लक्ष नको देऊ...पण का ?

एकदा असेच बस स्थानकावर शेजारच्या बाकावर एक गृहस्थ आपल्या लहान मुलाचे पापे घेत होते ते बाळ  ६ महिन्यांचे असेल पण त्या बाळाच्या वडिलांच्या तोंडात तंबाखू भरली होती. मी बाजूला असल्यामुळे इतका घाण वास येत होता की, मी जागा बदलली. कारण ते अधूनमधून थुंकतपण होते. ते त्यांचं वागणं किळसवाणे वाटत होते. पण माझे पती बोलले लक्ष नको देऊ, आपण इथून उठून जाऊ. मग विचार करा..ते बाळ कसे सहन करत असेल आपल्या बाबाचे वागणे? सार्वजनिक आरोग्य बिघडवणाऱ्या  अशा कितीजणांकडे आपण लक्ष द्यायचे नाही?

 समाजात एक गोड समज झाला आहे आपल्याला कोणाची मते किंवा वागणे, बोलणे पटले नाही तर आपण ठरवतो की त्या व्यक्तीकडे किंवा बोलण्याकडे किंवा विचित्र वागणुकीकडे लक्ष द्यायचे नाही. पण असे घडतेच असे नाही.

  आपला समाज कधी सुधारणार हा एक मोठा प्रश्न आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती होत असली तरी त्याचं वेगाने आपली अधोगती होत आहे आणि ती आपण उघड्या डोळ्याने हसतमुखाने बघतोय आणि म्हणतो त्यात काय विशेष लक्ष देण्यासारखे आहे. हो! जेव्हा सोळा सतरा वर्षाखालील लहान मुलांच्या हाती सिगरेट आणि तंबाखू, गुटख्याची पुडी बघितली जाते तेव्हा मात्र तळपायाची आग मस्तकात जाते, पण परत काहीच करू शकत नाही. आता म्हटले जाते की हा ज्याचा त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे; पण तसे खरच नाही. कारण हा प्रश्न आपल्या सर्वांचा समजाचा आणि आपल्या देशाचा आहे.  

     सिनेमा बघण्यासाठी जेव्हा सिनेमा घरात जातो तेव्हा पहिली जी जाहिरात येते ती सर्वांना माहीत असेल, अहो! ती तर सर्वांची पाठ पण झाली असेल. कोणती ती आठवते का ? सुनीता....हो! सुनीता गुटखा, तंबाखूवाली सुनीता जिला याची सवय असते त्यामुळे तिला तोंडाचा कर्करोग झाला असतो. ती आठवली ना सर्वांना. आता आपण परत विचार करू की त्यात काय विशेष आहे याकडे काय लक्ष वेधून घेण्यासारखे आहे काहीच नाही. पण याकडे तर खरं लक्ष देण्यासारखे आहे.

कारण या गोष्टीकडे लक्ष नाही दिले, तर ते रोग-आजार आपल्याला पण होऊ शकतात, हे कसे कोणाच्या लक्षात येत नाही? ही मोठी एक खंत आहे. सुक्यासोबत ओले पण जळते, हे तर माहीत आहे ना ? तसेच या बाबतीतपण होते. आपला गैरसमज आहे की, मी जर सिगरेट ओढत नाही तर मला काय त्रास होणार? मुळात तसे नसते. जो आगीशी खेळत असतो त्याला कधीच पोळत नसते तर त्याची झळ बाजूला उभे असल्याला लागत असते. त्या सिगरेटच्या वासाने, धुराने बाजूच्या किंवा येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला, लहान मुलांना सर्वांना कळत नकळत त्रास होत असतो. सिगरेटचा धूर हे एक विष आहे, जो व्यक्ती ओढत आहे त्याला कमी त्रास; पण बाकीच्यांना जास्तीत जास्त त्रास होत असतो.

श्वसनाचे विकार होतात जसे की फुफुसाचे आजार, कर्करोग, क्षयरोग, दम्याचे आजार होतात. जेव्हा डॉक्टर सांगतात की यांना फुफुसाचा आजार झालेला आहे, तेव्हा आपण विचार करतो की मी कधीही सिगरेट ओढली नाही, की तंबाखू खाल्ली नाही, की साधी सुपारी खाल्ली नाही पण मग मलाच का?  तेव्हा विचार केला तर या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळते की, आपला आजूबाजूचा परिसर त्या परिसरात राहणारे लोक किंवा आपले मित्र मैत्रिणी त्यापैकी कोण सतत सिगरेट ओढत नव्हते ना ? तंबाखू खात नव्हते ना ? कळत नकळत श्वसनावाटे ते आपल्या शरीरात जातात आणि एकेक अवयव निकामी करण्यास सुरुवात करतात आणि जेव्हा आपल्याला समजते तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
आपले शरीर अशक्त असते, तेव्हा असले आजार पटकन पकडतात. उदाहरणार्थ - क्षयरोग. हा क्षयरोग दिसतो तितका साधा नाही सरकारने यासाठी आता भरपूर धोरणे अवलंबली आहेत. क्षयरोग मुक्त गाव शहर करण्यास सुरुवात केली आहे; पण तरीही क्षय रोगाचे रुग्ण मिळतच आहेत. भलेही आपण स्वच्छ परिसरात, उच्चभ्रू सोसायटीत राहात असो, तरीपण कोणीही क्षयरोगाची शिकार होऊ शकतो.

एक उदाहरण द्यायचे झाले तर, एक ट्रक ड्रायव्हर ट्रक चालवत असताना भरधाव वेगाने पुढे जाताना थुंकतो आणि ती थुंकी रस्त्यावर, तसेच रस्त्यावरच्या चालणाऱ्या लोकांच्या अंगावर उडते आणि नकळत थुंकीतले जंतू श्वसनावाटे पोटात, फुफुसात जातात आणि त्यावेळी एखादी व्यक्ती अशक्त असेल तर ती खूप भयानक त्रासात अडकते. जर त्या ट्रक ड्रायव्हरला कोणता आजार असेल, क्षयरोग असेल तर कोणी दुसरी व्यक्तीसुध्दा एका थुंकीमुळे बाधित होते आणि तिलादेखील क्षयरोग होतो. आता नक्कीच त्यावेळी त्या व्यक्तीने तंबाखू कधी खाल्लेली नसते किंवा सिगरेट ओढलेली नसते; पण ती ह्या कचाट्यात अडकते.

मुंबईसारख्या शहरात प्रवास करणे म्हणजे एक मोठी कसरत असते. गर्दीमध्ये जाता येता अनेक प्रकारचे लोक असतात, आपल्याला काय झालं? कोणता आजार झालाय? हे नक्कीच कोणी पाटी लावून फिरत नसते. मग अशावेळी सायलेंट किलर म्हणून काम करते ते हे तुमचे सिगरेट, तंबाखू.

सिगरेट, तंबाखू यांच्या पाकीटावर लिहिलेले देखील असते आरोग्यास अपायकारक. तरीपण दोन वेळचे खायला मिळत नसले, तरी या दोन गोष्टी लोकांना आवश्यक असतात आणि नको ते आजार ओढवून घेतात. उच्चभ्रू लोकांच्या पार्टीमध्ये म्हणे सिगरेट आणि मद्य पेय आवश्यक असते. नाही घेतले तर आपण मोठ्या सोसायटीत राहतो असे वाटत नाही. अरे पण या गोष्टीशिवायदेखील पाटर्या होऊ शकतात, समारंभ होऊ शकतात. एखाद्याला यासाठी जबरदस्ती करणे हे गरजेचे नसते. नंतर मोठ-मोठी अभियाने करणे, तंबाखू मुक्ती, सिगरेट मुक्ती कशासाठी ? प्रत्येकाने स्वतःमध्येच बदल आणला पाहिजे. आपल्याला एखादा त्रास होत असेल तर पुढील व्यक्तीला सांगितलं पाहिजे की रस्त्यात असे कुठेही थुंकू नको, कुठेही उघड्यावर सिगरेट ओढू नको. त्याचा आम्हाला सामान्य जनतेला निष्पाप मुलांना त्रास होतो. असे जर आपण केले, तर लक्ष नको देऊ, असे बोलण्याची वेळ येणार नाही आणि आपल्या भारत देश किंबहुना महाराष्ट्र तरी क्षयमुक्त होण्यास मदत होईल. कोणीही भर रस्त्यात थुंकले तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे. किंबहुना झालीच पाहिजे. आपल्यासारख्या प्रौढ माणसाला जर त्या तंबाखु किंवा सिगरेटच्या वासाचा त्रास होतो, तर निष्पाप लहान मुलांना किती त्रास होत असेल ? एकदा असेच बस स्थानकावर शेजारच्या बाकावर एक गृहस्थ आपल्या लहान मुलाचे पापी घेत होते ते बाळ माझ्या मते ६ महिन्याचे असेल पण त्या बाळाच्या वडिलांनी तोंडात तंबाखू भरली होती. मी बाजूला असल्यामुळे इतका घाण वास येत होता की, मी जागा बदलली. कारण ते अधून मधून थुंकतपण होते. ते त्यांचं वागणं किळसवाणे वाटत होते. पण माझे पती बोलले लक्ष नको देऊ, आपण इथून उठून जाऊ. मग विचार करा..ते बाळ कसे सहन करत असेल आपल्या बाबाचे वागणे? त्यात त्या बाळाला धड बोलता पण येत नसल्यामुळे त्याचापण नाईलाज.

प्रत्येकाने आपल्या वाईट किंवा त्यांना वाटत असतील की ही सवय चांगली नाही. ती बदलण्याचा प्रयत्न करावा. जर बदलता येत नसेल तर तिथे कोणी इतर व्यक्तीला उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आपल्या शरीरात तो धूर किंवा तंबाखूचे विषारी कण मनसोक्त घ्यावेत, म्हणजे कोणालाही एकमेकांना लक्ष देऊ नको ही बोलण्याची वेळ येणार नाही. - सौ. निवेदिता सचिन नेवसे बनकर. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

फेब्रुवारी महिन्यातील डे....आणि आजची युवा पिढी