मुशाफिरी 

नकारात्मकता आणि पेचकेगिरी

   मेहनती, दीर्घोद्योगी, चिवट, काटक, अभ्यासू, गुणवंत, उत्साही असणे ही कुणा जाति-धर्म, पक्ष, प्रांत, राज्य, भाषा विशेषाची मवतेदारी नव्हे! जगाच्या पाठीवर कुठेही या प्रकारचे लोक आढळून येतात. त्याचप्रमाणे निराश, हताश, घुसमटलेले, आपल्याच कोशात गुरफटलेले, आत्मकेंद्री, छिद्रान्वेषी, खांदे पाडून चालणारे, पराभूत मानसिकतेचे व तशीच नकारात्मक मानसिकता आपल्या वागण्या-बोलण्यातून पसरवणारे पेचके लोकही जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळून येतात.

   ‘मूकं करोति वाचालं पंगु लंघयते गिरीं'  असे एक संस्कृत वचन आहे.  निराशेने खचून जाऊ नये. आशावाद, सकारात्मकता कायम ठेवावी, चिकाटीमुळे मुके बोलू शकतील व पांगळे-अपंगही गिरी-पर्वत ओलांडू शकतील अशा चमत्कार वाटण्यासारख्या गोष्टी प्रत्यक्षात उतरु शकतात हा त्याचा मतितार्थ. हे पुराणवचन, केवळ कविकल्पना आहे..रोजच्या जीवनात हे शक्यच नाही अशातला भाग नाही. अरुणिमा सिन्हा या राष्ट्रीय हॉलिबॉल खेळाडू मुलीची धावत्या गाडीत चोरांशी-गुंडांशी झटापट झाली. त्यांनी तिला चालत्या गाडीतून ढकलून दिले. तिचा उजवा पाय त्यावरुन गाडी गेल्याने तुटला. अनेक तास रुळांवर मदतीविना पडून राहलेल्या जखमी अरुणिमाचा चेहरा उंदरांनी कुरतडला, रक्ताळलेल्या पायाला मुंग्या डसल्या. खूप वेळाने तिला मदत मिळाली. तिच्यावर उपचार झाले, त्यानंतर कालांतराने तिने जगातील सर्वोच्च माऊंट एवरेस्ट शिखर सर करुन दाखवले.

   याच लेखमालेच्या आधीच्या लेखात लुई ब्रेल या फ्रेंच संशोधकाची यशोगाथा मांडली होती. नकारात्मकतेला पळवून लावणे, दीर्घ मेहनत, अथक परिश्रम, सकारात्मकता, कोणत्याही स्थितीत हार न मानणे यासाठी काही मानसोपचार तज्ञ लोक सशुल्क वलास घेऊन तुमच्या मानसिकतेत काही बदल घडवून आणतात. तसे काहीही त्या काळी (१८०९ ते १८५२) उपलब्ध नसताना व स्वतः आंधळा असताना लुई ब्रेलने जगभर मान्यता पावलेली, अंध लोकांना शिक्षणाचा उजेड दाखवणारी ब्रेल लिपी शोधून काढली. त्या लेखावर अनेक संवेदनशील वाचक व्यक्त झाले. त्या लेखात नमूद केलेल्या शाळेला ब्रेलर मशिन घेऊन देण्यासाठी काय मदत करता येण्यासारखी आहे, यावर विचारणा झाली. लुईची चिकाटी, त्याचा अभ्यास, त्याने दाखवलेली सकारात्मकता हा त्या लेखाचा गाभा होता. ते सोडून एक वाचक ‘तुम्ही थर्टी फर्स्ट साजरा करणाऱ्यांच्या आनंदाच्या आड का येता,' अशी पृच्छा करत होता. ही झाली निगेटीव्हिटी. असो. या प्रकारचे पेचके लोक अवतीभवती दिसायचेच! असले नमुने बसमध्ये, लोकलमध्ये, बाजारात, चौकात, पारावर जागोजागी भेटतात. त्यांना फार महत्व देण्याची गरज नाही.

   मेहनती, दीर्घोद्योगी, चिवट, काटक, अभ्यासू, गुणवंत, उत्साही असणे ही कुणा जाति-धर्म, पक्ष, प्रांत, राज्य, भाषा विशेषाची मक्तेदारी नव्हे! जगाच्या पाठीवर कुठेही या प्रकारचे लोक आढळून येतात. त्याचप्रमाणे निराश, हताश, घुसमटलेले, आपल्याच कोशात गुरफटलेले, आत्मकेंद्री, छिद्रान्वेषी, खांदे पाडून चालणारे, पराभूत मानसिकतेचे व तशीच नकारात्मक मानसिकता आपल्या वागण्या-बोलण्यातून पसरवणारे लोकही जगाच्या पाठीवर सर्वत्र आढळून येतात. ह्या पेचक्या लोकांचे वैशिष्ट्य हेच की ते कशातही चूक काढणे, कशालाही नावे ठेवणे, कशातूनही निराशेचाच सूर लावणे, याने काय होईल-त्याने काय होईल? असे प्रश्न विचारणे यालाच आपले इतिकर्तव्य समजतात. सचिन तेंडुलकरने शतकांचे शतक केले...तर मग त्याने आमचा काय फायदा? असा त्यांचा प्रश्न असतो.  द्रौपदी मुर्मु या आदिवासी समाजातील महिला भारताच्या राष्ट्रपती झाल्या..त्याने माझ्या जीवनात काय फरक पडेल? असे म्हणायला हे लोक मागेपुढे पहात नाही. या प्रकारचे लोक दिसायलाही टिपिकल असतात असे एक निरीक्षण आहे. कारण ज्या प्रकारचे तुम्ही विचार करता त्याच प्रकारचे तुमचे अस्तित्व, राहणीमान, दिसणे-वागणे बनत जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काळात शिवसेना पक्षाची स्थापना केली होती (१९६६) तो काळ मुंबईतील मराठी माणसासाठी अत्यंत खडतर होता. आपली राजधानी, आपले बहुसंख्यांक असूनही या मुंबापुरीत मराठी माणसांची अवहेलना होत होती. दक्षिण भारतीय मंडळींनी सरकारी नोकऱ्या पटकावल्या होत्या, तर गुजराती लोक व्यापार-धंदे करुन धनाढ्य बनले होते. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार निवास, व्यापार-उद्योग कुणीही कुठे जाऊन करण्यात काही गैर नव्हते. पण यातील काही लोक स्थानिक मराठी माणसाला हिणवत. कमी दर्जाचे लेखत. लोकलमध्ये गरीब मराठी माणूस सिटवर बसला असेल तर त्याला दमबाजी करुन यातील काही लोक उठवीत व तेथे स्वतः बसत अशाही काही घटना घडत होत्या. मुंबईत बऱ्यापैकी कपडे घालणाऱ्या मजबूत मराठी माणसाला ‘पाटील'  व कमजोर दिसणाऱ्या मराठी माणसाला ‘घाटी'  अशी नावे या काही परप्रांतियांनी ठेवली होती. शिवसेनेची स्थापना झाली आणि मराठी माणसाला उगाचच त्रास देणे थांबले. आक्रमक.. प्रसंगी हिंसक, रक्तरंजित आंदोलने करुन सेनेने मराठी माणसांना धीर दिला. ‘अशी संघटना स्थापून काय होईल, मराठी माणसांचा त्यात काय फायदा?'  असले फिजूल प्रश्न विचारणारे पेचके त्याही वेळी होते. एकही आमदार निवडून न येणे ते मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री होणे इथपर्यंत त्यावेळच्या शिवसेनेने मजल मारली. पेचवयांच्या प्रश्नांच्या गुंतावळीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब अडकून पडले नाहीत. पुढे शिवसेनेने मराठीपणा बाजूला ठेवून हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, अनेकजण नियमित मध्यंतरांनतर पक्ष सोडत राहिले. पक्ष कॉर्पोरेट बनत गेला, आता जून २०२२ मध्ये काय झाले ते सारे तुमच्या-आमच्या समोर आहेच! त्यावर राजकीय भाष्य करणे हा काही आपला प्रांत नव्हे.  

   पेचके लोक स्वतः फारसे शिकलेले, ज्ञानी, अनुभवी, चौकस वगैरे नसतानाही आपल्याला सारे काही येते असा आव आणीत शेरे मारण्यात, कुठेही वैचारिक पिंक टाकण्यात वस्ताद असतात. पार तेराव्या शतकातही पेचके लोक या महाराष्ट्रात होते. त्यांनी संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना ‘संन्याश्यांची मुले' म्हणून हिणवले. पण ज्ञानेश्वरांसह त्या भावंडांच्या प्रतिभेची दखल मात्र घेतली नाही. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे लोक होते. त्यांनी छत्रपतींना हस्ते-परहस्ते हैराण करण्याचा प्रयत्न केला. काही पेचके तर थेट अफझलखानाचे वकील म्हणूनही छत्रपतींच्या विरोधात जाऊन खानासोबत झालेल्या महाराजांंच्या भेटीच्या वेळी त्यांनी महाराजांवर तलवारीचा वार केल्याचेही इतिहास सांगतो. इंग्रजांची राजवट भारतात असतानाही हे पेचके लोक स्वकियांना कसे नामोहरम करता येईल याच्या खटाटोपी करण्यात व्यग्र असत. त्यावेळच्या समाजसुधारक, प्रबोधनकार मंडळींना विविध मार्गांनी या पेचवयांनी त्रास दिला. त्यांच्या जीवंतपणीच अंत्ययात्रा काढण्याचे कामही या पेचक्या लोकांनी केले आहे. त्याकाळी सर्वाधिक शिक्षण घेतलेले, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. भिमराव रावजी आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्यायचा प्रयत्न करताच त्यांच्यावर दगडगोट्यांचा मारा करणारे हेच ते बदमाष लोक! बाबासाहेबांना केंद्रीय मंत्रीमंडळात घेतल्यावरही व्यवस्थितपणे काम न करु देण्यात व त्यांची उपेक्षा करण्यात या प्रकारच्या लोकांचाच सहभाग मोठा. अंधश्रध्दा पसरु नये, लोकांचे प्रबोधन व्हावे, जनसामान्यांनी प्रवाहपतित न होता विज्ञानवादी असावे, सुधारणांची कास धरुन स्वतःचा व समाजाचा विकास साधावा, विवेकवादाच्या सहाय्याने समाजहित, देशहित साधावे यासाठी झटणाऱ्या डॅा. नरेंद्र दाभोलकरांचा विचारांनी प्रतिवाद करता येत नाही म्हणून त्यांना गोळ्या घालून मारणारे हेही या पेचके संप्रदायाचेच लोक होत.

   मधल्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झाला. माध्यम जगताने कात टाकली. ‘करलो दुनिया मुठ्ठीमे'  युग अवतरलं. मग हे पेचकेही अद्ययावत झाले. दुसऱ्याला आनंद देण्यापेक्षा त्रास देण्यातच धन्यता मानणारी पेचकी मंडळी समाजमाध्यमांवरही सक्रिय झाली. दुसऱ्यांच्या चांगल्या, विधायक, लोककल्याणकारी, जनहितार्थ असणाऱ्या पोस्ट झळकल्या रे झळकल्या.. की ही पेचकी मंडळी त्यांचे स्वागत, कौतुक करण्याऐवजी कोमात जाऊ लागली. तर काही पेचके त्यातही काही त्रुटी शोधून ट्रोलगिरी करता येते का, पोस्टकर्त्याला नाऊमेद करता येते का याचा मागोवा घेताना दिसू लागली. काहींनी समाजमाध्यमांवरही जातीयवाद, वर्गवाद जोपासायची परंपरा मागील पानावरुन पुढे चालवताना आडनावं बघून एखादा आपल्या जातीचा, धर्माचा आहे का याचा अदमास घेत कौतुक करायचे की टीका..हे ठरवून तसे व्यक्त होऊ लागली किंवा पार सायलेण्ट मोडवरच जाऊन बसू लागली.  पेचकेगिरी ही खलप्रवृत्ती आहे, नकारात्मकता पसरवणारे विषारी रसायन आहे. त्यांना महत्व देता कामा नये; पण पेचके लोक अंगावर येत असतील तर त्यांना शिंगावर घेण्याची तयारीही ठेवली पाहिजे.

माध्यम विश्वातील मंडळींवर अनेक बाजूंनी दबाव असतो. पेचक्यांचाही उपद्रव होत असतो. त्यांनी त्यातुन नाउमेद न होता घटना, घडामोडी, आयोजन, उपक्रम यांचा सर्व बाजूंनी विचार करुनच पत्रकारिता करायला हवी. तशी करणारे अनेकजण आजही आहेत. सर्व माध्यमकर्मींना ६ जानेवारीच्या पत्रकार दिनानिमित्त हार्दीक शुभेच्छा! 

- राजेंद्र घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

थेट मंत्रालयातून