श्रीगणेशोत्सव मंडपात कोव्हीड लसीकरण मोहीम

नवी मुंबई ः कोव्हीडचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सुरुवातीपासूनच कोव्हीड लसीकरणाकडे विशेष लक्ष दिल्याने पहिल्या आणि दुसऱ्या डोसचे उद्दीष्ट पूर्ण करणारी नवी मुंबई प्रथम क्रमांकाची महापालिका ठरली. कोव्हीड लसीकरणामुळे आजाराची तीव्रता कमी झाल्याचे निदर्शनास आले असून त्यादृष्टीनेही लसीकरण लाभदायी ठरलेले आहे.

सद्यस्थितीत कोव्हीडचा प्रिकॉशन डोस घेण्याचा कालावधीही कमी झालेला असून दुसरा डोस घेतल्यानंतर ६ महिने किंवा २६ आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येत आहे. आत्तापर्यंत १,७७,५९६ नागरिकांनी कोव्हीडचा प्रिकॉशन डोस घेतलेला आहे. यामध्ये त्याचप्रमाणे कोव्हीडचा पहिला डोस घेतलेले १३,८५,८२० इतके नागरिक असून १२,४४,०२४ इतक्या नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. 

कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत साजरा केला जात असून ३१ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या श्रीगणेशोत्सव कालावधीतही नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता यावा, अशी सुविधा महापालिकेची सर्व रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी सुरु ठेवण्यात आलेली आहेत. याशिवाय महापालिका तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपामध्ये कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत विशेष लसीकरण मोहिमा राबविल्या जात असून स्थानिक नागरी आरोग्य केंद्रांमार्फत या लसीकरण मोहिमांचे नियोजन केले जात आहे.

२३ नागरी आरोग्य केंद्रांच्या परिसरातील १०० श्रीगणेशोत्सव मंडळ ठिकाणी विशेष लसीकरण केंद्रे स्थापित करण्यात आलेली असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. यामध्ये सीबीडी नागरी आरोग्य केंद्र क्षेत्रात ९ गणेशोत्सव मंडळे, करावे ६, सेक्टर-४८ नेरुळ ३, नेरुळ फेज-१ ३, कुकशेत २, शिरवणे १, सानपाडा ७, तुर्भे ३, पावणे २, इंदिरानगर १, जुहूगांव ३, वाशीगांव ६, खैरणे ६, महापे १, घणसोली १६, नोसिलनाका ४, राबाडा ९, कातकरीपाडा ४, ऐरोली ४, चिंचपाडा ३, दिघा १ आणि इलठणपाडा ६ असे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वतीने १०० मंडळांमध्ये १२५ मोहिमा घ्ोतल्या जात आहेत.

प्रिकॉशन डोस घेण्यात नागरिकांना सुलभता व्हावी यादृष्टीने मागणीनुसार सोसायट्यांची कार्यालये, खाजगी रुग्णालये, जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अशा ठिकाणी अतिरिक्त लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोर्बिव्हॅक्स लस प्रिकॉशन डोस म्हणून घेता येईल. कोर्बिव्हॅक्स या लसीला विषम कोव्हीड-१९ बुस्टर लस म्हणून मान्यता मिळाली असून ज्या १८ वर्षावरील नागरिकांनी यापूर्वी कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले असतील, ते नागरिक ६ महिने किवा २६ आठवडयानंतर कोर्बिव्हॅक्स लस प्रिकॉशन डोस म्हणून घेऊ शकतात.

श्रीगणेशोत्सवामध्ये नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत जागरुक रहावे या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोव्हीड लस संरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. श्रीगणेशोत्सव सारख्या उत्सवात देखील नागरिकांना कोव्हीड लसीकरणाचा लाभ करुन दिला जात आहे. १८ ते ५९ वयोगटातील अथवा त्यापुढील वयाच्या नवी मुंबईकर नागरिकांनी आपला प्रिकॉशन डोस विनामूल्य घेऊन स्वतःला लस संरक्षित करुन घ्यावे. -अभिजीत बांगर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीवूड्स येथील आश्रममधील आणखी 3 मुलींचे पास्टरने लैंगिक शोषण केल्याचे उघड