यंदा डेंग्यू रुग्ण संख्येत वाढ

वाशी ः दरवर्षी पावसाळी दिवसात साथीचे आजार डोके वर काढतात. पावसाळ्यात प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू आजार अग्रक्रमी असतात. यंदाही नवी मुंबई शहरात डेंग्यू आजाराचे रुग्ण आढळत असून, आतापर्यंत सात डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. यंदा मात्र मागील चार वर्षाच्या तुलनेत डेंग्यू रुग्ण वाढलेले निदर्शनास येत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. मात्र, मलेरिया रुग्ण कमी आहेत.

पावसाळा सुरु झाल्यावर साथीचे आजार गॅस्ट्रो, अतिसार, लेप्टोस्पायरोसीस तसेच किटकजन्य मलेरिया, डेंग्यू आजार डोके वर काढू लागतात. कोरोना कालावधीत साथीचे आजार नियंत्रणात होते. परंतु, साथीच्या आजारात यंदा पुन्हा वाढ होत आहे. सन २०२०-२१ कालावधीत ‘कोरोना'ने डोके वर काढले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय जडली होती. याशिवाय नागरिकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला होता. त्यामुळे नवी मुंबई शहरात  कोरोना व्यतिरिक्त साथीचे आजार रुग्ण कमी झाले होते. परंतु, मागील वर्षी बऱ्याच ठिकाणी विशेषतः खासगी बांधकाम कंपनी, तुर्भे, नेरुळ, कुकशेत गाव, झोपडपट्टी विभाग, सिडको वसाहतीतील घरे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेंग्यू डासांची पैदास आढळली होती. परिणामी ऑगस्ट-२०२१ मध्ये नवी मुंबई शहरात झपाट्याने मलेरिया, डेंग्यू सदृश्य रुग्णांमध्ये वाढ झाली होती. यंदाही जुलै महिना सुरु असून, डेंग्यू आजाराचा १ रुग्ण आढळला आहे. मे महिन्यात १ तर जून महिन्यात ५ डेंग्यू रुग्ण आढळले होते. त्यामुळे आतापर्यंत नवी मुंबई शहरात ७ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत.


नवी मुंबई शहरात सन-२०१८ मध्ये पूर्ण वर्षभरात ४ डेंग्यू रुग्ण, सन-२०१९ मध्ये ६ डेंग्यू रुग्ण आढळले होते. मात्र, सन-२०२० मध्ये एकही डेंग्यू रुग्णाची नोंद झाली नाही. तर मागील वर्षी सन-२०२१ मध्ये पूर्ण वर्षभरात नवी मुंबई शहरात ८ डेंग्यू रुग्ण सापडले होते. मात्र, यंदा जुलै महिना संपला नसतानाही आतापर्यंत नवी मुंबई शहरात ७ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे मलेरिया म्हणजेच हिवताप रुग्णांबाबत मात्र दिलासा मिळत आहे. मागील चार वर्षाच्या तुलनेने यंदा नवी मुंबई शहरात मलेरिया रुग्णांची संख्या कमी आढळत आहे. नवी मुंबई शहरात सन-२०१८ मध्ये १०६ मलेरिया रुग्ण, सन-२०१९ मध्ये ५२ मलेरिया रुग्ण, सन-२०२० मध्ये २६ मलेरिया रुग्ण, २०२१ मध्ये ४४ मलेरिया रुग्ण आणि २०२२ मध्ये आतापर्यंत ९ मलेरिया रुग्ण आढळले आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळमध्ये लवकरच ऑलिम्पिक धर्तीवर जलतरण तलाव