जागे अभावी स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायाला घर घर

नवी मुंबई-: नवी मुंबई शहरात मागील  ५० ते ६० वर्षापासून स्थानिक मूर्तिकार मूर्ती बनवत आहेत. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे या मूर्तिकारांना जागेचा प्रश्न भेडसावत आहे आणि यासाठी मूर्तिकार संघटनेकडून मागील १२ वर्षापासून पाठपुरावा सुरू असून देखील अजून पर्यंत जागेचा प्रश्न सुटला नसल्याने या स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायाला आता घर घर लागली आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आणि यासाठी मूर्तिकार चार ते पाच महिने आधीच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागतात. मुंबई आणि उपनगरात सार्वजनिक गणेशोत्सवात मोठं मोठ्या गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. त्यामुळे मंडळाना मोठमोठया मुर्त्या लागत असल्याने मूर्तीकारांना या मुर्त्या लवकर तयार कराव्या लागतात. नवी  मुंबई शहर वसण्याआधी ग्राम पंचायत काळा पासून येथील स्थानिक मूर्तिकार मूर्ती बनवत आले आहेत. त्यानंतर सिडकोने नवी मुंबई शहराची निर्मिती केल्यानंतर या ठिकाणी हळू हळू इमारती उभ्या राहू लागल्या. जश जशा इमारती उभ्या राहू लागल्या तश तशी येथील मोकळी जागा संपत चालली. त्यामुळे येथील मुर्तीकारांना जागा अपुरी पडत चालली. त्यामुळे येथील मूर्तीकरांना हंगामी किंवा कायम स्वरुपी जागा उपलब्ध करावी म्हणून श्री मूर्तिकार संघटनेकडून मागील १२ वर्षापासून नवी मुंबई महानगर पालिकेकडे पाठपुरा्वा सुरू ठेवला आहे. मात्र त्यास अजुनही यश आले नाही. तर मागील दोन वर्षांपूर्वी तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी येथील मुर्तीकारांना एम.आय.डी.सी. भागात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र हे आश्वासनही हवेत विरले असुन मूर्तिकारांचा जागेचा प्रश्न अजूनही जैसे थे वैसेच असल्याने आज जागे अभावी येथील स्थानिक मुर्तीकारांच्या व्यवसायाला घर घर लागली आहे.     

बाजारातील तयार मूर्तीमुळेही स्थानिक मूर्तीकारांच्या व्यवसायावर परिणाम

मागील काही वर्षा पासून बाजारात  तयार मुर्ती विक्री साठी येत आहेत आणि या मूर्ती पेण येथील कारखान्यात तयार होत असतात. या मूर्ती सहज उपलब्ध होत असल्याने शहरात आज जागो जागी मूर्ती विक्री केंद्र उभी राहत आहेत, मात्र अशा तयार मूर्ती विक्री केंद्रामुळे स्थानिक मूर्तीकारांना नवीन ग्राहक मिळत नसल्याने त्यांची मदार फक्त जुन्याच ग्राहकांवर अवलंबून आहे. त्यामुळे अशा तयार मूर्तीमुळेही  येथील स्थानिक मूर्तिकारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याने शहरातील स्थानिक मूर्तीकार आज अखेरची घटका मोजत आहे .

------------------------------------

 नवी मुंबई शहरातील स्थानीक मूर्तीकारांना आज जागेची मोठी कमतरता भासत आहे. आणि यासाठी मागील १२ वर्षापासून आम्ही पालिकेसोबत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मात्र अजूनही जागेचा प्रश्न अधांतरितच आहे. त्यामुळे एम.आय.डी.सी. भागात मूर्ती कारखान्यांसाठी कायम किंवा हंगामी जागा उपलब्ध करुन द्यावी. - संतोष चौलकर, अध्यक्ष, श्री गणेश मूर्तीकार संघटना, नवी मुंबई.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इमारत बांधकाम उंचीची मर्यादा लवकरच 150 मीटर होणार