वीरयोध्दांच्या समर्पणाचे स्मरण करण्या करीता विशेष अभियान

‘मेरी माटी, मेरा देश' ; आरटीओ तर्फे वाहनांवर ‘संदेश'द्वारे जनजागृती

वाशी : देशात सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने ‘मेरी माटी, मेरा देश' अर्थात ‘माझी माती, माझा देश' अभियान राबविले जात आहे. त्याअनुषंगाने राज्य परिवहन विभागाने देखील विभागवार ‘माझी माती, माझा देश' उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ‘वाशी आरटीओ'कडून पासिंग करिता येणाऱ्या राज्य परिवहन बस, रिक्षा, ट्रक्स आदी वाहनांवर ‘मेरी माटी, मेरा देश' लिहून जनजागृती करण्यात येत आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचा उपक्रम संपन्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने ‘मेरी माटी, मेरा देश' या एका नवीन उपक्रमाची घोषणा केलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत अमृत सरोवर, जल स्त्रोताशेजारी शिलाफलकम उभारणी, पंचप्रण शपथ आणि सेल्फी, वसुधा वंदन, वीराेंका नमन, ध्वजारोहण, राष्ट्रगाण असे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. प्रत्येक राज्यामध्ये आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, वीरयोध्दांच्या समर्पणाचे स्मरण करणे, या करीता विशेष अभियान राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाची सांगता येत्या ३० ऑगस्ट २०२३ रोजी होत आहे. त्यानुसार ‘आरटीओ'कडून ९ ऑगस्ट पासून पासिंगकरिता येणाऱ्या बस, रिक्षा, ट्रक्स आदी वाहनांवर ‘मेरी माटी, मेरा देश' संदेश प्रसारित करण्यात येत आहे. तसेच सर्व टोल नाके आणि तपासणी नाक्यावर ‘मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. 

 
Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

फळ, भाजी मार्केट मध्ये नियमांचे उल्लंघन करुन बांधकाम