प्राचार्य बी ए पाटीलः प्राचार्यपदाचा एक मानदंड

वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज (मॉडर्न कॉलेज) चे माजी प्राचार्य बी ए पाटील सरांचे दिनांक २३ जानेवारी रोजी पहाटे पाच वाजता अल्पशः आजारांमुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे नवी मुंबई परिसरातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात आणि विशेषतः विद्यार्थी वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. २००६ मध्ये त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रकृतीस्वास्थ्य ठीक नसतानाही उपस्थित राहिलेले माजी खासदार प्रा. डॉ एन डी पाटीलसर म्हणाले, ‘मी आज बीए पाटील यांच्या निवृत्ती कार्यक्रमास आलो नसतो तर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असती.' हे एक वावयच प्रा. बी.ए.पाटील यांचे वेगळेपण सिध्द करण्यास पुरेशी आहे.

बी ए पाटील सरांचा जन्म सांगली जिल्ह्यातील नागराळे या लहानशा गावात झाला. क्रांतिसिंह नाना पाटील, भाई जी डी लाड अशा लढवय्या कार्यकर्त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचे आधारवड आणि संस्थेचे माजी चेअरमन प्रा डॉ एन डी पाटील यांच्या पुरोगामी विचारांचे ते खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचे शालेय शिक्षण वाळवा येथे झाल्यानंतर सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातून ‘कमवा आणि शिका' या योजनेतून पदवी शिक्षण घेतले. पुढे शिवाजी विद्यापीठातून पदार्थ विज्ञान विषय घ्ऊ न पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.कर्मवीरांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान आणि पुरोगामी विचार यांची मांड महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्या मनामध्ये पक्की झाली होती. कांही वर्षे कोरेगाव येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये हे महाविद्यालय जोडले गेले. त्यानंतर त्यांचे कर्तृत्व नवनव्या उन्मेषांनी फुलत गेले. श्रीरामपूर येथे बदली झाल्यानंतर प्राध्यापक संघटनेचे झुंजार नेते म्हणून त्यांनी आपली ओळख पुणे विद्यापीठ परिसरात निर्माण केली. पदार्थ विज्ञानाचे निष्णात प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थीप्रिय झाले.

१९९४ साली त्यांची हुपरी जि.कोल्हापूर येथील महाविद्यालयात प्राचार्य म्हणून संस्थेने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. ही एक संधी आणि आव्हानही होते. एका वर्षातच हे कॉलेज सुस्थितीत आणण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून संस्थेने पुढील वर्षी कोकणातील राजापूर येथे नव्याने सुरू झालेल्या कॉलेजचे प्राचार्य म्हणून त्यांच्यावर दुसरी मोठी जबाबदारी सोपवली.  हे महाविद्यालय विनाअनुदानित तत्त्वावर असल्याने प्राचार्य बी ए पाटील यांना हे कॉलेज शून्यातून उभे करण्याचे मोठे आव्हान होते. स्वतःच्या, प्राध्यापकांच्या गरजेपुरत्या पगारापासून ते दैनंदिन प्रत्येक खर्चासाठी ्देणग्या मिळवणे हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर होता. राजापुरात सुरुवातीला एक दोन मोकळ्या इमारती मिळवून महाविद्यालय सुरू केले. परिसरातील सर्वसामान्यांपासून ते मुंबईतील देणगीदारांपर्यंत आवाहन करून त्यांनी देणग्या मिळवल्या. विशेष म्हणजे पाटील सरांच्या शैक्षणिक कामाबद्दलची तळमळ आणि तडफ पाहून  तेथील एक अद्‌भुत व्यक्तिमत्व श्री रमेश मराठे यांनी कोणतीही अट आणि अपेक्षा न ठेवता महाविद्यालयाला ३५ एकर जमीन दान दिली. आधीच कामसू असणाऱ्या पाटील सरांना आता काम करण्यासाठी २४ तास अपुरे वाटू लागले. या जागेत विहीर खणून, ठिबक सिंचनाद्वारे नारळ, हापूस आंब्याची बाग फुलवली. महाविद्यालयाची भव्य अशी इमारतही बांधून तयार झाली. या कामासाठी त्यांनी आपले सर्वस्व इथे अर्पण केले.
या अद्वितीय कामाचे फळ म्हणून वाशी येथील त्यावेळच्या  एका सुस्थितीतील आधुनिक शहरातील मॉडर्न कॉलेजमध्ये  २००१ मध्ये त्यांची प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.करण्यात आली. इथेही कामाचा सपाटा लावला. त्यांनी आपल्या प्रशासन कौशल्यामुळे अल्पावधीतच महाविद्यालयाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. प्रशासकीय इमारतीचा दुसरा मजला, ग्रंथालयाची स्वतंत्र इमारत, अद्ययावत आय टी लॅब, मुलींचे वसतिगृह इत्यादींची उभारणी झाली. याचबरोबर नव्या युगाला साजेसे अनेक अभ्यासक्रम सुरू केले. महत्त्वाचे म्हणजे कर्मवीरांच्या विचारांची रुजवण आणि प्रसार नवी मुंबईत व्हावा या उद्देशाने कर्मवीर भाऊराव यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा महाविद्यालयाच्या परिसरात उभारला. या पुतळ्याचे अनावरण प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले. हाती असलेल्या केवळ पाच वर्षांत त्यांनी अविश्रांत परिश्रम करून महाविद्यालय सर्वांगाने प्रगती पथावर आणले.

कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठाव घेता येणं हाच पाटील सरांच्या संघटनकौशल्याचा एक दुर्मिळ पैलू होता. मी आपल्या सहकाऱ्यांपेक्षा कोणी वेगळा आहे असे त्यांनी कधीच कधीच मानले नाही. त्यामुळेच त्यांच्या अवती भवती कार्यकर्ते सदा सर्वकाळ असायचे. त्यांचं नेहमीचं बोलणं आणि सभेतलं वक्तृत्व दोन्हीही तेवढेच मुग्ध करणारे असायचं. महाविद्यालयाचे प्रशासन एवढेच पठडीतले काम नसून त्यापलीकडे अनेक सामाजिक घटना, घडामोडी यांचं भान असणाऱ्या आणि त्यासाठी प्रत्यक्षात काही योगदान देणाऱ्या पाटील सरांचं वेगळेपण हे समाजमनावर कायमचं ठसलं आहे. आपल्या मय्राादित भावविश्वाबाहेर जाऊन विद्यार्थ्यांना भवतालच्या विशाल समाजाशी जोडणारे प्रकल्प हाती घेऊन सामाजिक बांधिलकीचे संस्कार विद्यार्थ्यांवर करण्यावर त्यांचा भर होता. अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता अशा विषयांवर व्याख्यानसत्रे,सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त दिवसभर युवती मेळावा, नाट्य संमेलन, विद्रोही संमेलन, विचारवेध संमेलन इत्यादींचे महाविद्यालयात आयोजन करण्यामागे विद्यार्थ्यांना नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न होता. म्हणूनच उपक्रमशील, क्रियाशील विद्यार्थ्यांनी उपकृत भावनेनं सरांनी एक नातं अखेरपर्यंत जपलं होतं.

दुष्काळातील चारा छावण्यांसाठी आर्थिक साहाय्य केले. किल्लारी भूकंपग्रस्तंच्या सात मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्सुनामी आपत्तीत महाविद्यालयाने माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपद्‌ग्रस्तांसाठी ७५ हजार रुपयांचा निधी संकलन करून संबंधितांकडे सुपूर्द केला. एवढेच नव्हे, तर नेरूळ येथील आमराईनगर ही कचरा वेचणाऱ्या महिलांची वस्ती जणू दत्तक घेऊन त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य केले. या अभिनव उपक्रमाने महाविद्यालय समाजातील सर्वात उपेक्षित वर्गांपर्यंत पोहोचले.

राजापूर येथील पाच वर्षांच्या कालावधीत सरांचे आपल्या कुटुंबाकडे खूप दुर्लक्ष झाले. विनाअनुदानित असल्याने आर्थिक ओढाताणही सुरू होती. तिन्ही मुलांचे शिक्षण सुरू होते. त्यामुळे सातारजवळ कोरेगाव येथे कुटुंब राहत होते. या काळात सातारा येथे संस्थेच्या मुख्य कार्यालयात मीटिंगच्या निमित्ताने येणे व्हायचे त्याचवेळी कोरेगावला ते जायचे. आर्थिक चणचणीमुळे कुटुंबात ताणतणाव निर्माण व्हायचा. त्यांच्या पत्नी कुसूम वहिनींनी या कठीण काळात अत्यंत समजुतीने आणि संयमाने संसार चालवला. आपल्या पतीच्या एका यज्ञवत कार्याला साथ देत मुलांच्या शिक्षणासाठी कशीबशी तोंडमिळवणी करीत होत्या. पुढे काही वर्षांनी वाशीला बदली झाल्यानंतर एक वर्षभरात त्यांचा कर्तासवरता तरुण मुलगा एका दुर्दैवी अपघातात गेला. सर विधी उरकून चारपाच दिवसात परत आले आणि कामात गुंतवून घेतले. दुःखाला कवटाळत रडत बसण्यापेक्षा कामावर येवून दुःख विसरण्याचा हा विवेक विचार आम्हा सर्वांना थक्क करुन गेला.

२००६ मध्ये ते निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रकृतीस्वास्थ्य ठीक नसतानाही उपस्थित राहिलेले प्रा. डॉ एन डी पाटीलसर म्हणाले, ‘मी आज बीए पाटील यांच्या निवृत्ती कार्यक्रमास आलो नसतो तर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असती.'

आपल्या निःस्पृह, ध्येयनिष्ठ, समर्पणशील, बहुआयामी, उत्तुंग अशा कर्तृत्ववान पाटीलसरांनी आपलं महाविद्यालय, शैक्षणिक क्षेत्र, आणि त्याबाहेरील सामाजिक अवकाश यावर त्यांनी आपली जी मोहोर उमटवली आहे ती आपणास सर्वांना विशेषतः आजच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.  -डॉ अजित मगदूम 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

तीही तुमच्या आमच्यासारखी माणसेच की!