कामोठे एमजीएम मधील जन आरोग्य योजना सुरू

आमदार प्रशांत ठाकूर व माजी उपमहापौर सिताताई पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवरून कामोठे एमजीएम रुग्णालय निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे या योजनेचा लाभ याठिकाणी रुग्णांना मिळत नव्हता. सर्वसामान्य रुग्णांच्या सोयीसाठी या ठिकाणी योजना पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी माजी उपमहापौर सिताताई  सदानंद पाटील यांनी केली होती. त्यांनी यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. त्यानुसार या रुग्णालयात ही योजना कार्यान्वीत करण्यात आली असून रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

    महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जवळपास एक हजार आजारांवर मोफत उपचार केले जातात. कोरोना काळामध्ये उत्पन्नाची अट सुद्धा काढून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे १०० टक्के नागरिकांना या योजनेमध्ये आरोग्याची हमी देण्यात आली आहे. एकूण एक हजार रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात. त्यामध्ये कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात चा सुद्धा समावेश होता. कळंबोली जंक्शन ला अगदी महामार्गाच्या लगत असलेल्या या रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दररोज येतात. वेगवेगळ्या आजारांवर या ठिकाणी उपचार केले जातात. महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत शस्त्रक्रिया त्याचबरोबर वेगवेगळ्या आजारांवर उपचार रुग्ण घेत होते. मात्र काही दिवसांपूर्वी एमजीएम रुग्णालयाला या योजनेच्या पॅनेलमधून निलंबित करण्यात आले होते. आर्थिक हेराफेरीचा ठपका रुग्णालय प्रशासनावर ठेवण्यात आल्याचे समजते.  यामुळे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुधाकर शिंदे यांनी हे रुग्णालय योजनेतून निलंबित केले होते. दरम्यान एमजीएम व्यतिरिक्त इतर दुसरे मोठे रुग्णालय पनवेल परिसरात नाही. तसेच ते मोक्याच्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या सुविधा सुद्धा या रुग्णालयात आहेत. त्यामुळे सहाजिकच सर्वसामान्यांना येथील उपचार परवडणारे आहेत. जन आरोग्य योजना त्यांच्यासाठी एक प्रकारे संजीवनी आहे. असे असताना या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना बंद करण्यात आल्याने  रुग्णांचे मोठे हाल होत असल्याचे मत माजी उपमहापौर सिताताई सदानंद पाटील यांनी व्यक्त केले होते. 

 कामोठे एमजीएम हॉस्पिटलमध्ये दररोज असे अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु योजना बंद असल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार हे कामोठे एमजीएम रुग्णालय मध्ये जन आरोग्य योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

श्रीगणेशोत्सव मंडपात कोव्हीड लसीकरण मोहीम