अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लांबणीवर; विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ 

 

प्रवेश प्रक्रिया शासन स्तरावर विनाविलंब राबविण्याची मागणी

नवी मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शासन स्तरावर लवकरात लवकर राबवावी, अशी मागणी माजी नवी मुंबई महापालिका 'ड' प्रभाग समिती सदस्य सुनिल कुरकुटे यांनी १२ जुलै २०२२ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या लेखी पत्रात केली आहे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, मुंबई तर्फे मागील जून महिन्यात माध्यमिक विभागाचा निकाल जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेचा निकाल लागून वीस पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. पण, पुढील प्रवेशासंबंधी कोणतीही कार्यवाही राज्य शिक्षण विभागाने केली नाही. त्यामुळे यंदा दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वैतागले असून,  अकरावी प्रवेशासंबंधी त्यांचे डोळे शासनाच्या आदेशाकडे लागले आहेत. मुंबई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ तर्फे १७ जून २०२० रोजी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्या आधीच अकरावी प्रवेशाबाबत ऑनलाईन पार्ट एकची सुरुवात झाली होती. त्यामध्ये दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने ऑनलाईन पार्ट एक प्रवेश प्रक्रियेत भाग घेऊन अर्ज भरुन नोंदणी केली होती. तसेच २२५ रुपये शुल्क देखील भरले होते. त्यानंतर दहावी परीक्षेचा निकाल लागला. परंतु, या घटनेला २३ दिवस उलटून गेले तरी देखील अंतिम ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शासनाने राबविली नाही. यामुळे दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नाराज झालेले असल्याचे चित्र दिसत आहे, असे सुनिल कुरकुटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात अधोरेखित केले आहे.

नवी मुंबई मध्ये एकूण १५३ माध्यमिक विद्यालये आहेत. या वर्षी नवी मुंबई शहराचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल ९७ % इतका लागला होता. यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा कल विज्ञान, वाणिज्य शाखाकडे आहे. तसेच अकरावी आणि बारावी या वर्गातील दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाची असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शासन स्तरावर लवकरात लवकर राबविण्याचे आदेश संबंधित विभागाला देऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुनिल कुरकुटे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

 

 

 
Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांगजन संस्थेतील विद्यार्थाना   शैक्षणिक साहित्य वाटप