वारसा

मनुष्य नावाची जात जिवंत राहायची असेल तर प्रत्येक माणसामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, करुणा या भावना असायला हव्यात. त्यासाठी आवश्यकता असते ती विचारांच्या वारशाची. हा वारसा आपल्या मुलांना पुस्तकातून, चित्रपटातून मिळणार नाही तर तो आपण पालकांनीच त्यांना द्यायला हवा.सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी, माया, करुणा याच भावना असतात. आपल्या अस्तित्वासाठी त्याच आवश्यक असतात. म्हणून त्यांचाच वारसा आपण पुढच्या पिढीला पालक म्हणून द्यायला हवा. बाकी काहीही देण्याची आवश्यकता नाही. बाकी मुलांना जे काही आवश्यक आहे ते ती मिळवतीलच.

माणसाच्या एका पिढीने दुसऱ्या पिढीला काय द्यावं याची अनेक माणसं अनेक उत्तर देतील. प्रत्येकाच्या दृष्टीने प्रत्येकाचे उत्तर म्हणजे ‘देणं' हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी योग्यच असेल. पण अखंड मानवतेचा विचार करायचा म्हटलं तर माणसाच्या एका पिढीने दुसऱ्या पिढीला वारसा म्हणून विचार द्यावेत, ज्ञान द्यावे, संस्कार द्यावे, मूल्य द्यावीत, स्वप्न द्यावीत, प्रेम द्यावे, समृद्ध जीवनाच्या वाटा द्याव्यात. जे जे शाश्वत आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न करावा. जे नाशवंत आहे त्याचा कणही पुढच्या पिढीच्या कोणालाही  वाट्याला येऊ नये असे नियोजन करावे. वारसा म्हणून मला पुढच्या पिढीला काय द्यायचे आहे याचे प्रत्येक पालकाने नियोजन केले तर पुढच्या अनेक पिढ्या सुखी होतीलच. पण या जीवनातही पालक म्हणून आपण आणि पाल्य म्हणून आपली मुले नक्कीच सुखी होतील. हा सुखी होण्याचा मार्ग जर आपल्याला सापडायचा असेल तर आपण पालक म्हणून कोणता विचाराचा वारसा आपल्या मुलांना देतो हे महत्त्वाचे आहे. तो वारसा नेमका कसा असावा हे खालील प्रसंगातून कळेल.

एक दुसरीतला विद्यार्थी दोन-तीन दिवस शाळेत आला नाही म्हणून त्याच्या बाईंनी त्याची चौकशी केली. तर तो मुलगा आजारी आहे असे बाईंना कळले. मुलाची जिल्ह्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती. सात-आठ वर्षाच्या मुलाची शस्त्रक्रिया झाल्याचे कळतच बाईंना वाईट वाटलं. शाळा सुटल्यानंतर बाई आपल्या विद्यार्थ्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये निघाल्या. बाईंच्यासोबत त्यांचा अठरा एकोणीस वर्षाचा मुलगा होता. संध्याकाळची वेळ होती. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची गर्दी होती. बाईंचे सारे लक्ष हॉस्पिटलमध्ये असलेल्या मुलाकडे लागले होते. त्या धावपळीतही आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी फळे खरेदी केली होती. हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाताच बाई आपल्या मुलाला घेऊन लहान मुलांच्या वॉर्डमध्ये गेल्या. आपल्या विद्यार्थ्याला भेटल्या. बाई भेटल्याचा विद्यार्थ्याला खूप आनंद झाला. तो आनंद त्यांने शब्दातून व्यक्त करण्याऐवजी डोळ्यांतून व्यक्त केला. त्या वॉर्डमध्ये अनेक आजारी लहान मुले होती. प्रत्येकाचे दुखणे निराळे होते. बाईंचा मुलगा इतर लहान मुलांकडे बघत होता. भेटण्याची वेळ संपली. बाई आणि त्यांचा मुलगा परत जायला निघाले. फळांची बॅग विद्यार्थ्याकडे देऊन बाई आणि त्यांचा मुलगा बाहेर पडले. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना बाईंचा मुलगा बाईंना म्हणाला, आई, ही लहान मुले कधीच आजारी पडायला नकोत, ती लवकर बरी व्हायला हवीत. बाई क्षणभर थांबल्या.त्यांनी आपल्या मुलाच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाल्या, बाळा, तू मोठा झाल्यावर डॉक्टर, इंजिनियर झाला नाही तरी चालेल पण माणसांच्या मुलांबद्दलचे आणि माणसाबद्दलचे  तुझे हे विचार असेच कायम ठेव.

एका साध्या प्रसंगत एका आईने माणुसकी जतन करण्यासाठी आपल्या मुलाला विचारांचा वारसा अशाप्रकारे दिला. माणसाने इथून पुढच्या आयुष्यात कितीही प्रगती केली, कितीही अशक्यप्राय आणि स्वप्नवत गोष्टी साध्य केल्या तरी माणसाला माणसाची गरज भासणारच हे सत्य आहे. माणसाची जागा कोणतेही यंत्र कधीही घेऊ शकत नाही. जरी त्या यंत्रामध्ये कितीही  भावनिक बुद्धिमत्ता कृत्रिमपणे ठासून भरलेली असली तरीही.

वरील प्रसंगातील आईला जे वाटले ते प्रत्येक आईला वाटायला हवे. कारण मनुष्य नावाची जात जर अस्तित्वात राहीली तरच बाकीच्या इतर  गोष्टींना महत्त्व असेल. अन्यथा सगळे व्यर्थ असणार आहे. आणि मनुष्य नावाची जात जिवंत राहायची असेल तर प्रत्येक माणसामध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, करुणा या भावना असायला हव्यात. या भावना कागदांच्या डिर्ग्या घेऊन प्राप्त होत नाहीत. त्यासाठी आवश्यकता असते ती विचारांच्या वारशाची. विचारांचा हा वारसा आपल्या मुलांना पुस्तकातून, चित्रपटातून मिळणार नाही तर तो आपण पालकांनीच त्यांना द्यायला हवा.

जुलै महिन्याचे दिवस होते. गेले चार-पाच दिवस अविश्रांत पाऊस धो-धो पडत होता. सगळीकडे फक्त पाणीच पाणी होते. आकाशात सूर्य दिसत नव्हता. सबंध आकाश पाणी भरलेल्या काळ्या ढगांनी भरलेले होते. नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत होते. माणसं त्यांच्या त्यांच्या घरात सुरक्षित होती. पक्षी झाडावर शांत बसले होते. गाई-गुरे गोठ्यात बांधलेली होती. त्या रात्री पावसाचा जोर वाढला होता. सोबतीला वाराही होता. वातावरण थंड होते. फक्त वाऱ्याचा आणि पावसाचाच आवाज येत होता. एक दहा-बारा दिवसाचे कुत्र्याचे पिल्लू आणि त्याची आई निवारा शोधत होती. थंडी आणि पावसामुळे पिल्लाचा आवाजही बंद झाला होता. पिल्लू फक्त कुडकुडत होते. त्याच्या आईने पिल्लाला पोटाखाली घेतले होते. आभाळातून पडणारा प्रत्येक थेंब ती आई स्वतःच्या अंगावर झेलत होती. कशीतरी एका घराच्या आडोशाला तिला जागा मिळाली. पण तरीही आई भिजत होती. मात्र तिचे पिल्लू सुरक्षित होते. अगदी भिंतीला भेटून ती उभी होती. रात्रभर पाऊस कोसळत होता. तिने थोडीसुद्धा हालचाल केली नाही. पिल्लाला मात्र भिजू दिले नाही. सकाळ झाली. हळूहळू पाऊस थांबला. घरमालकाने अंगणाचे कुंपण उघडले. कुंपण उघडताच आई पिल्लाला घेऊन अंगणात आली. पिल्लू सुरक्षित असल्याची तिने पिल्लाच्या डोळ्यात बघूनच खात्री केली आणि त्याच क्षणाला स्वतःचा प्राण सोडला. रात्रभर स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपल्या जीवाला तिने वाचवले. कशासाठी?  तर आपला वारसा सुरक्षित आणि सुखाने या जगात नांदावा म्हणून.

प्राणी काय आणि मनुष्य काय सर्वांमध्ये प्रेम, आपुलकी, माया, करुणा याच भावना असतात. आपल्या अस्तित्वासाठी त्याच आवश्यक असतात. म्हणून त्यांचाच वारसा आपण पुढच्या पिढीला पालक म्हणून द्यायला हवा. बाकी काहीही देण्याची आवश्यकता नाही. बाकी जे काही  त्यांना आवश्यक आहे ते ती मिळवतीलच.

चांगले पालक होण्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जे शाश्वत आहे तेच मुलांना द्या. कारण तोच ठेवा टिकणार आहे. जे शाश्वत आहे तेच मिळवण्यासाठी मुलांना मार्गदर्शन करा. बाकी येणारी पिढी खूप हुशार असणार आहे. त्यांच्या हुशारीवर विश्वास ठेवा. फक्त त्यांच्यासोबत थांबा. त्यांचा प्रवास ते सुखाने करतील. फक्त त्यांच्या सुखाच्या व्याख्या वेगळ्या असतील. तेवढ्या फक्त समजून घ्या. मग ती तुम्हाला नक्कीच  समजून घेतील. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय असतं? एकमेकांना एकमेकांनी समजून घ्यायचं असतं. या समजण्यामुळे जर आपण सुखी होणार असू तर आपल्याला अजून आणखी काय हवं? चला तर मग पालक म्हणून आपली जबाबदारी समजून घेऊयात आणि जमलं तर आपल्या मुलांना जाणून घेऊया. - अमर घाटगे, केंद्र प्रमुख, रत्नागिरी. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

छत्रपतींच्या स्वराज्यातील रामराज्यांच्या पाऊलखुणा!