ठाणे - घोडबंदर रोडवरील बिकानेर स्वीट्सवर कारवाई

ठाणे घाेडबंदर परिसरातील बिकानेर स्वीट्स या दुकानास व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश

 ठाणे:- ठाणे परिसरातील घोडबंदर रोड वरील कासारवडवली या ठिकाणी बिकानेर स्वीट्स मिठाई शॉपची अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अचानक तपासणी करण्यात आली. तपासणीवेळी या दुकानामध्ये विनापरवाना विविध प्रकारच्या  मिठाई व फरसाण ई. अन्न पदार्थाचे उत्पादन करीत असल्याने आढळून आले. तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने  २०११ चे उल्लंघन केल्याबद्दल त्रुटीची पूर्तता करेपर्यंत बिकानेर स्वीट्स या दुकानास व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांनी दिली आहे.

            अन्न सुरक्षा व मानके कायदा2006 हा जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा कायदा असून त्याचे प्रमुख उद्दिष्ट जनतेला सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हाच आहे. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत वेळोवेळी कार्यवाही करण्यात येते. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या निर्देशानुसार जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, व कोकण विभागाचे सह. आयुक्त (अन्न) सु.स.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पदावधीत अधिकारी तथा सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांच्या उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती व.रु.आडे यांनी कासारवडवली येथील मिठाई दुकानावर कारवाई केली.

            घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील बिकानेर स्वीटस मिठाई शॉपची तपासणी करण्यात आली. त्यावेळी अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी पिण्यायोग्य असल्याबाबतचा अभिलेख सादर केला नाही. तसेच या ठिकाणी अन्न पदार्थ हाताळणारे कामगार संसर्गजन्य, त्वचारोग आणि किंवा तत्सम रोग यापासून मुक्त आहेत किंवा कसे याबाबत खात्री व खातरजमा होण्यासाठी प्राधिकृत वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केलेली नाही. तसेच "उत्पादन" प्रक्रियेवर पर्यवेक्षण ठेवण्यासाठी विहित शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्तीची "पर्यवेक्षक" म्हणून नेमणूक केलेली नाही. या ठिकाणी एकही फोस्टॅक (fostac) प्रशिक्षण झालेला सुपरवायझर नसल्याचे आढळून आले. तसेच अन्नपदार्थाची खरेदी बिले सादर केली नाही.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या जनहित व जनआरोग्यासह अन्न सुरक्षेची खातरजमा होण्यासाठी मिठाई उत्पादकाने त्याच्या आऊटलेटमध्ये  पॅकबंद न  केलेल्या, सुट्ट्या किंवा खुल्या स्वरुपात विक्री  करण्यासाठी ठेवलेल्या  मिठाईच्या  कंटेनर किंवा ट्रे वर त्या अन्नपदार्थाचा/मिठाई वापरण्याची अंतिम तारीख अर्थात एक्सपायरी डेट (Expiry Date) नमूद करणे बंधनकारक आहे. मात्र, बिकानेर मिठाईच्या दुकानामध्ये विक्री करण्यासाठी ठेवलेल्या मिठाईच्या कंटेनर किंवा ट्रे वर मिठाईचा वापरण्याची अंतिम तारीख अर्थात एक्सपायरी डेट (Expiry Date) बाबतचा तपशील नमूद करण्यात आलेला नसल्याचे  तपासणीवेळी आढळून आले, अशी माहिती  सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांनी दिली.

या ठिकाणी अस्थापनेमध्ये अन्नपदार्थाचे विक्रीसाठी उत्पादन करताना कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे, जनहित व जन आरोग्याच्या दृष्टिकोनातून, उपरोक्त त्रुटींची पूर्तता करीत नसल्याने  तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने  २०११ अंतर्गत सदर आस्थापनेस विनापरवाना उत्पादन करीत असल्यामुळे उत्पादन या व्यवसायासाठी परवाना घेण्यासह तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटीची पूर्तता करेपर्यत मे. बिकानेर स्वीट्स या अन्न आस्थापनेस त्यांचा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे सहायक आयुक्त (अन्न) व्यं. व. वेदपाठक यांनी सांगितले.

अन्न सुरक्षा मानके कायदा (अन्न परवाने व नोंदणी)  नियमन २०११  चे नियमन २.१.१४(१) अंतर्गत चे निर्देशांचे तंतोतत पालन करणे अन्न व्यवसायाच्या चालकावर बंधनकारक आहे. त्याचे  उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ चे  कलम ५५ अंतर्गत २ लाखापर्यंतच्या द्रव्य दंडास पात्र ठरते, अशी माहिती श्री. वेदपाठक यांनी दिली आहे.

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

वीरयोध्दांच्या समर्पणाचे स्मरण करण्या करीता विशेष अभियान