सीवूड्स येथील आश्रममधील आणखी 3 मुलींचे पास्टरने लैंगिक शोषण केल्याचे उघड  

नवी मुंबई : सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या आश्रमशाळा चालविणाऱया पास्टर राजकुमार येसुदासन याने आश्रमशाळेतील आणखी तीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. या आश्रमशाळेतुन सुटका करण्यात आलेल्या इतर तीन मुलींनी याबाबतची माहिती दिल्यानंतर ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने राजकुमार येसुदासन याच्या विरोधात अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आणखी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे येसुदासन विरोधात या प्रकरणात  विनयभंग आणि पोक्सो कलमानुसार चार गुन्हे दाखल झाले आहेत. यावरुन आश्रम शाळेत कुणाचेही लैंगिक शोषण झाले नाही, असे पत्रकार परिषद घेऊन सांगणाऱया एआरके फाऊंडेशनचा दावा फोल ठरला आहे.  

सीवूड्स येथील बेथेल गॉस्पेल या चर्चमध्ये बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुला मुलींचे तेथील पास्टरकडून छळ करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ठाणे जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने गत 5 ऑगस्ट रोजी येथील चर्चवर कारवाई केली होती. तसेच तेथील अस्वच्छ व गलिच्छ वातावरणात ठेवण्यात आलेल्या 45 मुला मुलींची सुटका केली होती. तसेच त्यांना उल्हासनगर येथील बालगृहात ठेवण्यात आले होते. महिला व बाल कल्याण विभागाकडुन सुटका करण्यात आलेल्या या मुला मुलींकडे केलेल्या चौकशीनंतर चर्चमधील पास्टर राजकुमार येसुदासन हा आश्रममधील मुलींचे लैगिक शोषण करत असल्याची बाब समोर आली होती.    
त्यानंतर एनआरआय पोलिसांनी सुटका करण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे तसेच महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या तक्रारीवरुन राजकुमार येसुदासन याच्यावर विनयभंगासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. सध्या येसुदासन हा न्यायालयीन कोठडीत आहे.  

दरम्यान, महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या चौकशीत पास्टर राजकुमार येसुदासन याने तेल आणि विक्स लावण्याच्या बहाण्याने आपले लैंगिक शोषण केल्याची माहिती राजस्थान मधील उदयपुर येथून आश्रममध्ये आलेल्या 13 व 14 वर्षीय दोघा बहिणींनी त्याचप्रमाणे एका 10 वर्षीय मुलीने दिली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी यांनी स्वत: एनआरआय पोलीस ठाण्यात पास्टर राजकुमार येसुदासन विरोधात लैंगिक शोषणाचे आणखी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहते. त्यामुळे आरोपी येसुदासन व त्याच्या पाठीशी असलेल्या सर्वांच्याच अडचणीत वाढ झाली आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुरक्षित वाटणारे ऐसपैस रस्ते, सर्व्हिस रस्ते सध्या धोकादायक