचे तारपा नृत्य होय. त्याची टिंगल करुन हंशे वसूल करण्याचे समीरला काहीच कारण नव्हते. जर तो इपिसोड समीर चौघुले सोडून अन्य लेखकाने लिहिला असेल तर त्या ‘विद्वान' लेखकाने तरी त्याचे भान राखायला हवे होते. सोनी मराठी वाहिनी इपिसोडच्या सुरुवातीला बारीक अक्षरात ‘आम्ही हे केवळ मनोरंजनासाठी करीत असून त्यात कुणालाही दुखवायचा हेतू नाही' अशा ओळी टाकून सुटका करायला मागत असेल तर त्यांना लवकरच ॲट्रॉसिटी कायद्याचा दणका मिळेल हे नवकी. कारण हे विशिष्ट समाजांप्रतिचे तुच्छतादर्शक वर्तन असून त्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.

   असला नादानपणा हीच ‘सोनी मराठी' वाहिनी आगरी समाजाबद्दल वारंवार करीत आली आहे. यात अरुण कदम हा अभिनेता आगरी पात्र रंगवताना दिसतो. आगरी भाषा ही ऐकायला खूपच गोड असून त्यातील काही झणझणीत शब्दप्रयोग हंशा पिकवायला उपयोगी पडतात हे खरे. मग आगरी भाषेच्या त्या अंगाची मजा घ्यावी. पण हे सोनी मराठीवाले व त्यांचे काही दीडशहाणे लेखक अरुण कदमला आगरी पात्र रंगवायला देताना आगरी व्यवितमत्व हे वेडे, अर्धशिक्षित, ‘कुणीही यावे खुशाल गंडवून जावे' अशा प्रकारचे हमखास रंगवतात. नीट माहिती न घेता घरात बसून स्क्रिप्टा खरडणाऱ्या लेखकाना हे माहित असले पाहिजे की मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा मूळ तसेच नाशिक व रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागांत पिढ्यान्‌पिढ्या वास्तव्य करणारा आगरी समाज असून मुंबईच्या मोठ्या भागाचा सातबारा या समाजाचा नावावर होता, आहे. ज्यांच्या नावाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत होऊ घातले आहे ते रायगडचे माजी खासदार सन्मा.ॲड. कै. दि.बा.पाटील, अनेक शिक्षणसंस्थांचा कारभार लिलया पेलून वर्तमानपत्र, सामाजिक संस्था, धार्मिक संस्था यांचे प्रमुख असलेले तसेच अडचणीतील व्यवित अथवा मदत मागायला गेलेला कुणीही याचक यांना उदारहस्ते सहकार्य करणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुवत डॉ. रविंद्र शिसवे, सिडकोचे तत्कालिन अध्यक्ष ॲड. कै. ए.टी. पाटील, विद्यमान केंद्रीय मंत्री ना. कपिल मोरेश्वर पाटील, राज्याचे माजी मंत्री लिलाधर डाके, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी मंत्री नकुल पाटील, भारताला दोन वेळ आंतरराष्टी्रय महिला कब्बडी स्पर्धेत विजेतेपद मिळवून देणारी अर्जुन पुरस्कार विजेती तत्कालिन कर्णधार अभिलाषा म्हात्रे, आमदार मंदाताई म्हात्रे, दानशूर आमदार राजू पाटील ही व अशी शेकडो नामवंत, गुणवंत, ऐश्वर्यवंत आगरी व्यक्तीमत्वांची नावे सांगता येतील. यांच्यापैकी अनेकांच्या विविध उद्योग-व्यवसायांत, शिक्षण संस्थांमधून वेगवेगळ्या जातीधर्माचे शेकडो लोक काम करतात. कुणालाही कधी भेदभावाची वागणूक नसते. अनेकांना व्यवसाय मालक म्हणून नोकरी-रोजगार पुरवून त्यांच्या चरितार्थाला हातभार लावणाऱ्या आगरी समाजाचे चित्रण कुणी अडाणी, अर्धशिक्षित, गंडवण्यास सोपा असे करीत असेल तर या मालिकावाल्यांचे व त्यांच्या लेखकांचे मेंदू तपासायला दिले पाहिजेत. मागे ‘चला हवा येऊ द्या' वाल्यांनी असाच बावळटपणा केला होता, त्यावेळी त्यांच्यावर चॅनेलवरुन जाहिर माफी मागण्याची वेळ आली  होती आणि पनवेलला नाट्यप्रयोगानिमित्त आलेल्या भाऊ कदमलाही पोलीसांच्या उपस्थितीत आगरी नेत्यांकडे क्षमायाचना करावी लागली होती. तर ते असो.

   बॅक टू मूळ सब्जेक्ट. या लेखाच्या सुरुवातीची ज्या बालकाची पढतमूर्ख आई दुसऱ्या बालकाला ‘डर्टी बॉय' संबोधत स्वतःचे मूल त्याच्याशी खेळण्यापासून वेगळे करुन घरी आणते..तिचे बॅकग्राऊण्ड काय? तर तिच्या डोळ्यांच्या व ओठांच्या व्यंगामुळे अनेक तरुणांकडून तिला नकार मिळालेले. ‘नुसताच रंग गोरा...बाकी सारा कागद कोरा' अशा स्वरुपाच्या या बाईला पसंत केले ते काळ्याशार मुलाने. ज्याच्या घरात अनैसर्गिक मृत्यूंचे प्रमाण खूप. त्याच्या परिवारात शारीरीक व्यंग, विविध आजाराने पिडीत, व्यसनी लोक अनेक. तडजोड म्हणून समाजाबाहेरची मुलेमुली निवडून नगाला नग उभा करणे किंवा आयुष्यभर बिनलग्नाचे राहणे अशीही उदाहरणे त्या परिवारात. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणही जेमतेम. अशा घरच्या सूनेने एका कष्टाळू कामवाल्या महिलेच्या मुलाला खुशाल ‘डर्टी' म्हणावे?

...वीस वर्षांनंतरचा सीन....

   ...एक मुलगा नोकरीसाठी ‘ॲप्लाय..ॲप्लाय नो रिप्लाय' परिस्थितीला विटलेला. शिक्षणही अर्धवट. विज्ञान तंत्रज्ञान हा परवलीचा शब्द असलेल्या युगात बारावी-एफ वाय होत पुढचे शिक्षण सोडून दिलेल्यांना विचारतो कोण? अशीच ओळखीच्या कुणाकडून तरी माहिती मिळाल्यावरुन तो मुलगा काही जणांच्या शिफारशीसह  नोकरीसाठी प्रयत्न करतो. त्याला मुलाखतीसाठी बोलावले जाते. केबिनमध्ये त्याला सोडल्यावर बॉसच्या समोर तो अर्धशिक्षित मुलगा  अजागळासारखा बसतो. समोरचा बॉस त्याला नीट बसायला सांगतो. ...आणि त्याला न्याहाळत म्हणतो...‘अरे, तु त्या अमुकतमुकचा मुलगा काय?' इकडे हा चकित होऊन ‘हो' म्हणतो. ‘तुला आठवते का, तुझ्या आईने तुला माझ्यासोबत खेळत असताना मी धुणीभांडी करणाऱ्या कामवालीचा मुलगा म्हणून मला डर्टी बॉय म्हणत माझ्यापासून वेगळे करत घेऊन गेली होती?' हा मुलगा काहीसे आठवत ‘हो' म्हणतो. मग तो ‘डर्टी बॉय' मीच..बॉस सांगतो... ‘पण मला अस्पृश्य कुणी वाटत नाही. मी तुला माझ्याकडे कामासाठी ठेवत आहे असे तुझ्या आईला जाऊन सांग. ..आणि कधीही कुणाच्या आर्थिक किंवा कामाच्या प्रतवारीवरुन माणसांची पारख किंवा टवाळकी करत जाऊ नका हेही सांग. कारण कुणाचेच एकसारखे दिवस कधीही कायम राहात नसतात. दिवस फिरायला वेळ लागत नाही. माणसाने माणसाशी माणसासम वागले पाहिजे आणि दुसऱ्याच्या संकटप्रसंगी उपयोगी पडले पाहिजे हेच मला माझी आई शिकवीत राहिली...' बॉसचे हे बोलणे ऐकून तो मुलगा खजील होतो आणि बॉसला नमस्कार करुन वीस वर्षांपूर्वी आपल्या आईकडून घडलेल्या प्रमादाची माफी मागून नोकरी दिल्याबद्दल बॉसला धन्यवाद देतो.

   गेली काही वर्षे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत नवी मुंबई महानगर हे देशभरात नावाजले जात आहे. यानिमित्त अनेक चित्रकार, रांगोळीकार, घोषवाक्यकर्ते यांच्या रचनांना योग्य ती प्रसिध्दीही नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे दिली जात असून शहरातील अनेक वास्तूंच्या भिंती अशा विविध रचनांनी सजल्या आहेत व शहराच्या शोभेत भर घालत आहेत. यात एका ठिकाणी पाहिलेले चित्र व  त्यासोबतची शब्दावली मला विचलित करुन गेली. एका ठिकाणी रेखाटलेल्या चित्रात आई, मुल आणि सफाई कामगार दाखवले आहेत. आई मुलाला सांगते..‘जा, कचरेवाला आला आहे, त्याला कचऱ्याचा डबा आणून दे. त्यावर ते चुणचुणीत मुल आईला सांगते..‘अगं आई, कचरेवाले तर आपण आहोत. आपण हा सारा कचरा केला आहे आणि हा तर सफाईवाला आहे.'

   मला वाटते इतरांबद्दल चटकन व जातिवाचक-व्यवसायवाचक कोणतीही शेरेबाजी करण्याआधी बोलणाऱ्याने दहादा विचार करायला हवा. कारण पुढच्या पिढीला ‘डर्टी कोण आणि क्लीन  कोण' हे फार चांगल्या पध्दतीने समजू लागले आहे. 

- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक :  दै. आपलं नवे शहर.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मंत्रालयातुन... अहंकारी राजा आणि निर्बुध्द प्रजा!