चतुरस्त्र कलावंत... अशोक पालवे

इयत्ता सहावीत शिकत असताना नाटकासाठी झालेली निवड आणि त्यानंतर नाट्यक्षेत्रात झालेला प्रवेश अन्‌ आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध मालिका, एकांकिका यामध्ये लेखक, दिग्दर्शक आणि अभिनयात स्वतःला सिध्द करुन नवी मुंबईची नाममुद्रा नाट्यक्षेत्रात उमटविलेले व चतुरस्त्र प्रतिभा असणारे कलावंत अर्थात वाशीतील अशोक लक्ष्मण पालवे यांच्याशी ‘आपलं नवे शहर’चे उप संपादक राजेंद्र घरत यांनी सांधलेला संवाद...

वाशीमध्ये वास्तव्यास आल्यानंतर स्वतःला ‘वाशीचे आदिवासी’ असे संबोधणारे अशोक पालवे सन १९७८ पासून नवी मुंबईच्या लोकजीवन आणि समाज जीवनाशी एकरुप झालेले असून त्यांनी येेथील आगरी बोली भाषा चांगलीच आत्मसात केलेली आहे. अशोक पालवे यांना राज्य शासनाची नऊ प्रमाणपत्रं आणि चार पदके मिळाली आहेत. प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता कलाकार असतोच. त्यामुळे आयुष्यात किमान एक तरी कला प्रत्येकाने जोपासली पाहिजे. त्यातून आपोआप प्रगती देखील साधता येईल, असा सल्ला देखील अशोक पालव यांनी या संवादातून दिला.

अहमदनगर ते वाशी आणि तेथून नाट्य क्षेत्रार्पयंतचा प्रवास याबद्दल काय सांगाल? 
माझा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी मधील कोल्हार गांवचा आहे. तेथे ४थी र्पयंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमचे कुटुंब सन १९७८ मध्ये वाशीला वास्तव्यास आले. त्याचवेळी नवी मुंबईत मावेÀट स्थलांतरीत झाले होते. वाशीला आल्यावर मी नवी मुंबई हायस्कुल येथे प्रवेश घतला. त्यावेळी आमच्या संस्थेचा वार्षिक महोत्सव षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा होत असे. इयत्ता सहावी-सातवीत असताना तत्कालीन शिक्षक सुभाष लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शाळेने वार्षिक महोत्सवात भाग घण्याचे ठरवल्यावर बसवलेल्या नाटकात काम करण्यासाठी शिक्षक, आम्ही काही मुले आणि ८-१० मुलींची निवड करण्यात आली. टारगट प्रकारातील आम्हा मुलांचा नाटकाशी काहीही संबंध नसतानाही आमची नाटकात काम करण्यासाठी का निवड झाली होती. नाटकासाठी निवड झालेल्या मुली दिसायला सुंदर असल्याने आम्ही मुलेही त्यांच्यासोबत सराव करु लागलो. त्यावेळी शाळा सुटल्यानंतर बहुतांश मुले नाक्यावर दिसायची. पण, आम्ही नाटकाच्या सरावासाठी शाळेत थांबायचो. षण्मुखानंद हॉल  येथे सादर झालेल्या नाटकाने रंगभूमीवर उभे राहण्याची हिंमत दिली व हे क्षेत्र मग आवडू लागले. 

राज्यस्तरीय नाटकार्पयंतचा प्रवास कसा? भावलेला पुरस्कार?
त्यावेळी शाळेमध्ये मर्यादित नाटके होत असत. त्या काळात नवी मुंबईमध्ये नवी मुंबई म्युझिक ॲन्ड ड्रामा सर्कल. या संस्थेमार्पÀत संगीत-नाटकाचे कार्यक्रम व्हायचे. या संस्थेची माझा संबंध अल्यावर तिच्या माध्यमातून आम्ही काम करताना खूप एकांकिका केल्या. मुंबईत मिळेल त्या जागी नाटके केली. यावेळी माझ्या सवंगड्यांना नाटकातील कामाबद्दल बक्षीस मिळाली. पण, ८-१० वर्ष मला एकही बक्षीस मिळाले नव्हते. मागून आलेल्यांना बक्षीस अन्‌ मला बक्षीस सोडाच; पण साधे प्रमाणपत्रही मिळाले नव्हते. त्यावेळी मनाला थोडे  वाईट वाटे आणि आता मात्र बक्षीसांचा ओघ सुरुच आहे.. नवी मुंबई म्युझिक ॲन्ड ड्रामा सर्कलच्या माध्यमातून आम्ही कै. विवेक भगत यांनी लेखन केलेल्या सल या नाटकाचे दिग्दर्शन मी केले होते. त्यावेळी मला दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. या नाटकात आमचा कस लागला होता. अडीच तास फक्त तीनच पात्र रंगमंचावर होते. हे नाटक हिंदी भाषेतही आले. या नाटकात मी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. त्यामुळे या नाटकासाठी मिळालेले बक्षीस मला खूप भावले. 

पार्टनर नाटकातील तुमची श्रीची भूमिका व याबद्दल तुमचा कुणाकडून गौरव झाला त्याबाबत जरा सांगा..
पार्टनर या नाटकाने मला जगायला शिकवले. त्यातील शादी होनेसे माँ बिछडती है और बच्चा होने बिवी... हे डायलॉग मला मोठे तत्वज्ञान सांगून गेले. दुसरीकडे नवी मुंबई विभागातून फथ्वी थिएटरसाठी नाटक करणारी आमची टीम एकमेव होती. फथ्वी थिएटरची शिस्त खूपच कडक होती. सायंकाळी ६ वाजता थिएटरचे दरवाजे बंद झाल्यावर तिथे प्रेक्षकांना कुणालाच प्रवेश दिला जात नसे. त्यावेळी ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यासारखे व्यक्तिमत्व देखील वेळेवर नाटक पाहण्यासाठी येत असत. आमचा तेथील प्रयोग संपल्यानंतर दस्तुरखुद्द शशी कपूर यांनी येऊन माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली ही माझ्यासाठी मर्मबंधातली ठेव आहे. ठाण्याच्या  गडकरी रंगायतन येथे गगनभेदीच्या प्रयोगानंतर आमच्या नाटकाचा प्रयोग होता. त्यासाठी आम्ही लवकरच तेथे गेलो होतो. यावेळी तेथे असणारे ज्येष्ठ साहित्यिक व.पु.काळे यांनी  ज्येष्ठ अभिनेते यशवंत दत्त यांना माझी ओळख करुन देताना हा माझा हिंदी स्टेजवरील श्री असल्याचे सांगितले होते. तो प्रसंग ह्रुदयात कोरला गेला आहे. 

प्रत्येक कलाकाराची मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छा असतेच..तुमची त्याबाबत भूमिका काय?
नाट्यक्षेत्रामध्ये सर्वप्रथम एकांकिका, त्यानंतर नाटक, मग सिरीयल आणि अंतिमतः फिल्म अशी चढती कमान असते. मला या सर्व क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने मी यात स्वतःला भाग्यवान समजतो. मी नकुशी मालिकेत काम केले आहे. या मालिकेचे ४९ प्रयोग मी केले. इयर डाऊन मध्येही मी भूमिका साकारली आहे. तर आंबेडकर मालिकेत मला नकारात्मक भूमिका करायला मिळाली. त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबाबत अपमानास्पद संवाद मला बोलवेनासे झाले होते. पण तो त्या कथानकाचा भाग असल्याचे दिग्दर्शकांनी मला समजावल्यानंतर मग मी ती भूमिका वठवली.

तुम्हाला लाभलेले राज्यस्तरीय पुरस्कार व नवी मुंबईतील कलावंतांबद्दलही सांगा..
मी नाट्य क्षेत्रात आल्यानंतर सुरुवातीला ७-८ वषे बक्षीस मिळाले नाही. त्यावेळी आम्ही सहभागी होत असलेल्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांमध्ये नामांकित संस्था सहभाग घ्यायच्या. त्यांच्या तुलनेत आणि अनुभवात आम्ही नवी मुंबईकर खूपच मागे असायचो. यानंतर याच नाट्य संस्थाच्या सादरीकरणातील बारकावे बघून आम्हाला प्रेरणा मिळायची आणि आम्ही परिपक्व होत गेलो. अखेर ठराविक काळ लोटल्यानंतर नवी मुंबईला देखील बक्षीस मिळू लागली.मला राज्य शासनाकडून नाट्य स्पर्धांमधील मुख्य भूमिका आणि दिग्दर्शनासाठी विविध ९ प्रमाणपत्र आणि ४ पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आणि आता बक्षीसांचा ओघ सुरु राहिला आहे. 

तुम्ही सुरु केलेल्या ॲक्टर्स फॅक्टरी संस्थेबद्दल?
मी आणि समीत बाडकर मुंबईत एका ऑफीस मध्ये कामाला होतो. बाडकर एडीटींगचे काम करायचे तर मी दिवसाला ५०-६० जणांचे ऑडिशन घ्यायचो. यावेळी ऑडिशन नवी मुंबईतील कोणी आले तर आधी ऑडिशन काय प्रकार असतो तेच माहित नसायचे. नवी मुंबईतील मुलांची पूर्वतयारी शून्य होती, त्यांना मूलभूत शिक्षणच नव्हते. त्यावेळी मनात विचार केला आणि पदरमोड करुन आम्ही दोघांनी ॲक्टर्स फॅक्टरी नावाची संस्था नवी मुंबईत स्थापन केली. त्यात संपूर्ण शिक्षण, एडीटींग, ॲक्टींग, दिग्दर्शन शिकवत होतो. पण, दुर्दैवाने समीत बाडकर यांचे निधन झाल्याने तीन वर्षानी संस्थेचे काम थांबले. पण, नवी मुंबईत एक मोठी ॲकॅडमी सुरु करण्याचा आजही मानस आहे. त्यामाध्यमातून येथील होतकरु तरुण-तरुणींना नाटक क्षेत्राचे बेसिक शिक्षण मिळेल, असा विश्वास वाटतो. 

नवी मुंबईत कलावंतांना योग्य व्यासपीठ आहे का?
वास्तविक पाहता अजुनही नवी मुंबईतून नामांकित कलाकार घडलेला नाही, याचे या क्षेत्रात असल्याने खूपच वाईट वाटते. सादरीकरण कला क्षेत्रासाठी नाटक एक पायाअसतो. जो कलाकार नाटकातून घडतो, तो पुढे चांगली वाटचाल करु शकतो. पण, नवी मुंबईत कलाकारांना नाटक सादर करण्यासाठी, नाटकाची तालीम करण्यासाठी मोजकेच थिएटर आहेत. विष्णुदास भावे नाट्यगÀह उपलब्ध होत नाही. वाशी पोलीस स्टेशनच्या बाजुला असलेल्या सिडकोच्या सांस्कृतिक केंद्राच्या वास्तुचा पुनर्विकास तसाच अधांतरी आहे. त्यामुळे जागेसाठी आम्ही प्रशासन, राज्यकर्ते,  एनजीओ यांच्याशी खूप झगडलो. पण, आमचे प्रयत्न असफल ठरले, याचे दुःख आहे. आज आम्ही तालीम गार्डनमध्ये करतो. तर कधी बसस्टॉपच्या मागे करतो. डिजीटल सिटी म्हणून गणल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरात नाट्य कलाकारांसाठी थिएटरची कमतरता असणे, हेच दुर्देव आहे. या शहरात लोकांचे शारीरिक आरोग्य जपसण्यासाठी फाईव्ह स्टार हॉस्पिटल्स आहे. पण, नागरिकांचे मानसिक आरोग्य जपण्याऱ्या नाट्यक्षेत्रासाठी नवी मुंबईत कुठेही थिएटर उपलब्ध नसल्याचा विषाद आहे.

► आपली प्रशासनाकडे मागणी काय?
आमची प्रशासनाकडे मागणी होती की, नवी मुंबईतील प्रत्येक नोडमध्ये किमान २०० आसनक्षमतेचे थिएटर उभारावे आणि बाजुलाच तालमीसाठी जागा द्यावी. पण, त्याकडे संबंधितांनी दुर्लक्षच केले आहे. शिवाय नवी मुंबईत ज्या नाट्य संस्था सुरु होत्या, त्यादेखील जागेअभावी बंद पडल्या आहेत. ४० वर्ष जुनी असणारी नवी मुंबई म्युझिक ॲन्ड ड्रामा सर्कल संस्था तालमीसाठी जागा उपलब्ध न झाल्याने बंद पडली. वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ, सीबीडी सारख्या ठिकाणी चांगले कलाकार आहेत. नवी मुंबईत कलाकारांची कमी नाही. पण, तालमीसाठी जागेची नितांत गरज आहे. शिवाय नवी मुंबईत नाट्यक्षेत्राचे ठराविक शिक्षण घता येत नाही. त्यामुळे नवी मुंबईत कलाकारांना बेसिक शिक्षण देणारी संस्था सुरु करण्याचे ध्येय बाळगून आहे.  

४८ वषे नवी मुंबईत वास्तव्य, मग येथील स्थानिक आगरी-कोळी बांधवांशी संबंध कसे जुळले?
सन १९७८ मध्ये वाशीत आलो. त्यावेळी येथे गांववाले आणि कॉलनीवाले वाद व्हायचे. पण, हळूहळू येथील स्थानिक मुलांशी खेळण्याच्या निमित्ताने आणि शाळेत एकत्र शिकल्यामुळे संवाद वाढत गेला. स्थानिक आगरी मुलांसोबत राहू लागल्याने मी आपोआपच येथील लोकजीवनाशी एकरुप झाल्याने आगरी बोली भाषा देखील आत्मसात केली आहे. उरण, जेएनपीटी परिसरात गेल्यावर आजही मी आगरी भाषेतच बोलतो. इतकेच काय तर आगरी बोली भाषेतील नाटकामध्ये म्हाताऱ्याची (डोकरा) भूमिका करताना आगरी भाषेतील डायलॉगमुळे  तुभे ग्रामस्थांनी मला प्रचंड  दाद दिल्याची स्मÀती ताजी आहे 

तुम्ही अभियंता..नंतर अभिनेते,  या प्रवासाबद्दल काय सांगाल?
मी इंजिनिअर झाल्यावर रबाळे येथील प्रेम पलोअर मिलसाठी बारा वषे काम केले. पण, नाट्यक्षेत्राकडे पूर्णपणे वळलेलो आहे. आमच्या ॲक्टर्स फॅक्टरी कंपनीच्या माध्यमातून पुणे येथील कंपनीसाठी एक वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे. या वेब सिरीजचे नाव अभिनेता ते अभियंता असे आहे. या वेब सिरीज मधील सर्व कलाकार ग्रामीण भागातील असून ते सर्व सिव्हील इंजिनिअर आहेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा; पण स्वतःची एक कला जोपासा. त्याने विकास साधता येतो, नवनवीन कल्पना सुचतात. वास्तविक पाहता प्रत्येकाच्या अंगात कला असते. कला सादर करायला वयाचे बंधन नसते. पण, सबब नको. माझीही एक इच्छा असून मला ढोलकी वाजवायला शिकायचे आहे.

सध्याची कोरोनाची झळ, तालमींवरील  बंधने, याबद्दल?
दुर्दैवाने आपल्याकडे कोरोनाचा फेरा आला आहे. कोरोनाचा आमच्या नाट्य क्षेत्रातालाही खूप मोठा फटका बसला आहे. मालिका, फिल्मच्या शुटींगसाठी माणसांच्या संख्येवर बंधने आली. कोरोना महामारी आहे. पण, यामध्ये सकारात्मक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. मी देखील कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो. मी सकारात्मक दृष्टीकोन बाळगला आणि कोरोनावर मात केली. त्यामुळे लोकांनी घाबरु नये. याहीपेक्षा मोठे रोग आहेत. फक्त स्वतःमध्ये सकारात्मक दृष्टीकोन बाळगला पाहिजे. समाजात वावरताना शासनाने केलेल्या सुचनांचे पालन केलेच पाहिजे. पुन्हा लॉकडाऊन करण्याची शासनावर वेळ आणून देऊ नका, असेच मी शेवटी साऱ्यांना सांगेन. 

Read Previous

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेना हायकोर्टाचा दणका, भाजप नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांना मोठा दिलासा

Read Next

बहुश्रुतता असणारा साहित्यिक..अशोक गुप्ते