घणसोली नाल्यातील दूषित पाण्याची प्रदूषण मंडळ द्वारे दखल

वाशी ः नवी मुंबई मधील घणसोली नाल्यात वारंवार रसायन मिश्रित दुर्गंधी युक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी  नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी करुन घणसोली नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत.

 मागील अनेक वर्षापासून नवी मुंबईतील खैरणे, महापे, पावणे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रीत पाणी प्रकिया न करता नाल्यात सोडले जात आहे. या रसायन मिश्रीत द्रव्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून, नागरिकांच्या नाकाला झिणझिण्या येत आहेत. रसायन मिश्रीत पाण्यामुळे लहान शिशु, गरोदर माता तसेच वयोवृध्द नागरिकांना जास्त त्रास होतो. याशिवाय रासायनिक द्रव्याच्या वासामुळे कर्करोग सारखा दुर्धर आजार होण्याची शक्यता जास्त आहे, असे तज्ञांचे मत आहे.

घणसोली नाल्यात देखील मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येत असल्याने घणसोली मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच दूषित पाण्याचा खाडीतील मासळीवर परिमाण होऊन मासेमारी देखील धोक्यात आली आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. अखेर या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे महापालिका आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत घणसोली भागातील सर्व नाल्यांची नुकतीच संयुक्त पाहणी करुन या नाल्यांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. यावेळी एमआयडीसी मधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची दुरुस्ती करण्याची सूचना एमआयडीसी प्रशासनाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ द्वारे करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यात ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ'चे उप प्रादेशिक अधिकारी विक्रांत भालेराव, ‘एमआयडीसी'चे सहाय्यक अभियंता प्रशांत चौधरी, ‘नवी मुंबई महापालिका'चे उप अभियंता दीपक नगराळे, प्रदूषण निरीक्षक राघवेंद्र पाष्टे, कनिष्ठ अभियंता बळीराम जाधव, स्वच्छता निरीक्षक संजय पाटील आदी सहभागी झाले होते. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कामोठे एमजीएम मधील जन आरोग्य योजना सुरू