नागरिकांना कचरा वर्गीकरणाचे आवाहन

नवी मुंबई ः घनकचरा व्यवस्थापनामध्ये दररोजच्या कचऱ्याचे निर्माण होतो त्याच ठिकाणी ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण केले जाणे अत्यंत महत्वाचे असून नागरिकांचे याकामी चांगले सहकार्य लाभत आहे. मात्र, स्वच्छता नियमित दररोज करण्याची गोष्ट असल्याने यामध्ये सातत्य असणे अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा वर्गीकरणाची दैनंदिन सवय लागण्यासाठी सतत जागरुक राहणे आणि नागरिकांना याबाबतची सातत्याने जाणीव करुन देत राहणे गरजेचे आहे, असे मत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केले.


कचरा वर्गीकरणाविषयी आढावा बैठकीमध्ये महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वर्गीकरणाच्या अनुषंगाने अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत आपण करीत असलेल्या कामावर समाधानी न राहता अधिक सूक्ष्म नियोजन करुन कचरा वर्गीकरण १०० टक्के आणि नियमित होण्याकडे संबंधित सर्व घटकांनी बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी परिमंडळ-१चे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार आणि परिमंडळ-२ चे उपआयुक्त डॉ. अमरीश पटनिगीरे, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड उपस्थित होते.


घरात आपण निर्माण करीत असलेला कचरा आपणच वर्गीकरण करुन वेगवेगळा ठेवून घटागाड्यांमध्येही वेगवेगळा दिला तर स्वच्छताकर्मींना त्यांच्या कामात फार मोठी मदत होते, ते आता नागरिकांना समजू लागले आहे. मात्र, नागरिकांनी कचरा वर्गीकरण केला नाही तर तो वर्गीकरण करण्यासाठी स्वच्छताकर्मींना अतिरिक्त काम करावे लागते. सदर बाब लक्षात आणून देणे गरजेचे असून नागरिकांनी सफाई कर्मचाऱ्याचे काम न वाढविता कचरा वर्गीकरण करणे आपली स्वतःची व्यवतीगत जबाबदारी मानून घरातच ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यावर भर देण्याविषयी अधिक प्रभावी कार्यवाही करावी, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचित केले.


कचरा घरातूनच ३ प्रकारे वर्गीकृत करुन देण्याचे महत्व आता सर्वांना कळू लागलेले असून कचरा वर्गीकृत नसेल तर तो उचलला जाणार नाही या महापालिकेच्या भूमिकेला नागरिकांसह लोकप्रतिनिधींनाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आपण घरात कचरा वर्गीकरण न केल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम आपण वाढवित आहोत, याची कल्पना सर्वांना आहे. त्यामुळे नागरिकांच्या पातळीवरच तीन प्रकारे वर्गीकरण होताना दिसत असून सोसायट्यांमार्फत कचरा डबे पुरविणेविषयी केल्या जाणाऱ्या मागणीची पूर्तता
करण्याबाबत तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्त बांगर यांनी यावेळी दिले.


नागरिकांकडून वर्गीकृत दिल्या जाणाऱ्या कचऱ्यावर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी शास्त्रोक्त प्रक्रिया केली जात असून त्यामध्येही नवे तंत्रज्ञान वापरुन अधिक सुधारणा करण्यात येत आहे. यामध्ये मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीमध्ये सुक्या कचऱ्याचे अधिक बारकाईने वर्गीकरण येत्या पंधरवड्यात सुरु होत असून कचरा वर्गीकरणामध्ये सातत्याने सुधारणा करत उच्च पातळी गाठण्यासाठी तत्परतेने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. तसेच सोसायटी भागाप्रमाणेच गांवठाण आणि झोपडपट्टी भागातील कचरा वर्गीकरण प्रक्रियेकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश देत झिरो वेस्ट स्लम मॉडेल आणखी काही झोपडपट्टी भागात सुरु करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु करावी, असेही आयुक्तांनी सूचित केले.

नागरिकांकडून ओला, सुका आणि घरगुती घातक असा वेगवेगळा कचरा दिला न गेल्यास ते अधिकचे काम सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागते. तो एक प्रकारे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा टाकणारा असून आपण आपला कचरा वर्गीकरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकून त्यांचे काम वाढवतोय, याची जाणीव प्रत्येक नागरिकाने बाळगणे गरजेचे आहे. त्यामुळे घरातूनच कचरा वेगवेगळा दिला गेला तर तो वेगवेगळा करण्याचे अतिरिक्त काम सफाई कर्मचाऱ्यांना करावे लागणार नसल्याची जाणीव ठेवून नागरिकांनी कचरा वर्गीकरण आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा. -अभिजीत बांगर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पत्रकारांना ‘सिडको'च्या गृहनिर्माण योजनेतील घरे मिळण्याचा मार्ग सुकर