नेरुळमध्ये लवकरच ऑलिम्पिक धर्तीवर जलतरण तलाव  


नवी मुंबई ः नेरुळ जिमखाना येथे अत्याधुनिक अशा ऑलिम्पिकच्या धर्तीवर ५० मीटर लांबीचा जलतरण तलाव बांधण्यात येणार असून या बहुप्रतिक्षित जलतरण तलावाचे भूमीपुजन उद्या २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिध्द गायक तथा संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, १९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या भारतीय टीममधील खेळाडू बलवींदरसिंग संधू तसेच छत्रपती ॲवार्ड विजेते जलतरणपटू उपस्थित राहणार आहेत.  


जलतरण खेळाचा विकास आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने त्याच दिवशी १० आणि १२ वर्षाखालील मुला-मुलींसाठी सकाळी ८ वाजल्यापासून ६वी नेरुळ जिमखाना जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. नेरुळ जिमखाना येथे असलेल्या सध्याच्या १६ मीटर लांबीच्या जलतरण तलावावर सदर स्पर्धा होणार असून एकूण ३२ प्रकारच्या गटामध्ये स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पदक देवून गौरविण्यात येणार असून प्रत्येक गटाची चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि संघ विजेतेपद करंडक सुध्दा या स्पर्धेअखेरीस प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील जलतरण विश्वाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावरील खेळाडू घडविण्यासाठी सदर सुविधा भविष्यामध्ये खूपच लाभदायक ठरणार असल्याचे ‘नेरुळ जिमखाना'चे मानद सचिव विकास शेट्टी यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

देशभक्तीचे दर्शन घडवित 14 ऑगस्टला नवी मुंबईकर ‘अमृत महोत्सव रन’ मध्ये धावणार