वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाचे काम २० ऑक्टोबर पर्यत पूर्ण करण्याचे निर्देश

डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे - आयुक्त बांगर

ठाणे : पावसाळा अजून संपलेला नसल्याने अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने अशा ठिकाणांमधून डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. सद्यस्थितीत पाऊस सुरु आहे, पाऊस थांबल्यानंतर देखील पुढचे १५ दिवस महत्वाचे असून संपूर्ण ऑक्टोबर पर्यत आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील या दृष्टीने सर्व आरोग्य अधिकाऱ्यांनी सतर्क रहाण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्युची रुग्णसंख्या वाढली असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या आरोग्य केंद्रातील आकडेवारी आणि खाजगी लॅबमध्ये झालेल्या चाचण्या यामध्ये पारदर्शकता असणे आवश्यक आहे. खाजगी लॅबमध्ये एखादा रुग्ण डेंग्यू बाधित रुग्ण आढळल्यास आल्यास त्याची दैनंदिन माहिती महापालिकेला कळविली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत त्या त्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारीी यांनी शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्स तसेच लॅब यांनी त्यांच्याकडे डेंग्यू, मलेरिया सदृश्य आजाराचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्वरित त्याची माहिती त्याच दिवशी स्थानिक वैद्यकीय अधिकारी आणि मुख्यालय आरोग्य अधिकारी यांना कळविली जाईल या दृष्टीने त्यांना सजग करावे, असेही आयुक्त बांगर यांनी ३ ऑवटोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे झालेल्या बैठकीत नमूद केले.

आरोग्य विभागाकडे दैनंदिन अहवाल प्राप्त झाल्यावर जर रुग्ण्संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीची उपाययोजना आखून त्यानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे. तरच आपण रुग्णसंख्येवर नियंत्रण आणू शकतो याकडे सर्व स्तरावर कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्त बांगर यांनी केल्या. यासाठी चाचण्यांची दैनंदिन संख्या देखील वाढविण्यात यावी. तसेच ज्या विभागातून रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण दिसून येत आहे, त्या ठिकाणी आवश्यक औषध आणि धूरफवारणी देखील करण्यात यावी, तरच आपल्याला या आजारांवर नियंत्रण आणणे शक्य होईल, असेही आयुवत म्हणाले.

दरम्यान, सदर बैठकीप्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राकेश बारोट, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुध्द माळगांवकर, डॉ. योगेश शर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. चेतना के., माता बाल संगोपन अधिकारी डॉ. राणी शिंदे, आदि उपस्थित होते.

आजवरचा डेंग्यू रुग्णसंख्येबाबतचा जो अहवाल प्राप्त झाला आहे, त्यानुसार सी.आर.वाडिया दवाखाना येथे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विभागातील रुग्णवाढीची कारणे काय आहेत, या ठिकाणी रुग्णांची वाढत आहे, त्या अर्थी डासांची व्युत्पत्ती स्थाने असू शकतात. त्यामुळे डासाची उत्पत्ती स्थाने शोधून या ठिकाणी धूर आणि औषध फवारणी करुन ती नष्ट करण्यात यावी यासाठी फायलेरिया विभागाचा सहभाग महत्वाचा असून त्यांच्यामार्फत प्रभावीपणे कार्यवाही करण्यात यावी. फायलेरिया विभागाने केलेल्या कार्यवाहीची विभागवार माहिती देखील घेण्यात यावी. जेणेकरुन कोणकोणत्या विभागात फवारणी करण्यात आली आहे आणि कोठे करावयाची आहे याची तपशीलवार माहिती उपलब्ध होईल. उथळसर, बाळकुम, आयुर्वेदिक दवाखाना आणि कळवा विभागातील आतकोनेश्वर नगर येथे रुग्णांची संख्या वाढल्याचे प्रमाण दिसून येत आहे. या विभागात देखील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नियोजन करुन कार्यवाही करावी. तसेच आतकोनेश्वर नगर येथे साथ सर्वेक्षण अधिक परिणामकारित्या करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सतत ८ ते १० दिवस पाऊस झाला आणि  त्यानंतरचे आठ दिवस रुग्णवाढीचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही या दृष्टीने आपण दक्ष राहणे आवश्यक आहे, अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

नागरी आरोग्य केंद्रनिहाय पथक...
शहरातील काही ठिकाणी मलेरिया, डेंग्युची रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. यासाठी त्या त्या विभागातील नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करणे गरजेचे आहे. यामध्ये डासाची व्युत्पत्ती स्थाने शोधून त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पथके तयार करण्यात यावीत. या पथकाच्या माध्यमातून दैनंदिन करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल देखील प्राप्त करुन घ्यावा. तसेच फायलेरिया विभागामार्फत देखील अहवाल घ्यावा. जेणेकरुन आपल्याला रुग्णसंख्येत वाढ अथवा घट होत आहे ते समजण्यास मदत होईल. जर फायलेरिया विभाग प्रतिसाद देत नसतील तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधितांना त्याबाबत अवगत करणे गरजेचे आहे.

बांधकामांच्या ठिकाणी फवारणी...
महापालिका कार्यक्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत, त्या ठिकाणी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे स्लॅबसाठी वापरण्यात येणारे पाणी बरेच दिवस राहत असल्यामुळे या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन संबंधितांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे की नाही याची माहिती घ्यावी. तसेच त्या ठिकाणी फायलेरिया विभागाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना, प्रतिबंधात्मक औषध आणि धूरफवारणी करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

समन्वयाने काम करावे...
महापालिका क्षेत्रातील नागरी आरोग्य केंद्र, मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय यांनी समन्वयाने काम करावयाचे आहे. सर्व नागरी आरोग्य केंद्रातील दैनंदिन अहवाल तसेच खाजगी रुगणालयातील रुग्णसंख्या यांची माहिती संकलित करुन या आजारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत असतानाच कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. तसेच रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना वरिष्ठ डॉक्टरांनी प्रत्यक्ष भेट देण्याबाबतच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या.

रुग्णालयातील नर्सेसना व्हेंटिलेटर संदर्भात प्रशिक्षण...
आयसीयू मध्ये कार्यरत असलेल्या नर्सेसना बेसिक लाईफ सपोर्ट आणि व्हेंटिलेटर हाताळणीबाबतचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाणे अत्यंत आवश्यक असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही त्वरित करण्यात यावी. तसेच येत्या ३ महिन्यांमध्ये रुग्णालयातील सर्वच नर्सेसना दोन प्रशिक्षणे दिली जातील, ते सुनिश्चित करण्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

वैद्यकीय महाविद्यालय वसतीगृहाचे काम २० ऑक्टोबर पर्यत पूर्ण करावे...
राजीव गांधी वैद्यकीय  महाविद्यालयाच्या वसतीगृहाच्या नुतनीकरणाच्या कामाची पाहणी देखील यावेळी आयुक्त बांगर यांनी केली. २० ऑक्टोबर पर्यत वसतीगृहाचे संपूर्ण काम पूर्ण होईल या दृष्टीने युध्दपातळीवर काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना यावेळी दिले. यावेळी वसतीगृहातील सर्व खोल्यांची पाहणी करुन कामाचा आढावा घेण्यात आला. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अमृत कलश यात्रा'मधील संकलित माती जवानांकडे सुपूर्द