गणपती विसर्जनाच्यादिवशी नवी मुंबईत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी    

नवी मुंबई : गणपती विसर्जन सुरळीत पार पडावे तसेच विसर्जनाच्यावेळी वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई व ठाणे शहरात जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई पोलिसांनी देखील गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्या हद्दीतील सर्व मार्गावर जड अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. तसेच या कालावधीत रस्त्यावर वाहने उभी करण्यास देखील बंदी घातली आहे. नवी मुंबई वाहतुक नियंत्रण विभागाचे पोलीस आयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी याबाबतची अधिसुचना जारी केली आहे.  

31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत साजरा होत असलेल्या गणेशोत्सवात येत्या 4 सफ्टेंबर रोजी पाच दिवसाचे गणपती, 5 सप्टेंबर रोजी गौरी गणपती, 6 सप्टेंबर रोजी सात दिवसांचे गणपती तर शुक्रवार 9  सप्टेंबर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. या विसर्जनाच्या दिवशी वाहतुक तसेच गणपती मिरवणुका सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी व ठाणे पोलिसांनी वाहतुक नियंत्रण अधिसुचना आदेश जारी करुन आपल्या हद्दीत जड अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे. मुंबई व ठाणे पोलिसांनी जारी केलेल्या अधिसुचनेमुळे विसर्जनाच्या दिवशी सर्व जड अवजड वाहने नवी मुंबई शहरातील सर्व रस्त्यावर पार्क केले जाण्याची शक्यता आहे. या वाहनांमुळे नवी मुंबई शहरात मोठया प्रमाणावर वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.  

त्यामुळे नवी मुंबई वाहतुक नियंत्रण विभागाने देखील अधिसुचना जारी करुन गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्या हद्दीत जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. तसेच नवी मुंबईतील रस्त्यांवर जड अवजड वाहने उभी करण्यास देखील बंदी घातली आहे. सदरची अधिसूचना 2 सप्टेंबर पासून लागू राहणार असल्याचे नवी मुंबई वाहतुक नियंत्रण विभागाचे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 दीड दिवसांच्या ९०७७ श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप