महापालिका तर्फे आंतराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन साजरा

नवी मुंबई ः संयुक्त राष्ट्र संघामार्फत ७ सप्टेंबर रोजीनिळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

केंद्र सरकारच्या ‘शहर कृती आराखडा'ची अंमलबजावणी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्रभावीपणे केली जात असून शुध्द हवेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय मानके विहीत मर्यादेत आणण्याकरिता नवी मुंबई शहर शुध्द हवा कृती आराखडा तयार करुन त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम, प्रकल्प, सुविधा कामे करण्यात आली असून त्याची विस्तृत माहिती याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली. शासनाच्या ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये राज्यातील नंबर वनचे पर्यावरणशील शहर असा नवी मुंबईचा नावलौकीक उंचाविण्यासाठी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कृतिशील कार्यक्रम आखण्यात आला असून त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येत असल्याचे संजय देसाई यांनी सांगितले.

वाहतुक कोंडीमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदुषणाला प्रतिबंध करण्यासाठी उड्डाणपुल निर्मिती, इलेक्ट्रीक बसेसचा वाढता वापर, जनसायकल सहभाग प्रणालीतून इंधन विरहीत सायकल वाहनाला प्राधान्य, २१ कि.मी. सायकल ट्रॅकची निर्मिती, ओला-सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे कचरा निर्मितीच्याच ठिकाणी वर्गीकरण करण्यावर भर, दैनंदिन ७५० मेट्रीक टन घनकचरा संकलीत करुन त्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्यावर (सी ॲण्ड डी वेस्ट) शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया, महानगर गॅस लि. मार्फत पीएनजीची जोडणी जास्तीत जास्त घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना पुरविणे, मियावाकी स्वरुपाची व्यापक शहरी जंगल निर्मिती करुन प्रतिमानसी १ झाड असे नियोजन अशा महापालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध बाबींची माहिती यावेळी शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

नवी मुंबई शहराची हवा गुणवत्ता मापनासाठी व त्यामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती देत ‘मंडळ'चे उप-प्रादेशिक अधिकारी जयंत कदम यांनी याकामी महापालिकेचे उत्तम सहकार्य मिळत असल्याचे सांगितले.

वास्तुविशारद तथा वाहतूक नियोजनकार प्रांजली देशपांडे यांनी विविध शहरातील वाहतुकीमुळे होणाऱ्या वायु प्रदुषणाची माहिती देत शाश्वत वाहतूक साधनांचा वापर करुन हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणाचा दर्जा सुधारण्याबाबत उपयोगी विवेचन केले. वायू प्रदुषणामुळे पुढच्या पिढीच्या आरोग्याला धोका होऊ नये यासाठी आपल्या पिढीची अत्यंत महत्वाची जबाबदारी असून त्यादृष्टीने चालणे, सायकलींग आणि खाजगी वाहनांचा कमीत कमी वापर करुन सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची भूमिका दैनंदिन आचरणात आणण्याची गरज त्यांनी विषद केली.

‘नवी मुंबई महापालिका स्वच्छ हवा कृती आराखडा'चे सल्लागार श्रीकांत सोळुंके यांनी महापालिका शहराचे पर्यावरण सुधारण्यासाठी करीत असलेल्या कृतिशील कामांची माहिती दिले. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह उपआयुक्त मंगला माळवे, अनंत जाधव, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, प्रादेशिक वाहन विभागाच्या वाहन निरीक्षक रश्मी पगार, उपअभियंता दिपक नगराळे आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दोन वर्षांनी काहीशा शिथिल निर्बंधांमध्ये भक्तीमय नामगजरात श्रीगणेशाला भावपूर्ण निरोप